बिल्डरला साठ लाखांची मागणी – भाजप पदाधिकारी अटकेत

औरंगाबाद – बिल्डरला साठ लाख रुपयांची खंडणी मागणा-या तोतया आयकर अधिका-यासह तिघांविरुद्ध जवाहरनगर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश चौधरी, अरविंद जवळगेकर आणि संजय पारख (सर्व रा. बिड बायपास परिसर औरंगाबाद) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. यातील महेश चौधरी हा भाजपच्या स्थानिक ओबीसी सेलचा उपाध्यक्ष आहे. दिड कोटी रुपयांचा आयकर बुडवल्याची तक्रार आली असून प्रकरण मिटवण्याकामी साठ लाख रुपये मागीतल्याचा आरोप बिल्डर सुशांत दत्तात्रय गिरी (शिवशंकर कॉलनी तानाजी चौक औरंगाबाद) यांनी तिघांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीत केला आहे. यातील महेश चौधरी यास अटक करण्यात आली आहे.

7 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास संजय पारख याने बांधकाम व्यावसायीक सुशांत गिरी यांना फोन करुन म्हटले की तुम्ही दिड ते दोन कोटी रुपयांचा आयकर बुडवल्याबाबत तक्रार संबंधीत विभागात आली आहे. तेथील अधिकारी अरविंद जवळगेकर यांचे पीए महेश चौधरी असल्याची बतावणी केली. हे सर्वजण माझे जवळचे मित्र असल्याचे देखील संजय पारख याने गिरी यांना सांगितले.

तिघांचा संशय आला असला तरी  बिल्डर गिरी त्यांना भेटण्यासाठी गेले. ठरल्यानुसार सर्व जण एका हॉटेलात भेटले. त्याठिकाणी बिल्डर गिरी यांना धमकावण्याचे काम सुरु झाले.  एवढ्या रकमेचे कामच जर केलेले नाही तर या रकमेचा आयकर बुडवण्याचा प्रश्नच येतो कुठे? असे गिरी त्यांना सांगत  होते. मात्र धमकीसत्र सुरुच असल्यामुळे चाळीस लाख रुपयात तडजोड करण्याचे ठरले. सर्व कॉल रेकॉर्डींग बिल्डर गिरी यांनी तयार केली होती.

याप्रकरणी सुशांत गिरी यांनी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्याकडे तक्रार केल्यानंतर जवाहर नगर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला. तपासा मिळालेल्या माहितीनुसार तोतया आयकर अधिकारी अरविंद जवळगेकर हा इन्शुरन्स एजंट आहे. संजय पारख हा प्रॉपर्टी एजंट असून अटक करण्यात आलेला महेश चौधरी हा भाजपच्या स्थानिक ओबीसी सेलचा उपाध्यक्ष असून त्याची बीड बायपास रस्त्यावर म्हस्के पेट्रोल पंपानजीक हॉटेल आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक वसंत शेळके करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here