शेत विक्रीच्या पैशांची चोरट्यांना लागली होती भणक! — वयोवृद्ध सहादूंना मारण्यासाठी हत्यार वापरले टणक!!

नाशिक (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : सहादू रामचंद्र खैरनार व हिरुबाई सहादू खैरनार हे वयोवृद्ध दाम्पत्य दहा एकर शेतीचे मालक होते. दहा एकर शेतीचे मालक असलेल्या या दाम्पत्याला मुलबाळ नव्हते. त्यामुळे जिवनातील अखेरच्या दिवसात दोघा वयोवृद्ध पती पत्नीला एकमेकांशिवाय कुणाचाही सहारा नव्हता. नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यातील कोटबेल गावी घुबडदरा शिवारात ते रहात होते. सहादू खैरनार यांचे वय 77 तर हिरुबाई यांचे वय 65 एवढे होते. शेतातच घर करुन दोघे आपला उदरनिर्वाह करत होते. दहा एकरपैकी पाच एकर शेत विक्रीचा त्यांनी व्यवहार केला होता. त्या व्यवहारातून आलेले पैसे त्यांनी आपल्याजवळच ठेवले होते. शेतात एकटेच राहणारे दोघे वयोवृद्ध आणि  त्यांच्याजवळ भलीमोठी रक्कम आली असल्याची भणक कुणाला तरी लागली होती.  

नेहमीप्रमाणे बुधवार दि. 22 सप्टेंबर 2021 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास दोघांनी जेवण आटोपले. त्यानंतर दोघे जण झोपी गेले. रात्री बारा वाजेनंतर सुरु झालेल्या 23 सप्टेंबरच्या मध्यरात्री व पहाटेच्या दरम्यान अचानक सहादू यांना त्यांच्या घराचा दरवाजा ढकलण्याचा आवाज आला. घराच्या पलंगाजवळ असलेल्या दरवाजाची कडी त्यांनी लावली होती. मात्र घराचा समोरचा दरवाजा लागत नसल्यामुळे त्याला वीट लावून त्यांनी बंद केला होता.

काही वेळाने हिरुबाई यांना देखील आपल्या घराचा दरवाजा ढकलण्याचा आवाज आला. मात्र घराबाहेर बांधलेला बैल कदाचीत सुटला असेल असे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. थोड्यावेळाने पुन्हा दोघांना दरवाजा ढकलण्याचा आवाज आला. अखेर हिरुबाई यांनी धडपड करत अंथरुणातून उठत दरवाजाकडे जावून काय प्रकार आहे ते बघण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिन इसम अचानक त्यांच्या घरात आले. आल्या आल्या त्यांनी घरातील वस्तूंची पाहणी सुरु केली.

आपल्या घरात अचानक आलेल्या तिघा अनोळखी लोकांना बघून हिरुबाई घाबरल्या. आलेल्या तिघांपैकी एकाने हिरुबाईचे तोंड दाबले. त्यामुळे हिरुबाई अजूनच घाबरल्या. इतर दोघांनी घरातील वस्तूंची उलथापालथ करण्यास सुरुवात केली. एका जणाकडे धारदार हत्यार बघून हिरुबाईच्या मुखातून शब्द निघेनासा झाला. या गोंधळाच्या आवाजाने गाढ झोपेत असलेल्या सहादू खैरनार यांना जाग आली. समोर असलेल्या सर्वांना बघून त्यांनी दरडावण्यास सुरुवात केली. तुम्ही कोण आहात असा आवाज काढत त्यांनी हिरुबाईची घुसखोराच्या तावडीतून सुटका करण्यात यश मिळवले मात्र त्यांचा ताबा घुसखोरांनी घेतला. त्यांना घुसखोरांनी पकडून ठेवले. एकाने घरातील लोखंडी कु-हाड हातात घेत सहादू यांच्या छातीवर व मानेवर हल्ला केला. या हल्ल्यात सहादू खैरनार जखमी झाले व जमीनीवर कोसळले. रक्तबंबाळ झाल्यानंतर परिस्थिती लक्षात घेत सर्वजण पळून गेले.

सर्व जण पळून गेल्यानंतर एवढा वेळ निशब्द झालेल्या हिरुबाईं यांनी आक्रोश करण्यास सुरुवात केली. त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरात राहणारा एक तरुण त्यांच्या घराच्या दिशेने धावत आला. रक्तबंबाळ अवस्थेतील सहादू यांची अवस्था बघून तो देखील घाबरला. त्याने इतर लोकांना बोलावून घेतले. बघता बघता परिसरातील लोक जमा होण्यास वेळ लागला नाही. या घटनेची माहिती जायखेडा पोलिसांना देण्यात आली. घुसखोर व चोरट्यांच्या हल्ल्यात कु-हाडीचे घाव वर्मी बसल्याने झालेल्या अतिरक्तस्त्रावाने सहादू खैरनार मरण पावले. चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी सहादू यांची हत्या केली होती.

दरम्यान सहादू खैरनार यांचा पुतण्या शेताकडे जात असतांना गस्तीवरील स.पो.नि. श्रीकृष्ण पारधी यांनी त्याला थांबवत त्याची विचारपूस केली. आपल्या काकांना शेतात कुणीतरी मारहाण केल्याबाबत त्याने स.पो.नि. पारधी यांना सांगितले. क्षणाचाही विलंब न करता स.पो.नि. पारधी यांनी घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली. त्याचवेळी दोघे संशयीत शेतातील पिकांमधून संशयास्पदरित्या पलायन करतांना त्यांना दिसले. त्यांचा पाठलाग करत असतांना एकाला पकडण्यात यश आले. दुसरा मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला.

याप्रकरणी हिरुबाई उर्फ रखूबाई सहादू खैरनार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात तिघा आरोपींविरुद्ध जायखेडा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. शेत विक्रीचे आलेले पैसे चोरी करण्याच्या  उद्देशाने घरात आलेल्या मारेक-यांनी सहादू रामचंद्र खैरनार यांचा खून केल्याची फिर्याद जायखेडा पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली. स.पो.नि. श्रीकृष्ण पारधी यांनी हा तपास आपल्याकडे घेतला. रात्रीच पंकज ऊर्फ सागर बाजीराव चौधरी (रा. नेर, ता. जि. धुळे) यास ताब्यात घेण्यात यश आले होते. त्याच्यासोबत असलेला त्याचा साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेत पळून गेला होता. ताब्यातील पंकज उर्फ सागर बाजीराव चौधरी यास पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबुल केला व इतर साथीदारांची नावे देखील कथन केली.

मयत सहादू खैरनार

मोबाइलच्या आधारे या ‌‌खून प्रकरणातील एकुण आठ संशयितांना धुळे, मालेगाव, गुजरातमधील कच्छ, भुज येथून ताब्यात घेण्यात आले. पंकज ऊर्फ सागर बाजीराव चौधरी, रा. नेर, ता. जि. धुळे याने दिलेल्या माहितीच्या आधारे  भुऱ्या ऊर्फ मुश्ताक सय्यद (रा. लळींग, ता. जि. धुळे), अंकुश दादाजी पवार रा. रावळगाव, ता. मालेगाव जि. नाशिक, विठ्ठल अर्जुन दळवी रा. रिटायर्ड वस्ती जळगाव ता. मालेगाव जि. नाशिक, काळू ऊर्फ बळीराम उत्तम सोनवणे रा. बोरमाळ ता. मालेगाव जि. नाशिक), अरुण ऊर्फ आऱ्या संतोष पवार रा. रावळगाव ता. मालेगाव जि. नाशिक, वसंत प्रभाकर सोनवणे (रा. रावळगाव ता. मालेगाव जि. नाशिक, सागर कैलास आहिरे रा. बोरमाळ अशा एकुण आठ जणांना अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपविभागीय पोलिस अधीक्षक पुप्पराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. श्रीकृष्ण पारधी यांनी तयार केलेल्या पथकातील सहका-यांनी सदर कारवाई केली. पोलिस  उपनिरीक्षक तुषार भदाणे, उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, हवालदार सुनील पाटील, गोपीनाथ भोये, निंबा खैरनार, उमेश पाटील, शिपाई गजानन गोटमवार, राजेंद्र सोनवणे, राहुल मोरे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here