जागृती भ्रष्टाचार संघर्ष समितीचे पोलिस अधिक्षक, जिल्हाधिका-यांना निवेदन

गोंदीया (अनमोल पटले) : जागृती पतसंस्था मर्यादीत मुंडीकोटा येथील कथित गैरव्यवहाराबाबत आलेल्या तक्रारींच्या आधारे सन 2015 ते 2019 या कालावधीतील आर्थिक वर्षाच्या फेर लेखापरिक्षणाचे आदेश जिल्हा उप निबंधक, सहकारी पतसंस्था गोंदीया यांनी दिले होते.

लेखापरीक्षक सहकारी संस्था गोंदिया वर्ग-1 यांनी केलेल्या फेरलेखापरीक्षणात 3 कोटी 30 लाख 71 हजार रुपयांची अफरातफर व 15 कोटी 32 लाख 44 हजार 91 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे लेखापरीक्षण अहवालात सिद्ध झाले. त्या अनुषंगाने लेखापरीक्षक वर्ग-1 यांनी 16 आजी-माजी संचालक व 12 शाखा व्यवस्थापक यांच्याविरुद्ध दि. 30 डिसेंबर 2020 रोजी तिरोडा पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. सर्व 28 संशयीत आरोपींविरुद्ध भा.द.वि. 406, 409, 420, 34, ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संवर्धन अधिनियम 3 व 4 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 28 पैकी केवळ एका संशयीत आरोपीची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. इतर सर्व संशयीत आरोपी जामीनावर बाहेर आले आहेत.

गेल्या दिड वर्षापासून याप्रकरणी कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप होत आहे. जागृती पत संस्थेत ग्रामीण भागातील हजारो शेतकरी, कष्टकरी व मध्यमवर्गीय जनतेच्या 42 कोटी रुपयांच्या ठेवी अनागोंदी कारभारामुळे रखडल्या आहेत. गेल्या दोन वर्षापासून लॉकडाऊनमुळे ठेवीदारांची अवस्था कामधंद्या अभावी बिकट झाली आहे. सर्व संचालक व शाखा व्यवस्थापकांची संपत्ती जमा करुन त्या संपत्तीचा लिलाव करुन ठेवीदारांना त्यांच्या ठेवींचे पैसे मिळावे यासाठी जागृती भ्रष्टाचार संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री, सहकार मंत्री व पालकमंत्री गोंदीया, खासदार प्रफुल्ल पटेल, माजी आमदार राजेंद्र जैन व खासदार सुनिल मेंढे यांना पत्र पाठवण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here