पोलिसाच्या पत्नीचा मित्र वादाला ठरत होता कारणीभूत—— शिर व धड वेगळे करुन केले त्याला जिवनातून पराभूत

crimeduniya
[email protected]

मुंबई : मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेला शिवशंकर गायकवाड सायन विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त अश्विनी पाटील यांच्या वाहनावर चालक आहे. शिवशंकरची सासरवाडी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील आहे. त्याची पत्नी मोनाली सतत मोबाईलवर कुणाशी तरी बोलत असे. त्याचा राग शिवशंकरच्या मनात होता. मोनालीच्या माहेरी राहणारा भाजीपाला विक्रेता दादा जगदाळे तिचा मित्र होता. लग्नाच्या आधीपासूनच मोनालीची दादा जगदाळे याच्यासोबत मैत्री होती. लग्नाननंतर देखील तिची दादा जगदाळे सोबत असलेली मैत्री कायम राहिली. तिचे दादा सोबत सतत बोलणे शिवशंकर यास आवडत नव्हते. त्यातून पती पत्नीत वादाची ठिणगी पडत होती.

अखेर दादा जगदाळे याचा कायमचा काटा काढण्याचे शिवशंकरने मनाशी ठरवले. पत्नीचा मित्र असलेल्या दादाला शिवशंकरने सोलापूर येथून मुंबईला 29 सप्टेबर रोजी बोलावून घेतले. शिवशंकरने गोड बोलून दादाला दारु पिण्यास नेले. पेगवर पेग चढवत शिवशंकरने दादाला मद्यधुंद करुन टाकले. सुरुवातीला प्रेमाने गोड बोलून व नंतर थोडी सक्ती करत दादाला शुद्ध हरपेपर्यंत मद्य पाजण्यात आले. दादाला मद्य पाजण्यात शिवशंकरने कोणतीही कसर ठेवली नाही. दादा शुद्ध हरपल्याचे लक्षात आल्यानंतर शिवशंकरच्या मनातील राग अधिकच उफाळून आला.  

पोलिस कर्मचारी असलेल्या शिवशंकर गायकवाड याने भाजी विक्रेत्या दादा जगदाळे याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. काही वेळातच होत्याचे नव्हते झाले. दादा जगदाळे याचे शिर व धड वेगळे करत शिवशंकर याने क्रुरतेची परिसिमा गाठली. मृतदेहाचे तुकडे एका प्लॅस्टीकच्या बॅगेत भरुन ते मुंबईतील अ‍ॅंटॉप हिल परिसरात टाकून देण्यात आले. दरम्यान मयताची ओळख पटू नये यासाठी शिवशंकरने मयताच्या चेह-यावर सॅनेटायझर टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.

या घटनेचा तपास अ‍ॅंटॉप हिल पोलीस व गुन्हे शाखेच्या युनिट चारने संयुक्तपणे सुरु केले. घटनास्थळी मृतदेहाचे शिर गायब असल्यामुळे तपास पुढे सरकत नव्हता. मात्र मयताच्या हातावर टॅटूने “दादा” असे नाव गोंदलेले होते. पोलिस पथकाने मयताच्या गुडघ्यात बसवलेल्या प्लेटच्या आधारे तपासाला सुरुवात केली. मयताच्या गुडघ्यात बसवलेली प्लेट कोणत्या कंपनीची आहे याचा तपास लावण्यात आला. त्यानंतर या प्लेटच्या माध्यमातून पोलिस पथक अकलूज येथील ऑर्थोपेडीक रुग्णालयापर्यंत जावून पोहोचले. त्यानंतर तपासात मयताचे नाव पुढे आले. मयत हा सोलापूर जिल्ह्याच्या अकलूज येथील भाजी विक्रेता दादा जगदाळे असल्याचे निष्पन्न झाले. अशा प्रकारे मयताच्या हातावरील गोंदलेले नाव देखील जुळून आले.

मयताचा खून कुणी व का केला याकामी पोलिस पथकाने तपासाची गती वाढवली. मयताचे कॉल रेकॉर्ड तपासले असता त्याचे मोनाली गायकवाड हिच्यासोबत नेहमी कॉल झाल्याचे उघडकीस आले. मोनालीचा पती पोलिस दलातच कार्यरत असल्याचे लक्षात आल्यानंतर दोघांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान पोलिस कर्मचारी शिवशंकर गायकवाड याने आपला गुन्हा कबुल केला.  दोघांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने 22 ऑक्टोबर पर्यंत दोघांना पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास अँटॉप हिल पोलीस व गुन्हे शाखा युनिट चार असे एकत्रीतपणे करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here