नाशिक परिक्षेत्रांतर्गत अवैध धंद्यांवर कारवायांचे धाडसत्र

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : डॉ. बी.जी. शेखर यांनी नाशिक परिक्षेत्राची धुरा 24 ऑगस्ट पासून सांभाळली आहे. नाशिक परिक्षेत्राचा कारभार हाती घेतल्यापासून अवैध पिस्टल, ड्रग्ज, गुटखा, अवैध लिकर अशा विविध अवैध गुन्हेगारी जोपासणा-या धंद्यांचे उच्चाटन करण्यावर भर दिला आहे.

नाशिक ग्रामीण व जळगाव या दोन जिल्ह्यात गावठी कट्ट्यांवर वेळोवेळी कारवाई करण्यात आली. नाशिक ग्रामीण (वाडी व-हे) व जळगाव (चोपडा शहर व चोपडा ग्रामीण) या ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत एकुण सात आरोपी अटक करण्यात आले. त्यांच्या ताब्यातून 8 गावठी कट्टे, 28 जिवंत काडतुस, दोन मॅगझीन, एक मोटार सायकल व सहा मोबाईल असा एकुण 2 लाख 91 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

गुटख्यावरील कारवाईत जळगाव (मुक्ताईनगर ) व नंदुरबार (उपनगर) या दोन जिल्ह्यात कारवाया करण्यात आल्या. या दोन्ही ठिकाणी करण्यात आलेल्या कारवायांमधे एकुण पाच आरोपी अटक करण्यात आले. त्यांच्याकडून 2 महिंद्रा पिकअप वाहने, विमल गुटखा असा एकुण 33 लाख 24 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रेशन धान्याच्या बाबतीत करण्यात आलेल्या विशेष कामगिरीत नाशिक ग्रामीण (देवळा) व जळगाव (धरणगाव) या दोन ठिकाणी कारवाया करण्यात आल्या. यात एकुण पाच आरोपी अटक करण्यात आले. त्यांच्या ताब्यातून 2 ट्रक, रेशनिंगचा तांदुळ व गहु असा एकूण 19 लाख 13 हजार 430 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ब्राऊन शुगर, गांजा व चरस या अमली पदार्थाविरुद्ध धुळे (मोहाडी, चाळीसगाव रोड) आणि नाशिक ग्रामीण (रमजानपुरा) अशा ठिकाणी कारवाया करण्यात आल्या.  या कारवायांमधे एकुण 12 आरोपी अटक करण्यात आले. त्यांच्याकडून चरस गांजा, ब्राऊन शुगर व वाहने असा एकुण 12 लाख 96 हजार 100 रुपये या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध बायो डीझल वर नाशिक ग्रामीण (पवारवाडी) येथे करण्यात आलेल्या कारवाईत 5 आरोपी अटक करण्यात आले. त्यांच्याकडून 23 हजार 200 लिटर बायो डीझल भरलेल्या टॅंकरसह इतर मुद्देमाला असा एकूण 43 लाख 36 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अवैध दारुवरील कारवाईत धुळे (शिरपुर शहर) येथे दोन आरोपी अटक करण्यात आले. त्यांच्याकडून एक टेम्पोसह अवैध दारु असा एकुण 9 लाख 27 हजार 680 रुपये या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध स्पिरीटवरील कारवाईत धुळे (शिरपूर) येथे सहा आरोपी अटक करण्यात आले. त्यांच्याकडून 2 टॅंकरसह अवैध स्पिरीट रसायने असा एकुण 86 लाख 37 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध गॅस डांबर चोरी प्रकरणी जळगाव (पारोळा) येथे करण्यात आलेल्या कारवाईत एकुन पाच आरोपी अटक करण्यात आले. त्यांच्याकडून 1 गॅस टॅंकर, 2 डांबर टॅंकर, 3 टेम्पो ऑईल, 1 स्कॉर्पीओ वाहन, ओमनी, 20 गॅस सिलेंडर असा एकुण 63 लाख 1 हजार 650 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगारावरील कारवाईत नाशिक ग्रामीण (मालेगाव शहर) येथे एकुण 15 आरोपी अटक करण्यात आले. त्यांच्याकडून 12 मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण 1 लाख 40 हजार 740 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 24 सप्टेबर पासून करण्यात आलेल्या विशेष पथकाच्या कारवाईत अमली पदार्थ, अग्नीशस्त्रे, रेशन, जुगार, दारु, स्पिरीट, गॅस, डांबर अशा विविध अवैध धंद्यांवर एकुन सोळा ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. त्यात 63 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. त्या सर्वांकडून 2 कोटी 68 लाख 69 हजार 490 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.    

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here