जळगाव पोलिस भरती – 2019 प्रगतीपथावर

जळगांव : जळगांव जिल्हा पोलीस भरती -2019 साठी जळगांव जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर 128 पोलीस शिपाई पदांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. पोलीस शिपाई भरती-2019 मधील आवेदन अर्ज सादर केलेल्या एकूण 29690 उमेदवारांसाठी जळगांव शहर व भुसावळ शहर या ठिकाणी असलेल्या परीक्षा केंद्रावर लेखी परीक्षा दिनांक 9 ऑक्टोबर 2021 रोजी आयोजित करण्यात आली होती.

सदर परीक्षेचा निकाल जळगांव जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. सदर लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे शारीरीक चाचणी व कागदपत्र पडताळणीसाठी 1:10 प्रमाणे गुणवत्ता यादी देखील जळगांव जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. जळगांव जिल्हा पोलीस भरती-2019 लेखी परीक्षा निकाल व शारीरीक चाचणी व कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवारांच्या गुणवत्ता यादीबाबत उमेदवारांकडून जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयास आक्षेप/हरकती विनंती अर्ज प्राप्त झाले आहेत. सदर प्राप्त तक्रारी, आक्षेप व विनंती अर्ज याबाबत जळगांव जिल्हा पोलीस भरती-2019 निवड मंडळाने आढावा घेतला. त्यानंतर जाहिराती मधील सुचना, अटी व शर्थी तसेच वरीष्ठ कार्यालयाकडील मार्गदर्शक सुचनांचा सांगोपांग विचार केला. त्यानंतर सर्व हरकती व आक्षेप निकाली काढले आहेत. त्याबाबतचा निर्णय जळगांव जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळावर दिनांक 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

जळगांव जिल्हा पोलीस भरती-2019 च्या पात्र उमेदवारांसाठी शारीरीक चाचणी व कागदपत्र तपासणी कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. दिनांक 9 नोव्हेंबर 2021 व 10 नोव्हेंबर 2021 रोजी शारीरीक चाचणीसाठी पात्र पुरुष उमेदवार व दिनांक 13 नोव्हेंबर 2021 रोजी पात्र महिला व माजी सैनिक पुरुष उमेदवारांचे शारीरीक मोजमाप/मैदानी चाचणी तसेच कागदपत्र पडताळणी केले जाणार आहे. सर्व उमेदवारांच्या शारीरीक चाचणी व कागदपत्रांची पडताळणी तिन दिवसात पुर्ण केली जाणार आहे.

या संदर्भातील दिनांक निहाय यादी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली असल्याचे जळगाव जिल्हा पोलिस दलातर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. सर्व पात्र उमेदवारांनी वेळापत्रकानुसार दिलेल्या दिनांकास सकाळी सहा वाजता पोलीस कवायत मैदान, जळगांव येथे उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. विहीत कालावधीत उपस्थित नसलेल्या उमेदवारास अन्य दिवशी उपस्थित राहण्याची संधी दिली जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. शारीरीक चाचणी कार्यक्रमाविषयी उमेदवारांना काही अडचणी असल्यास पोलीस भरती मदत कक्षाच्या 0257-2233569 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जळगांव जिल्हा पोलीस भरती-2019 ची भरती प्रक्रिया अंत्यत पारदर्शीपणे राबवली जात असून त्यात कुणालाही हस्तक्षेप करता येणार नसल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. पोलीस भरती प्रक्रियेसाठी एजंट /दलाल किंवा कोणत्याही व्यक्तीने उमेदवारांकडून पैशांची मागणी केल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा किंवा जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयास कळवावे. याबाबत तथ्य आढळल्यास खात्री करून कठोर कारवाई केली जाणार आहे. सदर प्रसिद्धीपत्रक व पोलीस भरती-2019 बाबत सर्व माहिती जळगाव जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत संकेतस्थळ www.jalgaonpolice.gov.in येथे देखील प्रसिध्द करण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here