दागिने चोरीचा संशय उठला अन्सारच्या जीवावर — संतप्त जमावाने आग लावली अरबाजच्या घरावर

On: May 23, 2026 10:42 AM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : चोरीचा संशय म्हणजे शिक्षेचा परवाना आहे का? असा एक प्रश्न जळगाव जिल्ह्यातील एका घटनेतून समोर आला आहे. सोशल मीडियावरील चिथावणी किती घातक ठरु शकते? असा देखील एक प्रश्न या घटनेच्या निमीत्ताने निर्माण झाला आहे. लोकांचा कायद्यावरील विश्वास कमी होत आहे का? असे केवळ या घटनेच्या नव्हे तर अनेक घटनेतून विचारला जात आहे. संतप्त जमावाला हिंसा हा उपाय वाटू लागला आहे का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न सध्या राज्यात घडत असलेल्या विविध घटनेच्या माध्यमातून उपस्थित झाले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील बोदवड शहरातील हिदायत नगर परिसरात भरदिवसा घडलेली हत्या आणि त्यानंतर संशयिताच्या घराला संतप्त जमावाने लावलेली आग या दुहेरी घटनांनी संपूर्ण राज्य हादरले आहे. एका चोरीच्या संशयातून सुरु झालेला वाद थेट खून, सामाजिक संताप, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरील प्रश्नचिन्ह आणि कायदा-सुव्यवस्थेच्या चिंतेपर्यंत पोहोचला. ही घटना केवळ गुन्हेगारी प्रकरण नाही, तर समाजातील वाढता अविश्वास, अफवांचा वेग, कायदा हातात घेण्याची मानसिकता आणि पोलिस यंत्रणेवरील दबाव यांचे भयावह चित्र समोर आणणारी ठरली आहे. काय आहे ही नेमकी घटना? या गुन्ह्याचा काय घटनाक्रम आहे हे जाणून घेऊया.

जळगाव जिल्ह्यातील बोदवड या गावात हिदायत नगर परिसर आहे. या गावात अन्सार शेखलाल पिंजारी हा अवघा 36 वर्ष वयाचा तरुण रहात होता. मोलमजुरीचे काम करुन तो आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. 5 मे रोजी पिंजारी परिवार धुळे येथे नातेवाईकाच्या लग्नानिमीत्त गेला होता. विवाह समारंभ आटोपून अन्सार पिंजारी व त्याच्या परिवारातील सर्व सदस्य 9 मे रोजी आपल्या घरी परत आले. या कालावधीत त्याला घराच्या लोखंडी ग्रिलचे कुलुप तुटलेले आढळून आले. बेडरुमच्या कपाटातील सोन्या चांदीचे दागदागिने देखील गायब झाले होते. आपल्या घरात चोरी झाल्याची त्याची खात्री झाली. त्यामुळे त्याचा भाऊ निसार पिंजारी याने या घटने प्रकरणी बोदवड पोलिस स्टेशनला रितसर तक्रार दाखल केली.

ansar pinjari

या घटनेबाबत गावातील काही स्थानिक तरुणांवर संशय व्यक्त करण्यात येत होता. या चोरीच्या घटनेप्रकरणी निसारचा भाऊ अन्सार पिंजारी याने पोलिसांकडे गावातील अरबाज लतीफ शहा आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध संशय व्यक्त केला होता. आपल्यावर चोरीचा संशय घेतल्याचे अरबाज यास समजले. त्यामुळे अरबाज शहा हा अन्सार पिंजारी याच्यावर चिडून होता.

या प्रकरणी पोलिसांनी संशयितांची चौकशी करुन त्यांना सोडून दिले होते. मात्र आपल्यावर संशय व्यक्त करणा-या अन्सार याचा काटा काढण्याचे अरबाजने मनाशी निश्चित केले होते. आपल्यावर संशय व्यक्त का केला? पोलिसांना माझे नाव का सांगितले? तुला ठार करेन अशी धमकीच अन्सार यास संशयीतांकडून मिळाली. आपल्याला धमकी मिळाल्याचा प्रकार अन्सार याने पुन्हा पोलिसांकडे कथन केला. मात्र पोलिसांनी या धमकीचा प्रकार फार गांभिर्याने घेतला नसल्याची ओरड सुरु आहे. या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेऊन त्याला न्यायालयीन दाद मागण्याची समज देण्यात आली.

arbaj shah

दरम्यानच्या कालावधीत संशयीत अरबाज शहा याने आपल्या मोबाईलवर हातात चाकू घेतलेला फोटो आणी बदला घेण्याची शेरोशायरी असलेले स्टेटस ठेवले. त्यामुळे दोन्ही गटात तणावाचे वातावरण निर्माण झाले. बुधवार दि. 20 मे 2026 रोजी भर दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास अरबाज शहा याने अन्सार पिंजारी याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्याप्रमाणे संशयीत हल्लेखोर अरबाज याने त्याच्या दोघा साथीदारांसह अतिशय आक्रमकपणे धारदार शस्त्राने हत्या केली. या घटनेनंतर अरबाज लतिफ शहा याच्यासह त्याचे साथीदार मोहम्मद हरुण शहा आणी इस्त्राईल इस्माईल शहा असे तिघेजण घटनास्थळावरुन पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत अन्सार पिंजारी यास ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात अन्सार याच्या शरीरावर अनेक खोल जखमा असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेनंतर संतप्त जमावाने अरबाज याच्या राहत्या घरावर चाल केली. त्याचे घर पेटवून देण्यात आले. सुदैवाने त्या घरात कुणीही नव्हते. त्यामुळे प्राणहाणी टळली. मात्र घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक दिपक सुरवडकर यांच्या हलगर्जीपणामुळे ही हत्या झाल्याचा आरोप संतप्त जमावाने केला. स.पो.नि. दिपक सुरवडकर यांना तातडीने निलंबीत करण्याची मागणी जमावने केली. सहायक पोलिस निरीक्षक दिपक सुरवडकर यांचे निलंबन होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी केली. या प्रकरणी सुरुवातीला दोघा संबंधीत पोलिस कर्मचा-यांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती डीवायएसपी केदार बारबोले यांनी संतप्त जमावाला दिली. आमदार चंद्रकांत पाटील हे देखील आपल्या समर्थकांसह बोदवड येथे दाखल झाले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांसमोर आपल्या कार्यकर्त्यांसोबत उभे राहून तिव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

Shrikant Dhivare SP

अन्सार शेखलाल पिंजारी याच्या खूनाची चौकशी उप अधिक्षक केदार बारबोले यांच्यामार्फत केली जाईल आणि दोषी पोलिसांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन अप्पर पोलिस अधिक्षक संदीप गावीत यांनी यावेळी जमावाला दिले. तसेच या गुन्ह्याचा पुढील तपास वरणगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे देखील त्यांनी उपस्थितांना सांगितले. त्यानंतर जमाव शांत झाला. दरम्यान जमावाने संशयीत आरोपीचे घर जाळल्यामुळे बोदवड गावात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. त्यामुळे गावाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.

Sandip Gavit Addl SP

दोन्ही दुर्दैवी घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ हालचाल करत मुख्य संशयित अरबाज शाह याला तो पळून जाण्याच्या बेतात असतांना अटक करण्यात यश मिळवले. त्याला भुसावळ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली. तपासात पोलिसांनी मोबाईल कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया अ‍ॅक्टिव्हिटी, घटनास्थळावरील पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब तपासण्यास सुरुवात केली. या प्रकरणातील आणखी दोन संशयित फरार झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली. फरार संशयीत मोहंमद शहा हरुण शहा आणि इस्त्राईल शहा इस्माईल शहा या दोघांना देखील अटक करण्यात पोलिस पथकाला यश आले. खबरदारीचा उपाय म्हणून दोघांना वरणगाव पोलिस स्टेशनच्या लॉक अप मधे ठेवण्यात आले.

Kedar Barbole Dysp

खून आणि जाळपोळ या दोन घटनांच्या पार्श्वभुमीवर शुक्रवार 22 मे 2026 रोजी पोलिस प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. या सर्व घटनांची परिणीती प्रभारी अधिकारी प्रभारी अधिका-यांसह दोन पोलिस कर्मचारी अशा तिघांचे निलंबन करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक दिपक सुरवडकर, बोदवड टाऊन बीट प्रभारी एएसआय रविंद्र गुरचळ आणि हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके अशी तडकाफडकी निलंबीत करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. टाऊन बिट प्रभारी एएसआय रविंद्र गुरचळ यांनी परिस्थिती गांभिर्याने हाताळली नसल्याचे चौकशीत समोर आल्याचे समजते. 19 मे रोजी दोन्ही गटात वाद झाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले नसल्याचे सांगण्यात येते. मात्र संबंधीतांना पोलिस स्टेशनला आणून त्याच्यावर कठोर कारवाई न करता सोडून दिल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. याशिवाय वरिष्ठ अधिकारी आणी नियंत्रण कक्षात देखील त्यांनी वेळेत माहिती दिली नसल्याचे चौकशीत उघड झाले आहे. बोदवड पोलिस स्टेशनचे प्रभारी पद आर्थिक गुन्हे शाखेचे दवंगे यांच्याकडे देण्यात आले. मयत अन्सार पिंजारी हा घरातील एकमेव कमावता तरुण असल्याचा आधार घेत शासनाने या कुटूंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली.  या घटनेचा पुढील तपास पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधिक्षक संदिप गावीत, डीवायएसपी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल व त्यांचे सहकारी सुकराम सावकारे करत आहेत.

Amitkumar Bagul API

या घटनेत एका घरातील तरुणाचा जीव गेला, तर दुसऱ्या कुटुंबाचे घर जळून खाक झाले. समाजात निर्माण झालेली दरी आणि भीती याची किंमत संपूर्ण गावाला चुकवावी लागत आहे. “जमावाचा न्याय हा लोकशाहीसाठी धोकादायक” असल्याचे मत या घटनेच्या निमीत्ताने व्यक्त केले जात आहे.  कायदेतज्ज्ञांच्या मते, कोणताही गुन्हा झाला तरी शिक्षा देण्याचा अधिकार फक्त न्यायव्यवस्थेला आहे. जमावाने कायदा हातात घेणे म्हणजे संविधान आणि लोकशाही मूल्यांना थेट आव्हान आहे. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, सोशल मीडियामुळे वाढलेला तात्काळ राग, अफवा आणि भावनिक प्रतिक्रिया समाजाला अधिक अस्थिर बनवत आहेत.

Sukram Savakare pc

बोदवडची ही घटना केवळ “क्राईम स्टोरी” नाही तर ती समाजाला आरसा दाखवणारी घटना आहे. संशयावरून हिंसा नव्हे, तर पुराव्यावर विश्वास हवा. कायदा हातात घेणे कोणत्याही समस्येचे उत्तर नाही. सोशल मीडियावरील द्वेष आणि चिथावणी रोखणे काळाची गरज आहे. पोलिस आणि नागरिक यांच्यातील विश्वास मजबूत होणे अत्यावश्यक आहे. एका क्षणाच्या रागाने दोन कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. समाजाने या घटनेकडे फक्त सनसनाटी बातमी म्हणून नव्हे, तर एक गंभीर इशारा म्हणून पाहण्याची गरज आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment