मद्याच्या नशेत सोमनाथ चांगलाच बडबडला— भिकनच्या लाथेने विहीरीच्या पाण्यात पडला

जळगाव : देशी अथवा गावठी मद्यप्राशनाचा अंमल सोमनाथ प्रभाकर पाटील या मजुरावर मोठ्या प्रभावाने विनाविलंब होत असे. मद्याचा प्रभाव झाल्यानंतर त्याचे झोकांड्या देत चालणे गावक-यांच्या अंगवळणी पडले होते. मद्याच्या अंमलाखाली तो स्वत:ला जगाचा बादशहा समजत असे. या जगाचे आपण एकमेव बादशहा आणि बाकी सर्व गुलाम असल्याचा त्याचा समज होत असे. चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा बुद्रुक या गावी राहणारा सोमनाथ हा एक शेत मजूर होता. दिवसभर शेतात राबल्यानंतर सायंकाळी त्याला मद्याच्या आहारी जाण्याची सवय जडली होती. मात्र कधी कधी तो दिवसा देखील मद्यपान करत असे. त्याच्या या सवयीमुळे शेतमालकाच्या शेतातील कामाची जडणघडण विस्कळीत होत असे. मद्याच्या नशेत त्याला कसलेही भान रहात नव्हते. समजावण्यासाठी आलेल्या व्यक्तीलाच तो शिवीगाळ सुरु करत असे. त्यामुळे मद्याच्या नशेत असतांना सहसा कुणी त्याच्या नादी लागत नव्हते. मद्याची धुंदी उतरल्यानंतर मात्र तो सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे व्यवहार करत असे. तो रहात असलेल्या बोरखेडा बुद्रुक गावानजीक बोरखेडा खुर्द या गावात भिकन प्रकाश पाटील हा रहात होता.

21 सप्टेबर रोजी भिकन पाटील हा त्याच्या मोटार सायकलने खेडगाव येथे जात होता. त्यावेळी वाटेत त्याला सोमनाथ भेटला. सोमनाथने भिकन यास तो कुठे जात असल्याची विचारणा केली. मी माझ्या कामानिमीत्त खेडगाव येथे जात असल्याचे भिकन याने सोमनाथ यास सांगितले. मी देखील खेडगाव येथे येतो असे सोमनाथ याने भिकन यास म्हटले. तु माझ्या सोबत आला तर तुझा शेतमालक माझ्या नावाने बोंब मारेल असे म्हणत भिकन याने सोमनाथला सोबत येण्यास नकार दिला. मात्र सोमनाथ त्याच्यासोबत येण्यासाठी आग्रही होता. तु माझ्या शेतमालकाला एक शब्द विचारुन घे आणि मला तुझ्यासोबत येऊ दे असे सोमनाथने भिकन यास विनंती केली.

अखेर भिकन याने सोमनाथच्या शेतमालकाची भेट घेतली. शेतमालकाच्या सहमतीने सोमनाथला सोबत घेत भिकन याने खेडगाव गाठले. भिकन व त्याचा शालक भटू वसंत सोनवणे असे दोघे जण खेडगाव येथे निम्म्या नफ्याने शेती करत होते. या शेतात कपाशीची निंदणी करणे, गवत भरणे व इतर किरकोळ कामे करायची होती. हे काम सोबत आणलेल्या सोमनाथकडून मजुरीने करुन घेण्याचे भिकन याने ठरवले. शेतात आल्यानंतर अगोदर दोघांनी सोबतच जेवण करुन घेतले. त्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत सोमनाथने गवत उचलण्याचे काम पुर्ण केले. त्यानंतर सोमनाथ यास मद्यपान करण्याची इच्छा झाली. मी लवकरच अल्प प्रमाणात मद्यपान करुन लगेच परत येतो असे भिकनला सांगून सोमनाथ गावातील मधुशाळेकडे गेला.

अर्ध्या तासाने सोमनाथ झोकांड्या देत डुलत डुलत जड झालेले नेत्र मिटत मिटत शेतात आला. आल्या आल्या त्याने भिकन यास शिवीगाळ सुरु केली. अर्धा तासापुर्वी मन लावून शेतीच्या कामात स्वत:ला वाहून घेणारा सोमनाथ आता मात्र मजुरी देणा-या भिकनलाच शिवीगाळ करत होता. त्याची अवस्था बघून भिकन त्याच्यावर चिडला. तु ……… पिण्यास आला आहेस की शेतात काम करण्यास आला आहे? असा खडा सवाल करत भिकन याने सोमनाथला विचारला. बराच वेळ झाला तरी सोमनाथचे झोकांड्या देण्याचे काम थांबले नव्हते.

जवळपास एक तासानंतर त्याने शेतातील गवत उचलण्यास सुरुवात केली. मात्र आता त्याच्या कामात पुर्वीचा उत्साह नव्हता. गवत उचलतांना अर्धे गवत त्याच्या हातातून खाली पडत होते. त्याची दुरावस्था बघून भिकन त्याला म्हणाला की तुला निट चालता येत नाही. तु थोडावेळ झोपून घे. भिकनचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी उलट सोमनाथ त्यालाच उद्धट बोलू लागला. भिकनचा हात झटकून “तु कोण मला सांगणारा?” असे म्हणत शेताच्या बांधाने चालू लागला. त्याचे बोलणे ऐकून व हावभाव बघून भिकनला राग आला. त्याने त्याला जवळ येण्यास बजावले. त्यावर तो त्याच्या दिशेने मागे मागे बघत पुढे पुढे चालत शिवीगाळ करु लागला. त्याच्या अशा वागण्याचा व बोलण्याचा भिकन यास भलता राग आला. कमी अधिक प्रमाणात सहन करणा-या भिकनचा संयम आता संपुष्टात आला.

संतापाच्या भरात भिकन याने जोरात धाव घेत सोमनाथला गाठले. तरी देखील मद्याच्या आहारी गेलेला सोमनाथची भिकनला शिवीगाळ सुरुच होती. चालता चालता दोघे विहीरीजवळ पोहोचले होते. संतापाच्या भरात भिकन याने सोमनाथच्या मानेवर हाताने मारले. मानेवरील मार चुकवण्यासाठी सोमनाथ खाली वाकला. सोमनाथ खाली वाकताच भिकनचा संताप अजूनच उफाळला. संतापाच्या भरात अपमानीत झालेल्या भिकनने सोमनाथला एक जोरदार लाथ मारली. भिकनची  जोरदार लाथ बसल्यामुळे मद्याच्या नशेतील सोमनाथ धाडकन विहीरीत पडला. पाण्याने तुडूंब भरलेल्या विहीरीत सोमनाथ पडताच धप्प असा आवाज आला. विहीरीतील पाण्याचे तरंग तयार होत सोमनाथ विहीरीच्या तळाशी जाण्यास वेळ लागला नाही. सोमनाथ विहीरीत पडताच भिकनची घाबरगुंडी वळली. काय करावे हे भिकनला समजत नव्हते. कुणाला काही न सांगता तो आपल्या मोटारसायकलने गुपचूप बोरखेडा गावी निघून आला. मद्यपानासाठी सकाळीच न्हावे या गावी गेलेला सोमनाथ अद्याप परत आलाच नसल्याची बतावणी भिकन गावात करु लागला.

21 सप्टेबरच्या या घटनेनंतर सोमनाथ घरी परत आलाच नाही. त्यामुळे त्याचे परिजन चिंतीत झाले. सर्वजण त्याचा शोध घेत होते. त्यानंतर 23 सप्टेबर 2021 रोजी सोमनाथचा मृतदेह विहीरीच्या तळापासून पाण्याच्या पृष्ठभागावर आला. तो मृतदेह पुर्णपणे कुजलेला होता. त्याचा चेहरा फुगून अनोळखी झाला होता. या घटनेची माहिती मेहुणबारे पोलिस स्टेशनला समजली. मृतदेहाची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक पवन देसले यांनी तातडीने आपल्या सहका-यांच्या मदतीने घटनास्थळ गाठले. या घटनेची माहिती भिकन पाटील याचा शालक भटू वसंत सोनवणे याने त्याला मोबाईलद्वारे दिली. अगोदरच घाबरलेल्या भिकन याने शालक भटू यास म्हटले की या प्रकाराची कुठेही वाच्यता करु नको. 21 सप्टेबरला संतापाच्या भरात लाथ मारल्यानंतर तो विहीरीत पडल्याचे भिकन याने भटू यास मोबाईलवर बोलतांना सांगीतले. विहीरीतून बाहेर काढलेला मृतदेह हा पोलिसांसह सर्वांसाठी अनोळखी होता. सोमनाथचा चेहरा पुर्णपणे विद्रुप झालेला होता. या प्रकरणी  मेहुणबारे पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. या अकस्मात मृत्यूचा तपास सहायक पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आला. तपासकामी मृतदेहाचे फोटो काढून घेत त्याच्या अंगावरील कपडे व बुट जप्त करण्यात आले. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मेहुणबारे पोलिसांनी त्याचे फोटो वर्तमानपत्रासह सोशल मिडीयाच्या माध्यमातून सर्वत्र प्रसारीत केले. तसेच मयताची ओळख पटवण्याचे आवाहन देखील केले. याशिवाय गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून या अकस्मात मृत्यूप्रकरणी मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम दिवसरात्र सुरुच होते.

मयत सोमनाथ

दरम्यान 5 ऑक्टोबर रोजी बोरखेडा बुद्रुक या गावातील अजबराव प्रभाकर पाटील यांनी मेहुणबारे पोलिस स्टेशन गाठले. आपला भाऊ सोमनाथ हा गेल्या 21 सप्टेबर पासून बेपत्ता असल्याचे त्यांनी स.पो.नि. पवन देसले यांना कथन केले. 21 सप्टेबर रोजी सोमनाथ हा बोरखेडा गावातील  भिकन पाटील याच्या मोटार सायकलवर बसुन गेला असल्याची माहिती अजबराव यांनी दिली. अजबराव पाटील यांच्या कथनानुसार मेहुणबारे पोलिस स्टेशनला मिसींग दाखल करण्यात आली. या मिसींगमधील सोमनाथचे वर्णन 23 सप्टेबरच्या मिसींगमधील वर्णनासोबत मिळतेजुळते होते. त्यामुळे अकस्मात मृत्यूमधील व्यक्ती हा सोमनाथ असावा अशी शंका स.पो.नि. पवन देसले यांना आली. त्यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने अजबराव पाटील यांना अकस्मात मृत्यु प्रकरणातील अनोळखी मयताचे फोटो, कपडे व बुट दाखवले. मृतदेहाचे फोटो, कपडे व बुट बघताच अजबराव पाटील यांनी फोटोतील व्यक्ती हा आपला भाऊ सोमनाथ असल्याचे ओळखले. कपडे व बुट देखील त्याचेच असल्याचे अजबराव पाटील यांनी पोलिसांना कथन केले. अशा प्रकारे अकस्मात मृत्यू प्रकरणी अनोळखी मृतदेहाची ओळख पोलिसांना पटली. मात्र तो विहीरीत कसा पडला? त्याला कुणी ढकलले की तो पडला याचा उलगडा होणे गरजेचे होते.

सोमनाथचा घातपात झाला असल्याचा संशय अजबराव पाटील यांनी स.पो.नि. पवन देसले यांच्याकडे व्यक्त केला. 21 सप्टेबर रोजी सोमनाथ हा भिकन पाटील याच्या मोटार सायकलवर बसून गेला होता अशी माहिती अ‍जबराव पाटील यांनी दिली. संशयीत म्हणून भिकन पाटील व त्याचा शालक भटू सोनवणे या दोघांची नावे पुढे करण्यात आली. या माहितीच्या आधारे भिकन यास पोलिस स्टेशनला चौकशीकामी बोलावण्यात आले. चौकशीत त्याने स.पो.नि. पवन देसले व त्यांच्या सहका-यांना खोटे सांगितले की त्या दिवशी सोमनाथ हा न्हावे या गावी माझ्या मोटारसायकलवरुन मद्यपानासाठी जाण्यास उतरुन गेला. त्यानंतर तो कुठे गेला हे आपणास माहिती नाही. त्यानंतर भटू वसंत सोनवणे याच्यासह इतर काही संशयीतांकडे वेळोवेळी आलटुन पालटून चौकशी करण्यात आली. मात्र भिकन व त्याचा शालक भटू हे दोघे विसंगत आणि उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे स.पो.नि. पवन देसले यांच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाही.

स.पो.नि. पवन देसले यांनी दोघांचे मोबाईल कॉल तपशील हस्तगत केला. त्यात घटना उघडकीस आल्याच्या तारखेला 23 सप्टेबर रोजी दोघांचे आपसात संभाषण झाल्याचे उघड झाले होते. संशयाची सुई दोघांवर फिरत असल्यामुळे स.पो.नि. पवन देसले व त्यांचे सहकारी त्यांच्या प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून होते. वेळोवेळी दोघांचे बोलणे कसे विसंगत आहे हे दोघांना विविध पद्धतीने पटवून देण्यात आले. याशिवाय सोबतीला पोलिसी खाक्या देखील वापरण्यात आला.

अखेर भिकन पाटील व त्याचा शालक भटू सोनवणे या दोघांनी आपला गुन्हा कबुल केला. मद्याच्या नशेत सोमनाथने आपला अपमान केल्याचे भिकन याने पोलिसांना सांगितले. सोमनाथचा अपमान जिव्हारी लागल्याने संतापाच्या भरात त्याला लाथ मारली व तो विहीरीत पडल्याची कबुली भिकन याने दिली. तसेच या घटनेची माहिती कुणाला द्यायची नाही असे भिकन याने त्याचा शालक भटू सोनवणे याला फोनवर दिली होती. भिकनच्या मारहाणीत सोमनाथ विहीरीत पडल्याची माहिती असून देखील भटूने ती पोलिसांपासून लपवून ठेवत गुन्ह्यात सहकार्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलिस नाईक प्रतापसिंग मथुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मेहुणबारे पोलिस स्टेशनला भिकन पाटील व भटू सोनवणे या दोघांविरुद्ध 30 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 188/21 भा.द.वि. 302, 294, 176, 323, 34 नुसार दाखल करण्यात आला. दोघा संशयीतांना अटकेनंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना सुरुवातीला तिन दिवस पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडीदरम्यान दोघांनी आपला गुन्हा कबुल केला. तपासादरम्यान संशयीत आरोपी भिकन प्रकाश पाटील याने गुन्हयात वापरलेली मोटारसायकल( एमएच-19-एएफ 9597) जप्त करण्यात आली. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर दोघा संशयीतांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगीचे आदेश देण्यात आले. दोघे संशयीत आरोपी सध्या जळगाव उप कारागृहात अटकेत आहेत. त्यांच्याविरुद्ध लवकरच दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. पोलीस अधीक्षक प्रविण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मेहुणबारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्यासह पोलीस उप निरीक्षक हेमंत शिंदे, पोलीस उप निरीक्षक योगेश ढिकले, पोलीस उप निरीक्षक प्रकाश चव्हाणके, पोलीस नाईक प्रताप मथुरे, पोलिस नाईक सिध्दांत शिसोदे, पो.कॉ. हनुमंत वाघेरे, पो.कॉ. गोरख चकोर, पो.कॉ. शैलेश माळी आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here