कालसर्प विधी करणारे पुजारी बाळगतात शस्त्र–पोलिस उगारतात त्यांच्याविरुद्ध कायद्याचे अस्त्र

नाशिक : कालसर्प योग पूजा विधीसाठी एका पुरोहिताकडे आलेले यजमानरुपी ग्राहक दुस-या पुरोहिताने पळवून नेल्याचा राग आल्याने झालेल्या तुंबळ हाणामारीप्रकरणी दोन्ही गटाच्या एकूण सात पुरोहितांविरुद्ध पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या ताब्यातील पुरोहितांच्या वाहनांमधे घातक शस्त्र आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध आर्म अँक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालसर्प पुजा विधीसाठी आलेल्या यजमानांची पळवापळवी आणि पुरोहितांमधील गुन्हेगारी वृत्ती या घटनेतून उघड झाली आहे.

शनिवारी मध्यरात्री हिरावाडी परिसरात तुंबळ हाणामारीचा प्रकार घडला. पुजाऱ्यांच्या वाहनात पोलसांना एक गावठी कट्टा व अकरा जिवंत काडतुसे आढळून आली. सात संशयित पुरोहित पंचवटी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

विरेंद्र हरिहरप्रसाद त्रिवेदी, आशिष विरेंद्र त्रिवेदी, मनिष विरेंद्र त्रिवेदी, सुनील आदित्य प्रसाद तिवारी, (सर्व रा. मोकळबाबानगर, हिरावाडी), आकाश नारायण त्रिपाठी, (केवडीबन), अनिकेत उमेश तिवारी (द्वारकेश हाइट, केवडीबन), सचिन नागेंद्र पांडे (तपोवन) अशी तुंबळ हाणामारी करणा-या पुरोहितांची नावे आहेत. पोलीस कर्मचारी सागर पांढरे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
सर्व संशयित पुरोहीत एकमेकांचे नातेवाईक असून ते त्र्यंबकेश्वर येथे पौरोहित्य व्यवसाय करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here