फेसबुकवर मैत्री केल्यानंतर खंडणीसाठी भडकली दोघा साथीदारांसह पोलिसांच्या जाळ्यात अडकली

आरोपी समवेत पोलिस पथक

बुलडाणा :  फेसबुकवर अनोळखी तरुणीसोबत त्याची ओळख झाली आणी तो मनातल्या मनात खुश झाला. सुरुवातीला तिनेच त्याला फोन केला. फोनवर दोघांचा हळूहळू संपर्क वाढत गेला. फोनवर गोड गोड बोलून तिने त्याला आपल्या जाळयात ओढले.

जाळयात आलेल्या तरुणाने तिची भेट घेतली. अर्थात या भेटीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यासाठीच तिने त्याला बोलावले होते. तिने व्हिडीओ रेकॉर्डींग करण्यासाठी आपले खास पंटर नेमले होते. त्याच्यासोबतच्या भेटीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग हाती येताच तिने त्याला खंडणी मागण्यास सुरुवात केली. २५ लाख रुपये दिले नाही तर हा व्हिडीओ वायरल करण्याची धमकी, बलात्कार तसेच अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्यानुसार आत टाकण्याची देखील धमकी ही तरुणी त्याला देऊ लागली.

कसा बसा त्याने चार लाखांचा वंदोबस्त करून स्थानिक गुन्हा शाखेशी संपर्क साधला व तक्रार देखील दाखल केली.  स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचला.  खंडणीची रक्कम हाती घेण्यासाठी महिला व तिचे दोन साथीदार आले होते. त्यानंतर तिघे पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकले. हनी ट्रॅपची ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील असून धमकी देणाऱ्या तरुणीस तिच्या दोघा साथीदारांसह अटक करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी देऊळगाव राजा येथील एका तरुणाची सोशल मीडियाच्या माध्यमातून जालना येथील एका महिलेसोबत ओळख झाली. त्यानंतर दोघांचे  संबंध वाढत गेले, भेटही झाली.  पुढे त्या महिलेने मला आणि माझ्या मैत्रिणीला ब्युटी पार्लर सुरू करायचा आहे. त्यासाठी तुमचे दुकान भाड्याने हवे आहे, असे त्याला फोनवर सांगितले.  मात्र आपले कोणतेही दुकान नाही असे सांगत त्याने फोन कट केला. त्यानंतर तिने पुन्हा त्याच्याशी अर्थात तक्रारदाराशी संपर्क केला.

तुमच्या परिचयातील किंवा ओळखीच्या एखाद्या व्यक्तीचा गाळा भाड्याने मिळवून द्याल का ? अशी विनंती तिने केली. अशा प्रकारे ती त्याच्या संपर्कात येत गेली, मात्र तिचा प्लॅन वेगळाच होता. पुढे त्यांच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. पुढे काही दिवसात ही मैत्री घट्ट झाली. दोघांनी भेटण्याचा निर्णय घेतला. त्यांची भेट ही झाली. अर्थात तिच्याकडे याच्या पुढील प्लॅन तयार होता . तिचे दोन साथीदार त्यांच्या ‘त्या’ भेटीचा व्हिडीओ रेकॉर्ड करणार होते.  

त्याप्रमाणे तो अर्थात तक्रारदार भेटीला आला आणि तिने तिच्या साथीदारांच्या मदतीने त्याच्यासोबतच आपला व्हिडीओ गुपचूप तयार केला. पुढे त्या भेटीचा व्हिडीओ वायरल करून पैशाची मागणी तिने सुरु केली.  पैसे न दिल्यास बलात्कार, अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल करु आणि तुझे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकी तक्रारदाराला देण्यात आली आणि तक्रारदर घाबरला.

तो विनंती करू लागला शिकार आपल्या जाळ्यात अडकल्याची जाणीव होताच या तिघांनी त्याच्याकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यातील चार लाख रुपयांचा पहिला हप्ता आधी देण्यास सांगितले. मग हा सर्व प्रकार काय आहे हे तक्रारदाराच्या लक्षात आले. त्याने स्थानिक गुन्हे शाखेकडे आपली तक्रार नोंदवली.

रोहिणी नितीन पवार (२९) असे त्या महिलेने स्वतःचे नाव तक्रारदारास सांगितले होते. जालना येथील जमुनानगर परिसरात रहात असल्याचे देखील ती त्याला म्हणाली होती. तिचे आणि तक्रारदाराचे व्हिडीओ तिचे साथीदार राहुल सर्जेराव गाडेकर (भिवगाव, देऊळगाव राजा) आणि सचिन दिलीप बोरडे (रा. वापरुळ) यांनी काढले असल्याचे तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

देऊळगाव राजा पोलिस स्टेशनला तक्रार दाखल होताच पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने सापळा रचला. खंडणीच्या पैशांची मागणी करण्यासाठी आरोपींनी तक्रारदाराला फोन केला. देऊळगाव राजा बसस्थानक परिसरात तक्रारदार गेल्यानंतर ते त्याला दुचाकीवर बसवून गावाबाहेर चिखली-जालना बाय पास रस्त्यावर घेऊन गेले.

तक्रारदाराने २५ लाखांपैकी चार लाख रुपयांचा पहिला हप्ता आरोपींना दिला. त्यानंतर तक्रारदाराने सापळा लावून बसलेल्या पोलिसांच्या पथकाला सुचक इशारा केला. त्यानंतर पोलिसांनी क्षणाचा वेळ न लावता या तिघांवर झडप घालत त्यांना जेरबंद केले.

पोलिसांनी आरोपींकडून चार लाख रुपये, व्हिडिओ असलेला मोबाइल, दुचाकीसह मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, पोलीस उपनिरीक्षक नागेशकुमार चतरकर, मुकंद देशमुख, रघुनाथ जाधव, लक्ष्मण कटक, भारत जंगले, अनुराधा उंबरहंडे यांनी ही कारवाई केली.

दरम्यान, आरोपींनी बुलडाणा आणि जालना जिल्ह्यातील अनेक व्यक्तीना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळले असल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे. अटकेतील तिघांकडून फसवणूक झालेल्या व्यक्तीनी आरोपीविरोधात तक्रार करावी, त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेने केले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here