विवाहितेसोबत सुरेश सापडला रंगेहात ! —– कु-हाडीच्या एका घावात झाला रक्तपात

जळगाव (क्राइम दुनिया न्यूज नेटवर्क): अनैतिक संबंधाचा शेवट हा वाईट असतो हे जगजाहीर आहे. मोह हे दुखा:चे  कारण असते. असे असले तरी क्षणिक सुखाच्या मोहात पडून लोक स्वत:वर  एखादी अप्रिय घटना ओढवून घेतात. अनैतिक संबंधातून वेळप्रसंगी एखादी खूनाची घटना देखील घडते. जळगाव शहरातील कानळदा रस्त्यावर असलेल्या आव्हाणे शिवारात 19 एप्रिलची रात्र उलटल्यानंतर 20 एप्रिलच्या पहाटे साधारण दोन वाजेच्या सुमारास एका परप्रांतीय मजूर तरुणाच्या खूनाची घटना घडली. अनैतिक संबंधाचा मोह या तरुणाच्या जीवावर बेतला आणि त्याला आपले अनमोल प्राण गमवावे लागले.

कानळदा रस्त्यावरील आव्हाणे शिवारात लक्ष्मण पाटील यांच्या मालकीची कापूस जीनींग आहे. या जिनींगमधे जवळपास अडीचशे परप्रांतीय कामगार काम करतात. बहुतेक कामगार याठिकाणी मध्य प्रदेशातून रोजगारासाठी आलेले आहेत. अविवाहीत सुरेश परमसिंग सोलंकी हा कामगार देखील या ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून जिनींगमधे रोजगारासाठी आला होता. मिळालेल्या माहितीनुसार याठिकाणी काम करणा-या रामलाल नाना बारेला या कामगाराच्या पत्नीसोबत सुरेश सोलंकी याचे सुत जुळले. सहवासातून प्रेम आणि प्रेमातून शारिरीक संबंधाची मजल दोघांनी मारली. दोघे लपूनछपून चोरीचोरी चुपके चुपके एकमेकांना भेटत होते. आपल्या पत्नीचे सुरेश सोलंकी याच्यासोबत लपूनछपून प्रेमसंबंध आणि बरेचकाही सुरु असल्याची कुणकुण रामलाल नाना बारेला याला लागली. त्यामुळे त्याने पत्नीला याप्रकरणी जाब विचारला. मात्र आमच्यात तसले काहीही संबंध नाहीत असे तिने पती रामलाल बारेला याला सांगितले.

20 एप्रिलच्या पहाटे साधारण दोन वाजेच्या सुमारास सुरेश सोलंकी आणि रामलाल बारेला याची पत्नी असे दोघे जण ठरल्याप्रमाणे रात्रीच्या वेळी एकमेकांना भेटले. एकमेकांना भेटल्यानंतर ठरल्यानुसार दोघांमधे संबंध प्रस्थापित झाले. संबंधानंतर दोघेजण जमीनीवर लेटून हसत खिदळत गप्पा करत होते. दरम्यान रामलाल बारेला यास जाग आली. पत्नी जागेवर नसल्याचे बघून तो विचारात पडला. आपली पत्नी एवढ्या रात्री कुठे गेली असेल याचा त्याने शोध सुरु केला. परिसरात शोध  घेत असतांना नजीकच्या एका शेतात त्याला त्याची पत्नी आणि सुरेश सोलंकी या दोघांचा आवाज ऐकू आला. त्यावेळी दोघेजण सोबत निजले होते.

संशयित आरोपी रामलाल बारेला

दोघांना एकमेकांच्या बाहुपाशात बघून रामलाल बारेला याचा राग मनात मावेनासा झाला. त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. तो दोघांसमक्ष हजर झाला. समोर रामलाल बारेला यास बघून दोघे प्रेमीयुगल मनातून पार घाबरले. रामलाल बारेला याचे सुरेश सोलंकीसोबत कडाक्याचे भांडण सुरु झाले. आता सुरेशची खैर नाही हे रामलालच्या पत्नीने ओळखले. तिने सुरेशला सोडून देण्याची पती रामलाल बारेला याच्याकडे विनवणी सुरु केली. मात्र संतापाच्या भरात रामलाल बारेला याने कु-हाडीचा एक जोरदार घाव सुरेशच्या डोक्यात घातला. कु-हाडीच्या एकाच घावात सुरेश सोलंकी जागीच जीवानिशी ठार झाला. सुरेशला मारु नको असे म्हणत असतांना झालेल्या झटापटीत रामलालच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसुत्र आणि पायातील पैजण रात्रीच्या अंधारात जमीनीवर पडले.

त्यानंतर 20 एप्रिलच्या सकाळी जिनिंगच्या मागील बाजूला असलेल्या भरत खडके यांच्या मालकीच्या शेतातील कडब्याची कुट्टी झाकून ठेवलेल्या प्लास्टिकच्या कापडावर सुरेशचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह लोकांना आढळला. या घटनेची माहिती जळगाव तालुका पोलिसांना समजली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा आदी पोलिस अधिकारी आपल्या स्टाफसह घटनास्थळी पोहचले.

घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता तरुणाचा मृतदेह पालथ्या अवस्थेत दिसून आला. मयत सुरेश सोलंकी हा पोलिसांच्या दृष्टीने सुरुवातीला अनोळखी होता. मयत सुरेश सोलंकी याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने जबर  वार केल्याचे देखील दिसत होते. मृतदेहापासून जवळच एका महिलेचे मंगळसुत्र आणि पायातील पैंजण आढळून आले. याशिवाय एक विस रुपयांचे नाणे देखील आढळून आले. पोलिसांनी या सर्व वस्तू तपासकामी ताब्यात घेत पुढील तपासाला सुरुवात केली. ज्याअर्थी घटनास्थळी महिलेचे मंगळसुत्र आणि पायातील पैंजण आढळून आले त्याअर्थी घटनेच्या वेळी व ठिकाणी एक महिला हजर होती हे स्पष्ट झाले. घटनास्थळावरील तरुणाच्या मृतदेहाचे राहणीमान बघता तो पावरा समाजाचा परप्रांतीय कामगार असल्याचा अंदाज बांधण्यात आला.

जवळच असलेल्या जिनींगमधे अनेक परप्रांतीय तरुण कामाला असल्याची माहिती चौकशीत पुढे आली. कानळदा रस्त्यावरील आव्हाणे शिवारात लक्ष्मण पाटील यांच्या मालकीच्या जिनिंगमधील सुरेश सोलंकी नावाचा कामगार 19 एप्रिलपासून बेपत्ता असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे ठेकेदार मनोज सोनवणे हे देखील त्याचा शोध घेत होते. दरम्यान घटनास्थळावरील मयत तरुण हा सुरेश परमसिंग सोलंकी हा असल्याचे तपासाअंती व चौकशीअंती निष्पन्न झाले. मृतदेहाची ओळख पटली तरी हा खून कुणी व कोणत्या कारणासाठी केला याचा मुख्य तपास बाकी होता.

या गुन्ह्याचा पुढील समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्यासह जळगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा व त्यांच्या सहका-यांनी सुरु केला. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांसह श्वानपथकाची मदत  घेण्यात आली. घटनास्थळापासून श्वानाने काही अंतरापर्यंत माग काढला. याशिवाय पोलिसांनी जिनिंग परिसरातील लहानमोठ्या टप-यांवर चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले. त्यात काही संशयास्पद फुटेज आढळून आले.

घटनास्थळावर आढळून आलेले महिलेचे पायातील पैंजण परिसरातील लोकांना दाखवले असता अशा प्रकारचे बाजारात रस्त्यावर मिळणारे नकली मंगळसुत्र आणि पैंजण पावरा समाजाच्या महिला वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे केवळ महिलांच्या चौकशीतच काहीतरी धागादोरा मिळू शकतो याची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खात्री पटली. त्यामुळे जिनींग परिसरातील पावरा समाजाच्या मजुर महिलांची सखोल चौकशी करण्यात आली.

अनेक मजुर महिलांची चौकशी केली असता घटनास्थळावर मिळून आलेले पैंजण आणि मंगळसुत्र हे परिसरात राहणा-या व मनातून घाबरलेल्या एका मजूर महिलेचे असल्याची माहिती हळूहळू पुढे आली. घटनेच्या काही दिवस अगोदर हे मंगळसुत्र आणि पायातील पैंजण तिने बाजारातून खरेदी केले होते अशी माहिती पुढे आली. घटनेच्या अगोदर हे मंगळसुत्र आणि पैंजण जी महिला अर्थात रामलाल बारेला याची पत्नी वापरत होती ती आता तिच्या गळ्यात दुसरेच मंगळसुत्र वापरत असल्याचे उघडकीस आले. महिला पोलिसांच्या मदतीने तिची सखोल चौकशी केली असता अखेर तिने सर्व घटनाक्रम कथन  केला.

रामलाल बारेला याच्या पत्नीचे मयत सुरेश सोलंकी या अविवाहीत तरुणासोबत सुत जुळले होते. अविवाहीत असलेल्या सुरेश सोलंकी याच्या अंगी भलताच जोश होता. घटनेच्या दिवशी घटनास्थळावर ती मयत सुरेश सोलंकी यास भेटण्यासाठी रात्रीच्या अंधारात दबक्या पावलांनी गेली होती. काही वेळाने तिचा पती रामलाल बारेला हा तिला शोधत शोधत त्याठिकाणी आला. दोघांना त्याने सोबत रंगेहाथ पकडले. दोघांना सोबत बघून रामलाल बारेला याचा राग मनात मावेनासा झाला. त्याने सुरेश सोलंकी याच्यासोबत झटापट केली. त्यावेळी रामलालची पत्नी रामलाल यास सुरेशला मारु नको अशी विनवणी करुन सांगत होती. दरम्यान कु-हाडीचा एकच घाव सुरेशच्या डोक्यात मागच्या बाजूने बसल्यानंतर तो मरण पावला. या झटापटील रामलाल बारेला याच्या पत्नीचे गळ्यातील मंगळसुत्र आणि पायातील पैंजण गळून पडले. हेच मंगळसुत्र आणि पायातील पैंजण पोलिसांच्या तपासात महत्वाचा दुवा ठरले.

या घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 122/24 भा.द.वि. 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक गणेश वाघमारे, पोलिस अंमलदार विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, नंदलाल पाटील, विजय पाटील, भगवान पाटील, चालक अशोक पाटील तसेच जळगाव तालुका पोलिस स्टेशनचे पो.नि. महेश शर्मा व त्यांचे सहकारी स.पो. नि. अनंत अहिरे, हे.कॉ. चेतन पाटील, हे. कॉ. प्रविण पाटील, हे.कॉ. अनिल फेगडे, धनराज पाटील, नरेंद्र पाटील, पो.कॉ. प्रविण कोळी, तुषार जोशी आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. अवघ्या दोन तासात या गुन्ह्याची उकल  स्थानिक गुन्हे शाखेसह जळगाव तालुका पोलिसांनी केली. अटकेतील संशयीत आरोपी रामलाल बारेला यास 25 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास जळगाव तालुका पोलिस स्टेशनचे पो.नि. महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here