शरीरसुखासाठी प्रियकराच्या नादात शोभा बहकली- पतीच्या हत्येत सहभागी होत जेलमधे जाऊन बसली

नाशिक (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : शोभा दिसायला देखणी होती. सर्व प्रकारचे भौतिक सुख तिच्या पायाशी लोळण घेत होते. घरात सर्व प्रकारचे सुख तिला लाभले होते. मात्र भौतिक सुख म्हणजे सर्व काही नसते. तिचा पती सचिन दुसाने तिला हवा तसा वेळ तिच्यासाठी देऊ शकत नव्हता. दिवसरात्र तो व्यवसाय आणि उद्योगात गुंतलेला रहात असे.

शोभाचा पती सचिन शामराव दुसाने याचे निफाड या गावी विविध व्यवसाय होते. वाहन खरेदी विक्री, प्लॉट खरेदी विक्री तसेच बांधकाम क्षेत्रात सचिन दुसाने याची चांगली पकड होती. नाशिक जिल्ह्यातील निफाड या गावी राहणा-या सचिनच्या मागे व्यवसायाचा मोठा व्याप होता. त्यामुळे त्याच्याकडे पैशांची सुबत्ता मात्र वेळेची कमतरता होती. दिवसरात्र व्यवसायात गुंतलेल्या सचिनला घरात पत्नीच्या आवडीनिवडी आणि गरजा बघण्याकडे वेळच मिळत नव्हता. बाहेरच्या व्यावसायीक जगात चांगल्याप्रकारे पकड असलेल्या सचिनवर घरात पत्नी शोभा त्याच्यावर नाराज रहात होती.

मानवी जीवांना भुक लागल्यानंतर त्या भुकेची पुर्तता होणे गरजेचे असते. पोटातील भुक आणि पोटाखालची भुक अशा दोन प्रकारची भुक मनुष्यजीवाला वेळच्या वेळी पुर्ण  करणे क्रमप्राप्त असते. पोटाची भुक मनुष्य कुठेही चार चौघात अथवा खानावळीत भागवून घेतो. मात्र पोटाखालची भुक भागवण्यासाठी मानवी संस्काराप्रमाणे चार भिंतीच्या आड योग्य त्या व्यक्तीसोबत भागवली जाते. ती भुक योग्य वेळी मिटली नाही तर अनेक लोक अन्य मार्गाने ती भुक भागवण्याचा प्रयत्न करतात. त्याला स्त्री अथवा पुरुष अपवाद नसतो. स्त्रीला आपल्या पतीकडून योग्य वेळी समाधानकारक शरीरसुख मिळाले नाही तर ती सुरुवातीला दमन मार्गाचा स्विकार करुन संयम ठेवते. मात्र “ते” सुखच मिळत नसेल तर अनेक स्त्रिया वाममार्गाने ते सुख घेण्यासाठी सरसावतात.

सचिन दुसाने याची पत्नी शोभा हिच्याबाबतीत देखील असेच झाले. दोघांच्या लग्नाला साधारण दहा ते पंधरा वर्ष झाले होते. दिवसागणीक सचिनच्या व्यवसायाचा विस्तार वाढत गेला. व्यावसायीक कामात दिवसाचे चोविस तास देखील त्याला कमी पडत होते. त्यामुळे पैसा भरपूर, मात्र वेळेची कमतरता असल्यामुळे पत्नीच्या आवडीनिवडी आणि तिची शरिरसुखाची गरज पुर्ण करणे सचिनला जमत नव्हते. त्यातच त्याला दारुचे व्यसनदेखील जडले होते. व्यावसायीक क्षेत्रातील सचिन तसा डॅशींग देखील होता. त्याच्या चारचाकी वाहनात घातक धारदार शस्त्र रहात होती असे म्हटले जाते.

डॅशींग स्वभाव असलेल्या सचिनचा समव्यावसायीक मित्र दत्तात्रय शंकर महाजन हा देखील निफाड या गावी रहात होता. दत्तात्रय महाजन हे देखील डॅशिंग स्वरुपाचे व्यक्तीमत्व होते. त्याचा देखील वाहन खरेदी विक्री व बांधकामाचा व्यवसाय होता. दोघे सम व्यावसायीक असल्यामुळे दोघांचे बोलणेचालणे नेहमी सुरु असायचे. कामाच्या निमीत्ताने दत्तात्रय महाजन याचे सचिनच्या घरी देखील येणेजाणे होते. सचिनची पत्नी शोभा दिसायला देखणी होती. मात्र सचिन तिला हवे असलेले “ते” सुख देण्यात कमी पडत होता. त्यामुळे घरात कितीही सुबत्ता असली तरी ती सुबत्ता तिच्यासाठी निरर्थक होती. तिला हव्या असलेल्या सुखाच्या शोधात ती होती. त्यातच कामानिमित्त घरी येणा-या दत्तात्रय महाजन सोबत तिची नजरानजर आणि ओळख झाली. दत्तात्रय देखील तिच्या नजरेला हवा तसा प्रतिसाद देण्यात परिपुर्ण ठरला. दोघांनी एकमेकांची गरज चलाखीने ओळखली होती. त्यामुळे दोघांनी एकमेकांना आपल्या गरजपुर्तीसाठी मदत करण्याचे मनोमन ठरवले. सचिनच्या गैरहजेरीत दोघांनी देहबोलीसह संवादातून आपल्या आवडीनिवडी समजून घेतल्या. त्यातून दोघे एकमेकांच्या जवळ येण्यास फारसा वेळ लागला नाही. शरीरसुख हा केंद्रबिंदू मानून दोघांनी उद्दीष्टपुर्तीच्या दिशेने वाटचाल सुरु केली.

अलिकडे सचिनने मद्याला जवळ केले होते. तो मद्याच्या आहारी गेला होता. त्यामुळे शोभा आणि दत्तात्रय एकमेकांच्या जवळ येण्यास अजूनच वाव मिळाला. एके दिवशी संधी साधून दोघांनी आपला कार्यभाग साध्य केला. आता शोभाला पती सचिनपेक्षा त्याचा मित्र दत्तात्रय जवळचा वाटू लागला. दत्तात्रय तिला हवी असलेली गरज पुर्ण करुन देत होता. त्यामुळे तिचे जड पडलेले अंग हलके होण्यास दत्तात्रयच्या माध्यमातून सोपे झाले होते. त्यामुळे तिला हायसे वाटत होते. पतीकडून पुर्ण होत नसलेली गरज दत्तात्रयकडून पुर्ण होत असल्यामुळे ती त्याच्यावर एकंदरीत खुश आणि समाधानी होती. वयाच्या पस्तीशीत शोभाचे तारुण्य चारचौघात खुलून दिसणारे होते. शोभा व दत्तात्रय यांनी परस्परांना एकमेकांचे मोबाईल क्रमांक दिले व घेतले होते. त्यामुळे केव्हा, कधी व कुठे भेटायचे या संदेशाची देवाणघेवाण करणे दोघांना सोयीचे झाले होते.

दत्तात्रय सोबत शोभाचे संबंध असल्याची कुणकुण सचिनला लागण्यास वेळ लागला नाही. त्यामुळे तो शोभासोबत वाद घालू लागला. मद्याच्या नशेत तो तिला जास्तच शिवीगाळ करत असे. ती त्याला जवळ येऊ देत नव्हती. त्यामुळे आता त्याने दत्तात्रयसोबत देखील वाद घालण्यास सुरुवात केली. सचिन डॅशींग असल्यामुळे तो दत्तात्रयला वेळोवेळी मारुन टाकण्याची धमकी देऊ लागला. दत्तात्रय देखील तेवढाच डॅशींग होता. त्याने देखील वेळप्रसंगी त्याला संपवण्याची तयारी केली होती. आपले संबंध सचिनला कळून चुकले आहे हे शोभा व दत्तात्रय या दोघांना समजले होते. त्यामुळे त्याचा काटा काढण्यासाठी शोभाने दत्तात्रयसोबत चर्चा केली.

सचिनचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव करण्यासाठी दत्तात्रयने त्याला ठार करण्याचा सुरुवातीला प्रयत्न करुन पाहिला. मात्र त्याचा तो प्रयत्न असफल ठरला. त्यामुळे सचिनला ठार करण्यासाठी शोभाच्या मदतीने व सहमतीने दत्तात्रयने वेगळे नियोजन सुरु केले. काही दिवसांपासून शोभा आणि दत्तात्रय या नियोजनात गुंतले होते. दरम्यान आपल्या काही स्थानिक मित्रांसह सचिन भद्रा मारोतीच्या मंदीरात देवदर्शनासाठी गेला होता. सचिनच्या गैरहजेरीत शोभाच्या सहमतीने व इतर सहका-यांच्या मदतीने दत्तात्रयने सचिनला ठार करण्याचे नियोजन शिघ्रगतीने सुरु केले. भद्रा मारोतीचे देवदर्शन आटोपून घरी येण्यापुर्वी सचिनला ठार करण्याची तयारी सर्वांनी पुर्ण केली. दत्तात्रयसह त्याचे साथीदार संदिप किटटु स्वामी, अशोक मोहन काळे, गोरख नामदेव जगताप, पिंटु उर्फ बाळासाहेब मारुती मोगरे, मुकरम गहिर अहेमद असे सर्वजण स्विफ्ट डिझायर आणि एंडेव्हर या वाहनांनी सचिनच्या घरी शोभाच्या हजेरीत आले. सचिन देवदर्शन आटोपून घरी येण्यापुर्वी त्याला ठार करण्याचे व त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे नियोजन शर्थीने सुरु झाले होते. 

22 जानेवारी 2022 रोजी रात्रीच्या वेळी भद्रा मारोतीचे दर्शन आटोपून सचिन निफाड येथे परत आला. त्याच्या सोबत असलेल्या सर्व मित्रांना त्याने डस्टर कारने घरी सोडले. त्यानंतर तो घरी परत आला. दरम्यान त्याच्या गैरहजेरीत त्याच्याच घरात त्याच्या हत्येची तयारी पुर्ण झाली होती. घरी आल्यानंतर सचिनने डस्टर कार नेहमीच्या जागेवर उभी केली. कारमधून खाली उतरुन तो घरात आला. घरात अगोदरच शोभा व दत्तात्रयसह त्याचे साथीदार दबा धरुन हजरच होते. सचिन घरात आल्यानंतर दत्तात्रयने त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जोरदार वार केला. या हल्ल्यात तो धाडकन जमीनीवर कोसळला. काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले. देवदर्शन आटोपून घरी आलेला सचिन मृत्युमुखी पडला होता.

दत्तात्रय व त्याच्या साथीदारांनी सचिनचा मृतदेह त्याच्याच डस्टर कारने पेठ येथील कोटंबी घाटात आणला. कोटंबी घाटात तो मृतदेह फेकून देण्यात आला. त्यानंतर गुन्ह्यात वापरलेले हत्यार व मोबाईलची विल्हेवाट लावण्याकामी रिक्षाचालक गोरख नामदेव जगताप व पिंटु उर्फ बाळासाहेब मारुती मोगरे यांनी दत्तात्रयला मदत केली. ज्या डस्टर कारने सचिनचा मृतदेह पेठ येथील घाटात आणला ती कार संदीप किट्टू स्वामी याने नाशिकच्या अंबड परिसरातील आयटीआय लिंक रोडवरील भंगार व्यवसायिक मुकरम जहिर अहेमद शहा यास विक्री केली.  भंगार व्यावसायीक मुकरम याने ती कार तोडण्याची तयारी पुर्ण केली होती. अशा प्रकारे मृतदेहाची तसेच गुन्हयात वापरलेल्या सर्व पुराव्याच्या वस्तूंची विल्हेवाट लावण्याचे देखील नियोजन जवळपास पुर्णत्वास आले होते. गुन्हा करतांना सर्वांनी पुरेपुर काळजी घेत कुठलेही धागेदोरे अथवा पुरावे सुटणार नाही याची काळजी घेतली होती.

भद्रा मारोतीचे दर्शन आटोपून सचिन घरी परत आला हे त्याच्या मित्रांना माहिती होते. त्या मित्रांना त्याने घरी सोडले होते. मात्र नंतर सचिन बेपत्ता झाला होता. त्याचा कुठेही ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे त्याची सर्वत्र शोधाशोध सुरु करण्याचा देखावा त्याची पत्नी शोभा हिने सुरु केला.  सचिनच्या भावाने देखील त्याची सर्वत्र शोधाशोध सुरु केली. दोन दिवसानंतर अखेर त्याने सचिन बेपत्ता झाल्याची तक्रार निफाड पोलिस स्टेशनला दिली. सचिनच्या हातावर “राम” असे गोंदले असल्याची माहिती त्याने मिसींग दाखल करतांना पोलिसांना आवर्जून दिली. हाच धागा नंतर पोलिसांना उपयोगी ठरला.

मिसींग दाखल झाल्यानंतर दुस-याच दिवशी पेठ पोलिस स्टेशन हद्दीतील कोटंबी घाटात सचिनचा मृतदेह परिसरातील लोकांना आढळून आला. याबाबतची माहिती पेठ पोलिस स्टेशनला कळवण्यात आली. या घटनेची माहिती समजल्यानंतर पेठ पोलिस स्टेशनचे पो.नि. दिवानसिंग वसावे यांनी आपल्या सहका-यांसह  घटनास्थळ गाठले. पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी देखील या मृतदेहाची ओळख पटवून तपास करण्याच्या सुचना त्यांना दिल्या. तसेच या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. हेमंत पाटील यांना दिला. मयत सचिन दुसाने  हा पोलिसांसह सर्वांच्या दृष्टीने अनोळखी होता. दरम्यान निफाड पोलिस स्टेशनला दाखल झालेली सचिन दुसाने याच्या बेपत्ता होण्याची मिसींग यादी सर्वत्र जाहीर झालेली होती.  सचिनच्या भावाने निफाड पोलिस स्टेशनला मिसींग दाखल करतांना बेपत्ता सचिनच्या हातावर “राम” गोंदलेले असल्याचे स्पष्ट केले होते. त्या मिसींग मधील बेपत्ता सचिनचे कपडे व हातावरील गोंदलेले “राम” ही अक्षरे बिनचुक निघाली.  त्यामुळे सचिनची पत्नी शोभा व त्याचा भाऊ तसेच इतर नातेवाईकांना बोलावून मृतदेहाची पडताळणी करण्यात आली. तो मृतदेह बघून सचिनचा भाऊ धाय मोकलून रडू लागला. सचिनची पत्नी शोभा देखील शोक व्यक्त करण्याचा देखावा करु लागली.  मयताच्या हातावरील “राम” या अक्षरांनी ओळख पटवण्यात राम दिला होता. अशा प्रकारे मयताची ओळख पटली. आता त्याची हत्या कुणी व का केली याचा तपास बाकी होता. सचिनची मिसींग निफाड पोलिस स्टेशनला दाखल असली तरी मृतदेह पेठ पोलिस स्टेशन हद्दीत आढळून आला होता. त्यामुळे याप्रकरणी पेठ पोलिस स्टेशनला त्याच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा 25 जानेवारी 2022 रोजी गु.र.न. 9/22 भा.द.वि. 302 नुसार दाखल करण्यात आला.

नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांच्या निर्देशनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. हेमंत पाटील  यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने या गुन्ह्याच्या समांतर तपासाला सुरुवात केली. या तपासकामी विविध पथकांची निर्मीती करण्यात आली. मयत सचिन, मयताची पत्नी शोभा यांचे कॉल डीटेल्स काढण्यात आले. कॉल डीटेल्स दरम्यान मयत सचिनची पत्नी शोभा व गावातील दत्तात्रय यांच्यात अनेकदा बोलणे झाले असल्याचे आढळून आले. ज्या रात्री मयत सचिन भद्रा मारोतीचे दर्शन घेऊन निफाड येथे परत आला होता त्या रात्री शोभा व दत्तात्रय  यांचे मोबाईल लोकेशन सारखे आले होते. त्यामुळे संशयाची सुई दत्तात्रय महाजन याच्यावर स्थिर होण्यास वेळ लागला नाही. 

मयत सचिन दुसाने याची पत्नी व दत्तात्रय शंकर महाजन यांच्यात प्रेमसंबंध असल्याची गुप्त माहिती पोलिस पथकाला बातमीदारांकडून समजली होती. त्या माहितीच्या व संशयाच्या आधारे दत्तात्रय शंकर महाजन यांची चौकशी करण्यात आली. तो गणेशनगर येथे असल्याचे समजताच पथकाने त्याला गणेश नगर येथून चौकशीकामी ताब्यात घेतले. पोलिस पथकाने त्याची सखोल चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने सर्व हकीकत कथन करण्यास सुरुवात केली. मयत सचिनची पत्नी शोभा दुसाने व इतर साथीदारांच्या मदतीने आपण हा खून त्याच्या घरातच केल्याचे दत्तात्रयने कबुल केले. खून केल्यानंतर मृतदेह पेठ येथील घाटात साथीदारांच्या मदतीने फेकून दिल्याचे त्याने कथन केले. त्यानंतर दत्तात्रयने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने क्रमाक्रमाने त्याच्यासह शोभा व इतर साथिदार संदिप किटटु स्वामी रा – नाशिक (सराईत गुन्हेगार – डोसा विक्रेता), अशोक मोहन काळे रा. दत्त नगर चिंचोळे नाशिक (सराईत गुन्हेगार), गोरख नामदेव जगताप (रिक्षा चालक) नाशिक, पिंटु मोगरे उर्फ बाळासाहेब मारुती मोगरे रा निफाड जिल्हा नाशिक, मुकरम गहिर अहेमद – नाशिक (भंगारवाला) अशा सात जणांना ताब्यात घेत अटक केली.

सचिनच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली डस्टर कार (एमएच 43 एडब्ल्यू 1308) जप्त करण्यात आली. ही कार संशयित आरोपी संदिप किटटू स्वामी याने अंबड आयटी लिंक रोडवरील भंगार व्यवसायिक मुकरम जहिर अहेमद शहा (26) यास विक्री केली होती. मुकरम याने ती कार भंगारमधे तोडण्यास सुरुवात केली होती. मात्र पोलिसांनी ती जप्त करत मुकरम याला देखील अटक केली. या गुन्ह्यात पोलिसांनी एकूण 7 संशयित आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून एकुण तिन कार, 6 मोबाईल व हत्येची सुपारी देण्याघेण्याकामी असलेली एक लाखाची रोकड हस्तगत केली आहे. सर्व मुददेमाल व गुन्ह्यातील संशयीत आरोपीतांना पुढील तपास व कारवाईकामी पेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. 

नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. हेमंत पाटील व त्यांचे सहकारी सहा.पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील, सहायक फौजदार मुंढे, पोलिस हवालदार वसंत खांडवी, नितिन मंडलिक, हनुमंत महाले, प्रविण सानप, विनोद टिळे, हेमंत गरुड, हेमंत गिलबिले, सुधाकर बागुल आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पेठ पोलिस स्टेशनचे पो.नि. दिवानसिंग वसावे व त्यांचे सहकारी करत आहेत. या गुन्हयात आरोपीतांनी कुठल्याही प्रकारचा पुरावा सोडला नसतांना पोलिसांनी कौशल्याचा वापर करुन तपास पुर्ण केला. सर्व आरोपी अटकेत असून न्यायालयीन कोठडीत आहेत.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here