प्रियकराच्या मदतीने तरुणीने केली स्वत:च्याच घरात चोरी

काल्पनिक छायाचित्र

भिवंडी : मित्रांच्या मदतीने तरुणीने स्वतःच्याच घरात तेरा लाखांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.  भिवंडी शहराच्या नारपोली पोलीस स्टेशन हद्दीत कामतघर येथील अष्टविनायक बिल्डिंगमधील फ्लॅटमध्ये चोरी झाली होती. या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे लॅचलॉक बनावट चावीने उघडून घरातील 13 लाख 21 हजार रुपये किंमतीचे सोने, चांदीचे दागिने व रोख रकमेची चोरी झाली होती. या घटनेप्रकरणी घरमालक सुवर्णा सोनगीरकर यांनी 22 जुलै रोजी नारपोली पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती.

पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे ,सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर,नारपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पो.नि. मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने धुळे येथून याप्रकरणी प्रेमीयुगुलास अटक केली. चोरट्यांच्या अटकेनंतर धक्कादायक बाब पुढे आली.

या घरफोडीच्या गुन्ह्यात घरातील माहितगार व्यक्तीअसू शकते या दिशेने तपास करण्यात आला होता. त्या अनुषंगाने फिर्यादी सुवर्णा सोनगीरकर यांच्या मुलीकडे चौकशी केली असता तिच्या बोलण्यात विसंगती दिसून आली. तिच्याकडे अधिक तपास केला असता तिने आपल्या प्रियकरासोबत कट रचून ही घरफोडी घडवून आणल्याचा प्रकार उघड झाला. तपास पथकाने धुळे येथून प्रतीक तुषार लाळे (21) व हेमंत दिलीप सौन्दाणे (21) दोघे रा.देवपूर धुळे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या कडून 55 हजार रोख व 8 लाख 96 हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले.

या घटनेतील आरोपींमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीवर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र लवकरच या मुलीवर देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती नारपोली पोलिसांनी दिली. या कारवाईत पोलीस उप निरीक्षक राहुल व्हरकाटे ,पोहवा सोनवणे, सातपुते ,पोना सोनगीरे , पो शि बंडगर, शिरसाठ, ताटे यांनी तपासात परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here