महिला वैद्यकीय अधिका-यासोबत गैरवर्तन, उपसरपंचाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

काल्पनिक छायाचित्र

जळगाव : यावल तालुक्यातील एका जबाबदार महिला वैद्यकीय अधिका-याच्या ताब्यातील शासकीय निवासस्थानी अनाधिकारे प्रवेश करुन उपसरपंचाने असभ्य वर्तन केल्याचा प्रकार काल रात्री घडला. या प्रकरणी आज सकाळी यावल पोलिस स्टेशनला उपसरपंचासह एक दाम्पत्य, त्यांच्या दोन मुली व इतर 30 ते 35 जणांविरुद्ध विनयभंग, गैरकायद्याची मंडळी जमवून सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ करुन चप्पलेने मारहाण करण्यासाठी धावून येणे, अ‍ॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की एक महिला अधिकारी यावल तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रावर सेवारत आहे. त्याच ठिकाणी असलेल्या सरकारी निवासस्थानात तिचा रहिवास आहे. पतीसोबत घटस्फोट झाल्यामुळे ती महिला वैद्यकीय अधिकारी विभक्त राहते. काल ३० जुलै रोजी आपले वैद्यकीय कामकाज आटोपून फ्रेश होण्यासाठी ती महिला अधिकारी आपल्या शासकीय निवासस्थानात आली होती. त्यावेळी त्या गावातील उप सरपंच अचानक अनाधिकारे तिच्या खोलीत आला. त्यावेळी ती महिला बाथरुम मधे होती. मात्र वेळोवेळी सांगून देखील तो सरपंच घरातून बाहेर जाण्यास तयार नव्हता. त्यामुळे तिच्या मनात लज्जा निर्माण झाली.

हे सरकारी निवासस्थान असून मी या ठिकाणी येवू शकतो तु मला विचारण्याचा काय संबंध असे बोलून तिच्यासोबत वाद घालू लागला. तुम्ही आधी घरातून बाहेर निघा असे सांगत असतांना नंतर काहीवेळाने त्या उप सरपंचाने महिला वैद्यकीय अधिका-यास डीलिव्हरी पेशंट्साठी अ‍ॅंम्ब्युलन्स हवी असल्याचे म्हणाला. तुम्ही आधी घरातून बाहेर निघा मी ड्रायव्हरला फोन करते असे म्हटल्यानंतर तो रागारागाने निघून गेला. जातांना त्याने थांब तुला दाखवतो अशी धमकी दिली.

काही वेळाने सदर महिला वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात आली. त्यावेळी रात्रीचे पावणे नऊ वाजले होते. त्यावेळी त्या उप सरपंचाने आपल्या सोबत ३०-४० जणांचा जमाव दवाखान्यासमोर आणला होता. त्यासोबत रिक्षातून डिलीव्हरी साठी पेशंटला देखील आणले होते. त्यावेळी अतिशय अर्वाच्य शिवीगाळ करत त्याने महिलेस धमकावले. अंट्रॉसीटीच्या गुन्हयात अडकवण्याची धमकी देण्याची भाषा महिलेसोबत करण्यात आली.

सोबत आलेल्या काही महिलांनी पायातील चप्पल काढून धावून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी यावल पोलिस स्टेशनला आज भाग 5 गु.र.न. 129/20 भा.द.वि. 353, 354 ए, 1(1), 452, 351, 143, 147, 149, 294, 504, 506, 188, 186, 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरु आहे.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here