शेतक-यांची फसवणूक करणा-या तिघांना अटक

जळगाव : शेतक-यांचा मौसंबीचा माल मध्यस्तामार्फत घेऊन तो परस्पर विकून पैसे न देता फरार होणा-या तिघा भामट्यांना चाळीसगांव ग्रामीण पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने अटक केली आहे. कोणताही मागमुस नसतांना आपले अस्तित्व लपवून तिघे आरोपी मोकाट फिरत असतांना त्यांना अटक केल्याने फसवणूक झालेल्या शेतक-यांच्या चेह-यावर समाधान पसरले असून त्यांनी पोलिस पथकाला धन्यवाद दिले आहेत.

माधव छगन जाधव हे चाळीसगाव तालुक्यातील शिंदी येथील येथील शेतकरी आहेत. मोबीन शेख उस्मान व रिजवान शेख मोबीन (कुसुंबा रोड मालेगाव) या दोघांनी शिंदी गावातील आतिष सुभाष फाटे यांच्या मध्यस्तीने माधव जाधव यांच्यासह गावातील तेरा शेतक-यांचा मौसंबीचा सुमारे 33 लाख 86 हजार रुपयांचा शेतमाल खरेदी करुन तो परस्पर विकून टाकला होता. त्या शेतमालाचे पैसे न देता फसवणूक केल्याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला तिघांविरुद्ध भा.द.वि. 406,420, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषणानुसार गुन्हे शोध पथकाने आरोपी मोबीन शेख उस्मान यास सुरत -गुजरात येथून, आरोपी सतिष फाटे यांस शिंदी व आरोपी रिजवान शेख मोबीन यांस मालेगांव येथून ताब्यात घेत अटक केली आहे. पो.नि. संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, पोना नितीन आमोदकर, पोकॉ निवृत्ती चित्ते, पोना नंदकुमार जगताप आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल हा कोणत्याही गावातील कमीशन एजन्टमार्फत अथवा बाहेरील जिल्ह्याच्या व्यापाऱ्याला विकतांना व्यापाऱ्याची पूर्ण खात्री करुन विकावा, जेणेकरुन आपला माल विकत घेऊन व्यापारी आपली फसवणूक करणार नाही असे आवाहन पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शेतकरी बांधवांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here