जळगाव : दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचे आक्षेपार्ह स्टेटस मोबाईलवर ठेवल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका राजकीय नेत्याच्या भाषणाचा काही अंश संपादीत व फेरफार केलेले वादग्रस्त स्टेटस ठेवल्यामुळे शिरसोली गावातील दोन गटात वाद झाला होता. उद्भवलेल्या या वादामुळे वाहनांचे नुकसान व सामाजीक वातावरण बिघडले होते.
या स्टेटसच्या घटनेला अनुसरुन शिरसोली गावात झालेल्या दगडफेकीत जखमी झालेल्या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार नऊ ते दहा जणांविरुद्ध एक वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दगडफेकीत घराच्या खिडकीच्या काचा फुटून झालेले नुकसान, ट्रक व कारचे झालेले नुकसान आदी घटनांचा या फिर्यादीत उल्लेख आहे. दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही, समाजाची हानी होणार नाही याची खबरदारी सोशल मिडीयावर बाळगण्याचे आवाहन या घटनेच्या निमीत्ताने केले जात आहे. शिरसोली येथे झालेल्या जातीय दंगलीतील आरोपीतांना पो.नि. प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, रविंद्र चौधरी, रतीलाल पवार, गोविंदा पाटील, समाधान आकडे आदींनी रात्रभर परिसर पिंजून काढत अटक केली. त्यांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.