वृद्धांना गोंधळात टाकून लुबाडणा-यास अटक

जळगाव : बाबा तुमच्या बोटातील अंगठी चांगली आहे. मला देखील अशीच अंगठी करायची आहे. जरा दाखवा बर….असे म्हणत वृद्धांच्या बोटातील सोन्याची अंगठी आपल्या कब्जात आल्यानंतर धूम ठोकणा-या सराईत भामट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अशा प्रकारे गुन्हे करण्याची पद्धत वापरुन सोन्याचे दागिने बाळगणा-या वृद्धांना हेरुन, त्यांना गोंधळात टाकून लुबाडणा-या भामट्याने काही दिवसांपुर्वी पारोळा शहरातील वृद्धास लुबाडले होते. डिगंबर कौतिक मानकर (न्हावी) (52) रा. आसोदा रोड हरिओम नगर, जळगाव असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याला जळगाव शहरातील हरीओम नगर भागातून अटक करण्यात आली आहे.

या घटनेप्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न.196/22 भा.द.वि. 420,406 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले व त्यांचे सहकारी सफौ युनुस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ दिपक शांताराम पाटील, पोना नंदलाल दशरथ पाटील, पोना भगवान तुकाराम पाटील, पोना प्रमोद अरुण लाडवंजारी, पोना राहुल मधुकर बैसाणे, पोकॉ सचिन प्रकाश महाजन करत होते. दरम्यान या गुन्ह्याच्या तपासात डिगंबर कौतीक मानकर या सराईत गुन्हेगारावर संशयाची सुई स्थिरावली होती. डिगंबर मानकर हा अशा स्वरुपाचे गुन्हे करत असल्याची माहिती पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने त्याला हरिओम नगर भागातून अटक केली. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून वृद्धांना फसवून, गोंधळात टाकून त्यांचे दागिने घेऊन पसार होण्याचे त्याचे गुन्हेगारी उद्योग आहेत. बारा दिवसापूर्वी पारोळा येथील नगरपालीका चौकात एका वृध्द इसमास त्याच्या जवळच्या नातेवाईकांचे खोटे नाव सांगून त्यांच्याकडील सोन्याची अंगठी घेत डिगंबरने पलायन केले होते. पुढील तपासकामी त्याला पारोळा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here