नवरदेवाचे अगोदरच होते महिलेसोबत लफडे!– फसवणूकीच्या गुन्ह्यानंतर निघाले त्याचे वाभाडे

मलकापूर : लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम सुरु असतांना नवरदेवाचे एका महिलेसोबत असलेले प्रेमसंबंध उघड झाले. याप्रकरणी पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नवरदेवाला अटक करण्यात आली. हळद लागलेल्या नवरदेवाला 30 एप्रिल रोजी अटक झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

मलकापूर शहरातील एका तरुणीचा विवाह मोताळा तालुक्यातील बोराखेडी येथील रहिवासी अमोल गणेश पारेकर या तरुणासोबत ठरले होते. सुरत येथे लोको पायलट पदावर कार्यरत असलेल्या अमोल पारेकर याचे एका महिलेसोबत लग्न ठरल्याच्या आधीपासून प्रेमसंबंध सुरु होते. या प्रकाराची वधू पक्षाकडील मंडळींना खबर नव्हती. दरम्यान 20 मार्च रोजी दोघांचा साखरपुडा देखील झाला आणि 1 मे ही दोघांच्या लग्नाची तारीख ठरली.

30 एप्रिल रोजी वधु पक्षाकडील मंडळींना आलेल्या फोनमुळे खळबळ उडाली. तुमच्या भावी जावयासोबत माझ्या पत्नीचे प्रेमसंबंध सुरु असल्याचे पलीकडून गुजरात राज्यातुन बोलणा-या व्यक्तीने कथन केले. खात्री पटण्यासाठी त्याने तरुणीच्या मोबाईलवर तिच्या भावी पतीचे महिलेसोबत असलेले फोटो देखील पाठवले. आपले पितळ उघडे पडल्याचे इकडे नवरदेवाला देखील समजले. त्याने आपल्या भावांसह थेट नवरीचे घर गाठून दमदाटी करण्यास सुरुवात केली. आपले त्या विवाहीतेसोबत संबंध असल्याचे त्याने कबुल केले. तसेच मी तिला सोडू शकत नसल्याचे देखील कबुल केले. वाद वाढत गेल्यामुळे मी तुझ्यासोबत लग्न करु शकत नाही असे म्हणत तो होणा-या वधू तरुणीच्या अंगावर धावून गेला. अखेर या फसवणूक प्रकरणी नवरदेव अमोल पारेकर व त्याची आई, तीन भाऊ व त्याच्या परिवारातील अकरा जणांविरुद्ध सहा लाख पंचेचाळीस हजार रुपयांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर नवरदेव अमोल पारेकर यास अटक करण्यात आली. त्याला दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास पोलिस उप निरीक्षक स्मिता म्हसाये करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here