कंजरवाड्यातील दगडफेक, मारहाण प्रकरणी आरोपी ताब्यात

जळगाव : जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात जुन्या वादातून मंगळवार दि. 3 मे 2022 च्या रात्री साडे नऊच्या सुमारास दोन गटात दगडफेकीसह मारहाणीचा प्रकार घडला होता. या घटनेत लाठा काठ्यांसह कोयत्याचा वापर करण्यात आला होता. या घटनेप्रकरणी दोन परस्पर विरोधी गुन्हे एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आले आहेत.

विक्की विष्णु बागडे (38) रा. कंजरवाडा, जाखनीजनगर जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 10 एप्रिल रोजी रामनवमी उत्सव मिरवणूकीत त्यांचा मोठा मुलगा दिव्यकांत गेला होता. त्यावेळी ललीत उमाकांत दिक्षीत व त्याच्या साथीदारांनी दिव्यकांत यास मारहाण केली होती. या मारहाणीबाबत त्यावेळी एमआयडीसी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर तक्रार मागे घेण्यासाठी ललीत दिक्षीत व त्याचे मित्र दडपण टाकत धमकी देत होते.

3 मे रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास ललीत उमाकांत दिक्षीत, बबलु हिरालाल धनगर, आकाश अजय सोनार, अनिल रसाल राठोड, अविनाश रामेश्वर राठोड, स्वप्निल सोनु ठाकुर, निशांत चौधरी व त्याचे सोबत काही साथीदार हातात कोयता व काठ्या घेवून आले. रामनवमीच्या दिवशी दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी सर्वांनी आरडाओरड सुरु केली. ललीत उमाकांत दिक्षीत याने कोयत्याने विक्की बागडे यांचा पुतण्या गोलू बागडे याच्या कमरेवर वार केले. आकाश अजय सोनार याने त्याचे हातातील दगड विक्की बागडे यांच्या मांडीवर टाकला. इतरांनी त्यांच्या घराचा दरवाजा, खिडकी व परीसरातील दुचाकी वाहनांचे नुकसान केले.

दरम्यान आकाश अजय सोनार या तरुणाने देखील तक्रार दिली आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार 3 मे रोजी त्याला मयुर बागडे याने रामनवमीच्या दिवशी झालेला वाद मिटवण्यासाठी कंजरवाडा परिसरात बोलावले. त्यानुसार आकाश, ललित दिक्षीत, बबलू धनगर, अविनाश राठोड, निशांत चौधरी असे सर्वजण तेथे गेले. त्यावेळी मयुर जमनादास बागडे, केतन गौतम बागडे, नाक्या विशाल, टारझन अरुण दहेकर, सिंगीबाई आकाश दहेकर, बाबु कंजर, गोपाल दशरथ माचरे व इतरांनी त्यांच्यावर हल्ला केला. आकाश दहेकर याने बबलु धनगर याच्या डोक्यात कोयत्याने हल्ला केला. मात्र तो हल्ला बबलु याने चुकवला. मयुर जमनादास बागडे, केतन गौतम बागडे, नाक्या विशाल, टारझन अरुण दहेकर, सिंगीबाई आकाश दहेकर, बाबू कंजर, गोपाल दशरथ माचरे व इतर अनोळखी काही तरुणांनी हल्ला केला. यात वाहनांचे देखील नुकसान झाले.

या घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलिसांचे वाहन दाखल झाले. आलेल्या पथकाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. घटनास्थळाला पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी भेट दिली. गुन्हा करणारे रेकॉर्डवरील आरोपी असल्याने त्यांना तत्काळ अटक करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी दिले. सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करुन आरोपींना कांचन नगर व कासमवाडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रमेश अहिरे, सचिन मुंडे, रामकृष्ण पाटील, सुधीर साळवे, हेमंत कळसकर, नाना तायडे, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, गोविंदा पाटील, गणेश शिरसाळे, मुकेश पाटील, सचिन पाटील आदींनी आरोपींना ताब्यात घेतले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here