महिलेच्या निर्घृण हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप

खामगाव : संगनमताने महिलेची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी खामगाव येथील न्यायालयाने तिघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तालुक्यातील कोक्ता येथे घडलेल्या या घटनेचा निकाल 13 मे रोजी तदर्थ जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक एकच्या न्यायाधीश प्रज्ञा एस. काळे यांनी दिला.

कोक्ता येथील आत्माराम डोलारे व त्यांची पत्नी गजाबाई डोलारे हे दोघे 14 ऑगस्ट 2017 रोजी नजीकच्या ड्रीमलॅन्ड सिटीमध्ये बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. पडीक शेतात बकरी गेल्याच्या कारणावरुन गावातील वासुदेव पांडुरंग सावरकर याने डोलारे दाम्पत्यासोबत वाद घालत त्यांना मारहाण केली होती. याप्रकरणी जलंब पोलिस स्टेशनला दोघा पक्षाने परस्परविरोधी गुन्हे दाखल केले होते.

19 ऑगस्ट 2017 रोजी गजाबाई डोलारे ही महिला बकऱ्या चारत असताना दुपारी दोनच्या सुमारास वासुदेव पांडुरंग सावरकर, पांडुरंग उकर्डा सावरकर, महादेव पांडुरंग सावरकर असे तिघे जण गजाबाई जवळ आले. पांडुरंग सावरकर व महादेव सावरकर या दोघांनी गजाबाईचे हात धरुन ठेवले. वासुदेव सावरकर याने हातातील कुऱ्हाडीने गजाबाईच्या मानेवर आणि पाठीवर वार करत तीची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर तिघांनी तेथून पलायन केले. या घटनेची माहिती समजताच गजाबाईचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. मात्र गजाबाई मृत्युमुखी पडली होती.

अनिल आत्माराम डोलारे यांनी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे जलंब पोलिस स्टेशनला तिघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास स.पो.नि. एस. आर निचळ यांनी केला. या खटल्याचे कामकाज सुरु असतांना सरकार पक्षाच्या वतीने एकुण बारा साक्षीदार तपासण्यात आले. विनोद धनोकार, कैलास झनके, सहदेव कळस्कार, गणेश ताठे यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. साक्षीदारांची साक्ष व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता रजनी बावस्कर-भालेराव यांचा युक्तिवाद ग्राह्य धरण्यात आला. न्यायालयाने वासुदेव सावरकर, पांडुरंग सावरकर, महादेव सावरकर या तिघांना कलम 302 नुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय प्रत्येकी विस हजार रुपये याप्रमाणे एकुण 60 हजार रुपये दंड देखील सुनावण्यात आला. दंडातील पन्नास हजार रुपये रक्कम तक्रारदारास नुकसानभरपाईच्या रुपात देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दंड न भरल्यास अजून दोन वर्षाचा सश्रम कारावास सुनावण्यात आला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here