प्रेमसंबंधात मुकेश अडसर असल्याची झाली खात्री!– इमारतीवरुन फेकून लावली त्याच्या जीवनाला कात्री

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): निखील राजेश सोनवणे, अमर शांताराम बारोट, पराग उर्फ बबलु रविंद्र आरखे आणि मुकेश रमेश राजपूत असे चौघे बालपणापासूनचे मित्र होते. बालपणापासून चौघे मित्र मोलमजुरी करत मोठे झाले. अमर आणि पराग हे दोघे मित्र बालपणी स्टेडीयम कॉम्प्लेक्समधील एका आईस्क्रीमच्या दुकानात कामाला होते. मुकेश हा याच व्यापारी संकुलातील एका पावभाजीच्या गाडीवर कामाला होता. निखील हा देखील काही दिवसांनी त्याच पावभाजीच्या गाडीवर रोजंदारीने कामाला लागला. काही दिवस जळगावला पावभाजीच्या गाडीवर काम केल्यानंतर निखील औरंगाबादला मामाच्या कटींग दुकानावर जावून केस कर्तनाचे काम शिकला. त्यानंतर जळगावला भावाच्या कटींग दुकानावर त्याने काम केले. या कामातून त्याने कमी अधिक प्रमाणात धनसंचय केला. या धनराशीतून निखीलने सन 2016 मधे शिवाजी पुतळ्यानजीक चायनीजची हातगाडी सुरु केली. जवळपास एक वर्ष निखीलने शिवाजी पुतळ्याजवळ कोर्ट चौकात चायनीजची गाडी चालवली. मात्र त्याला याठिकाणी हवे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे त्याने हा व्यवसाय बंद केला. दरम्यानच्या कालावधीत सन 2012 मधे अमर बारोट याने स्टेडियम कॉम्पलेक्स परिसरात चायनीजची गाडी सुरु केली होती. व्यवसाय निट चालत नसल्यामुळे निखीलने मित्र अमरच्या चायनीज गाडीवर दोनशे रुपये रोजंदारीने काम सुरु केले. अमरच्या गाडीवर मुकेश हा कुक म्हणून कामाला होता.   

अमरची चायनीज गाडी व्यवस्थित सुरु असली तरी त्याच्या अंगी असलेली गुन्हेगारी वृत्ती त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. तो पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुन्हेगार होता. चायनीज व्यवसायातून मिळणा-या श्रमाच्या कमाईपेक्षा त्याला गुन्हेगारीतून मिळणारे पैसे प्रिय वाटत होते. त्यामुळे तो नेहमी नेहमी जेलच्या वा-या करत असे. अमर जेलमधे गेल्यानंतर त्याच्या चायनीज गाडीचा सर्व ताबा निखीलकडे रहात होता. अमरच्या गैरहजेरीत अर्थात तो जेलमधे असतांना निखील या चायनीज गाडीचा मालक म्हणून रहात होता. त्याच्या हाताखाली मुकेश हा कुक म्हणून कामाला होता.

मुकेश यास मद्यपानाचे व्यसन होते. मद्यपी मुकेशची पत्नी दिसायला देखणी होती. मद्यपान केल्यानंतर तो घरी वेळेवर जात नव्हता. त्यामुळे तो कुठे आहे? काय करतो आहे? घरी केव्हा येणार आहे? याची चौकशी मुकेशची पत्नी निखील यास त्याच्या मोबाईलवर करत असे. पलीकडून फोनवर मुकेशच्या पत्नीचा मंजुळ स्वर कानावर पडला म्हणजे निखीलची कळी खुलत असे. कामाच्या निमीत्ताने देखील निखीलचे मुकेशच्या घरी येणे जाणे सुरु होते. त्यातून दोघांची नजरानजर होत असे. दोघात त्या निमीत्ताने संवाद घडून येत होता. सुरुवातीला नजरानजर, नंतर संवाद व त्यातून दोघात सहवास घडून आला. बघता बघता मुकेशच्या पत्नीला पती मुकेशपेक्षा निखील जवळचा वाटू लागला. अडी अडचणीत मुकेशच्या पत्नीला निखील सढळ हस्ते नॉन रिफंडेबल मदत करु लागला. त्यातून दोघे अधिकच जवळ आले. बघता बघता दोघात प्रेमाची पालवी फुटण्यास वेळ लागला नाही. दारुच्या नशेत मुकेशला स्वत:चे भान रहात नव्हते. त्याचाच गैरफायदा त्याची पत्नी आणि निखील या दोघांनी घेण्यास सुरुवात केली होती. दोघात अनैतीक संबंध प्रस्थापित झाल्याचे म्हटले जाते.

मद्यपी मुकेशची पत्नी आणि निखील हे दोघे एकमेकांच्या खुप जवळ आले होते. अगदी पती पत्नीप्रमाणे दोघे एकमेकांवर हक्क गाजवत होते. दोघांचे प्रेमसंबंध परिसरातील लोकांना समजण्यास वेळ लागला नाही. परिसरात दोघांच्या संबंधाची चर्चा सुरु झाली होती. हा प्रकार मुकेशच्या कानावर आल्याने तो भानावर आला. त्यामुळे मुकेश व त्याच्या पत्नीमधे वाद सुरु झाला. वादाचे कारण अर्थातच निखील हा होता. निखीलमुळे मुकेश आणि त्याची पत्नी यांच्यातील वादाने शिखर गाठले होते. मात्र मुकेशच्या पत्नीला निखील अर्थपुरवठा करत असल्यामुळे तिला पती मुकेशपेक्षा निखील जवळचा वाटत होता. मुकेशचे बाहु दणकट होते. त्याची शरीरयष्ठी पिळदार आणि धडधाकट होती. त्याच्या पोटावर सिक्स पॅक होते. त्याची बोलीबच्चन मोहात तिला टाकणारी होती. तसेच तो तिची सर्व प्रकारची इच्छा देखील पुर्ण करत होता. त्यामुळे तिला निखीलची चटक लागली होती. मुकेश मद्यपानाच्या अती आहारी गेल्याचा फायदा अर्थातच त्याची पत्नी आणि निखील या दोघांना झाला होता. त्यांच्यात अनेकदा संबंध आल्याचे म्हटले जाते.

अमर प्रमाणेच मुकेशची पावले देखील गुन्हेगारीच्या दिशेने वळली होती. एकदा मुकेशने रामानंद नगर परिसरातील एक चायनीजची गाडी फोडली होती. या गुन्ह्याच्या तपासात मुकेशला अटक झाली होती. त्यावेळी पुन्हा एकदा त्याच्या पत्नीसोबत निखीलचे संबंध आले. मुकेशला जेलमधून बाहेर काढण्याकामी निखीलनेच मदत केली होती. या कालावधीत मुकेशच्या पत्नीला निखील सोबत मोठ्या प्रमाणात आकर्षण निर्माण झाले होते. बघता बघता निखील आणि मुकेशच्या पत्नीचे संबंध परिसरात सर्वांना समजले होते. तसेच या संबंधामुळे पती पत्नीत भांडण देखील होत असे. मुकेश हा आपल्या प्रेम संबंधात अडथळा ठरत असल्याचे त्याची पत्नी आणि निखील यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याला संपवण्याचा विचार निखीलने केला. त्याच्या या निर्णयाला मुकेशच्या पत्नीने सहमती दिली. तिला देखील मुकेश नकोसा झाला होता. तिचा त्याच्यातील इंटरेस्ट अगदीच कमी झाला होता. त्यामुळे अमर आणि त्याचा मित्र पराग उर्फ बबलु या दोघांच्या मदतीने मुकेशचा कायमचा काटा काढण्याचे निखीलने ठरवले.

एके दिवशी अमर, बबलु आणि निखील असे तिघे जण गोलाणी मार्केटनजीक असलेल्या तायडे गल्लीत एकत्र आले. अमर बारोट आणि बबलु (पराग) आरखे  या दोघांनी आपल्या कर्जबाजारीपणाची खंत निखील जवळ व्यक्त केली. निखीलकडे धनलक्ष्मीचा ब-यापैकी ओघ असल्यामुळे दोघांनी त्याच्याजवळ आपली व्यथा कथन करण्यास सुरुवात केली. आपल्याकडे स्वयंपाकाचा गॅस भरण्यासाठी देखील पैसे नसल्याची खंत बबलु उर्फ पराग याने निखील जवळ कथन केली. उधारी मागणारे लोक आपल्यामागे तगादा लावत असून   काहीही करुन मला तुझ्याकडून पैसे हवे असा हेका बबलूने निखीलजवळ लावला. मुकेश देखील आपल्यामागे त्याच्या पैशांचा तगादा लावत असून तो आपल्याला मारण्याची भाषा करत असल्याचे बबलुने निखीलजवळ सांगितले. त्यावेळी निखीलने केवळ विस रुपये देऊन बबलू यास शांत केले. तिघांनी एका आडोशाला बसून मद्यपान करण्यास सुरुवात केली. मद्यप्राशन करत असतांना निखीलने दोघांना आपल्या प्रेमकथेची व्यथा ऐकवली. 

मुकेशच्या पत्नीसोबत आपले संबंध असून आपल्या संबंधात मुकेश आडवा येत असल्याचे निखीलने दोघांना सांगितले. मुकेश यास संपवायचे असून मला तुम्हा दोघांची मदत हवी असल्याचे देखील निखीलने यावेळी दोघांना सांगीतले. मुकेश यास संपवले तर मी तुम्हाला दोघांना विस हजार रुपये देईन असे बोलून निखीलने दोघांवर मोहाचा सापळा फेकला. या मद्यप्राशनाच्या पार्टीतच मुकेशला ठार करण्याचा कट रचण्यात आला. यावेळी अमर बारोट याने निखीलच्या मैत्रीखातीर मुकेश यास ठार करण्यास होकार दिला. मी असाही गुन्हेगारच आहे. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मी नेहमीच जेलमधे जात असतो. त्यामुळे मी तुझ्या मैत्रीसाठी मुकेश यास ठार करेन असे अमरने निखील यास शब्द दिला. मुकेशचे बबलूकडे पैसे घेणे होते. त्यामुळे तो बबलू यास त्याचे पैसे सातत्याने मागत होता. प्रसंगी मारण्याची भाषा देखील करत होता. त्यामुळे बबलू देखील मुकेश यास ठार करण्याच्या कटात सामील झाला. अशा प्रकारे त्या दिवशी तिघांच्या मद्यपार्टीचा समारोप झाला आणि मुकेश यास संपवण्याचे दोघांनी निश्चित केले. त्यानंतर निखीलच्या मार्गदर्शनाखाली अमर आणि बबलू हे दोघे जण पुढील कामकाजाची दिशा ठरवत होते. निखीलच्या अर्थ पुरवठ्यावर दोघे जण मुकेश यास वेळोवेळी मद्यपान करण्यास आमंत्रण देत होते. फुकटची दारु मिळते म्हणून मुकेश देखील अमर आणि बबलू बोलावतील तेथे जात होता. अमर आणि  बबलू मात्र त्याला ठार करण्याची संधी शोधत होते. 

नेहमीप्रमाणे 9 मे रोजी तिघे मित्र शहरातील जुने बस स्थानक परिसरात एकत्र आले. त्याठिकाणी तिघांनी अगोदर गांजा स्मोक केला. गांजा स्मोक केल्यानंतर तिघांच्या अंगात एनर्जी आली. अजुन एनर्जी येण्यासाठी तिघे दारु विकत घेण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरात आले. अमर आणि बबलूच्या मनात मुकेशला ठार करण्याचे नियोजन सुरु होते. निखीलच्या सांगण्यावरुन ते दोघे मुकेशला ठार करण्यासाठी संधीची वाट बघत होते. आपल्याला फुकटची दारु मिळते म्हणून मुकेश दोघांसोबत चालत होता. रेल्वे स्टेशन परिसरातील एका दारु दुकानावरुन अमर व बबलु यांनी रात्री दहा वाजेच्या आसपास देशी दारु विकत घेतली. त्यानंतर गोलानी मार्केट परिसरात एका गाडीवरुन पावभाजी घेतली. जवळच एका ओट्यावर बसून त्यांनी पावभाजीसोबत मद्यप्राशनाचा कार्यक्रम केला. आपल्या जीवनातील ही अखेरची रात्र, अखेरचे जेवण आणि अखेरचे मद्यपान असल्याची माहिती मुकेश नव्हती. केवळ नियतीला पुढील घटनाक्रम माहित होता.

जेवण केल्यानंतर बोलत बोलत तिघे जण गोलानी मार्केटमधे आले. मुकेशवर मद्याचा अंमल चांगल्याप्रकारे झालेला होता. हळूहळू तिघे जण गोलानी मार्केटमधील एका दैनिकाच्या कार्यालयाच्या वर तिस-या मजल्यावर गेले. त्याठिकाणी अचानक अमरच्या मनात मुकेशला खाली ढकलून ठार करण्याचा कुविचार चमकून गेला. त्याने आपल्या मनातील कुविचार बबलू यास बोलून दाखवला. मुकेशच्या म्हणण्याला बबलूने लागलीच दुजोरा दिला. आता मुकेशच्या जीवनाची अंतिम घटीका अगदी समीप आली. यावेळी रात्र असल्यामुळे गोलानी व्यापारी संकुलात अगदी सन्नाटा पसरलेला होता. मागचा पुढचा क्षणाचाही विचार न करता दोघांनी मिळून मुकेश यास तिस-या मजल्यावरुन खाली फेकून दिले. मद्याच्या नशेत तिस-या मजल्यावरुन तळ मजल्यावर पडल्यानंतर मुकेशच्या डोक्याला मार लागून तो  क्षणार्धात मरण पावला. तो जमीनीवर पडल्यानंतर एक जोरात आवाज आला. मात्र मार्केटमधे सन्नाटा पसरलेला असल्यामुळे कुणालाही या घटनेची लवकर माहिती झाली नाही. आपले काम फत्ते झाले आणि आपल्याला कुणीही पाहिले नाही असा समज करत भराभर पावले टाकत दोघे जण पाय-या उतरुन खाली आले. मात्र मार्केट मधील सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला होता. तोल जावून तो एकटाच कोसळला असा देखावा करण्याचा दोघांचा प्रयत्न होता.

मुकेश खाली पडल्यानंतर दोघांनी जळगाव शहर पोलिस स्टेशन गाठले. आमचा मित्र मुकेश हा तोल जावून गोलानी मार्केटच्या तिस-या मजल्यावरुन खाली पडल्याची त्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक लागलीच जे.व्ही. चॉईस या तळमजल्यावरील दुकानाजवळ घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसांना मदत करत दोघांनी मुकेश यास सामान्य रुग्णालयात दाखल करण्याकामी मदत केली. मुकेश मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर घाबरलेल्या अमर आणि बबलू यांनी घर गाठले. निव्वळ पैशांच्या लालसेपोटी निखीलच्या सांगण्यावरुन दोघा मित्रांनी मुकेश या मित्राचा जीव घेतला होता. पोलिस कारवाईच्या भितीने दोघे घरातच लपून बसले. सुरुवातीला या घटनेप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला 16/22 सीआरपीसी 174 नुसार अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. पोलिस नाईक धनराज निकुंभ यांनी या अकस्मात मृत्यू प्रकरणी प्राथमिक तपास सुरु केला.

तपासादरम्यान मयत मुकेशचे दोन्ही भाऊ उमेश राजपूत आणि संदिप राजपूत या दोघांचे जवाब घेण्यात आले. दोघा भावांनी मुकेशच्या मरणाबाबत संशय व्यक्त केला. मुकेशचा मृत्यू हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करत दोघा भावांनी या घटनेची चौकशी करण्याची विनंती पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांना केली. या संशयास्पद घटनेच्या चौकशी दरम्यान पो.नि. विजयकुमार ठाकुरवाड यांच्यासह स.पो.नि. संदीप  परदेशी, हे.कॉ. भास्कर ठाकरे, हे.कॉ. विजय निकुंभ, पो.कॉ. रतन गिते आदींनी घटनास्थळ असलेल्या गोलानी मार्केट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलीत केले.

टेक्नीशियन विपुल उदेशी यांच्या मदतीने दि. 9 मे रोजी रात्री घडलेल्या घटनेच्या फुटेजची पाहणी केली असता त्यात तथ्य आढळून आले. रात्री सव्वा अकरा ते साडे अकरा दरम्यानच्या कालावधीत हा प्रकार घडल्याचे तपासणीत आढळून आले. तिस-या मजल्यावर पाय-या चढून जातांना तिन तरुण त्यात दिसून आले. दोघांनी मिळून एकाला खाली जमीनीवर ढकलून दिल्यानंतर दोन तरुण झपाझप पावले टाकत खाली उतरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधे आढळून आले. या फुटेजमधे दोघा तरुणांचे चेहरे स्पष्ट दिसत असल्याने लागलीच संशय व्यक्त करणा-या मयत मुकेशच्या भावासह नातेवाईकांना बोलावून घेण्यात आले. त्यांना ते फुटेज दाखवण्यात आले. फुटेज पाहताच त्यांनी तिघांना ओळखले. हे दोघे माझ्या भावाचे मित्र अमर शांताराम बारोट उर्फ लखन रा. कासमवाडी, रचना कॉलनी जळगांव आणि पराग उर्फ बबलु रविंद्र आरखे रा. न्यु सम्राट कॉलनी असल्याचे सांगितले.

सहायक फौजदार संजय शंकरराव बडगुजर यांनी सरकारतर्फे फिर्यादी होत या घटनेप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. सदर गुन्हा भाग 5 गु.र.नं. 116/22 भा.दं.वि. 302, 120 (ब), 34 नुसार दाखल करण्यात आला. निखील राजेश सोनवणे, अमर उर्फ लखन शांताराम बारोट व पराग उर्फ बबलु रविंद्र आरखे या तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांना अटक करण्यात आली. यातील अमर हा पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध जळगाव शहर, अमळनेर, जिल्हापेठ, पाचोरा व नंदुरबार आदी पोलिस स्टेशनला चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच पराग उर्फ बबलु याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप  परदेशी व त्यांचे सहकारी हे.कॉ. भास्कर ठाकरे, हे.कॉ. विजय निकुंभ, पो.कॉ. रतन गिते, तेजस मराठे, ज्ञानेश्वर उन्हाळे, नामदेव पाटील, उमेश भांडारकर आदी करत आहेत. संशयीत आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. 

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here