आशाबाईच्या मनावर भिकनने चढवला होता साज!– भुषणच्या हत्येचे उलगडले राज आणि उतरला माज!!

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : आशाबाई आणि भुषण तळेले हे दाम्पत्य मध्य प्रदेशातील नेपानगर नजीक भातखेडा या दुर्गम भागात रहात होते. नेपानगर परिसरात रोजगाराच्या संधी दुर्मीळ होत्या. त्यामुळे दोघे पती पत्नी कामधंद्याच्या शोधात जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात आले. जळगाव शहराच्या एमआयडीसी परिसरात चटई आणि दालमिलचे अनेक उद्योग आहेत. या उद्योग क्षेत्रात मनुष्यबळाची गरज भासत असते. त्यामुळे अनेक परप्रांतीय एमआयडीसी नजीक असलेल्या कुसुंबा, रायपूर, कंडारी, चिंचोली या भागात राहण्यास येतात. तेथून ते एमआयडीसी परिसरात रोजगाराच्या ठिकाणी ये जा करतात.

मध्य प्रदेशातून आलेली आशाबाई आपल्या पतीसह रायपुर गावातील भाड्याच्या घरात रहात होती. भाड्याच्या घरात दोघांनी आपला संसार थाटला. सुरुवातीच्या काळात आशाबाईचा पती भुषण याने एका चटई कंपनीत कामाला सुरुवात केली. बघता बघता दोघांचा संसार फुलत गेला. दोघांच्या संसार वेलीवर एक पुत्र आणि एक कन्या अशा दोन रत्नांचे आगमन झाले. दरम्यानच्या काळात आशाबाई आणि भुषण यांच्या जीवनात भिकन शामसिंग परदेशी या ठेकेदाराचे आगमन झाले. भिकन हा लेबर कॉन्ट्रॅक्टर होता. विविध कंपन्यांमधे मजूर पुरवण्याचे काम तो करत होता. एका कंपनीत त्याने आशाबाई आणि भुषण या पती पत्नीला रोजगार मिळवून दिला. 

आशाबाई दिसायला देखणी होती. सात वर्षापुर्वी ती ठेकेदार भिकनच्या संपर्कात आली. त्यावेळी ती अवघी अठरा वर्षाची होती. आशाबाई आणि भुषण यांच्या घरी ठेकेदार भिकनचे कामानिमीत्त येणे जाणे सुरु होते. एकदम तरुण असलेल्या आशाबाईचे सौंदर्य भिकनच्या मनात पहिल्याच नजरेत ओव्हरफ्लो झाले. दोन मुलांची आई असलेली आशाबाई दिसायला एखाद्या अप्सरेसमान होती. तीची कोमल काया हलक्या फुलक्या कामासाठी योग्य होती. मात्र दुर्दैवाने तिला मजुरी कामात स्वत:ला वाहून घ्यावे लागले. हिरे, माणिक आणि मोत्याची पारख एखादा जोहरीच करतो असे म्हणतात. भिकन हा जणू काही तिच्यासाठी जोहरी ठरला होता. तो तिच्याकडे चमचम करणारा डायमंड अर्थात हि-याच्या रुपात बघत होता. सुर्याची तिरकस कोवळी किरणे रत्नरुपी आशाबाईच्या अंगावर पडली म्हणजे भिकनच्या पारखी नजरेतून ती त्याच्याकडे परावर्तीत होत असे. वास्तविक भिकन हा एक विवाहीत आणि तिच्यापेक्षा जवळपास पंधरा वर्षाने मोठा होता. त्याला देखील तिच्यासारखेच एक कन्या आणि एक पुत्र रत्न लाभले होते.

mayat bhushan talele

पती भुषणच्या तुलनेत ठेकेदार भिकन हा तिच्यासाठी एक धन्नाशेठ ठरला होता. त्याच्या खिशात कायम शंभर, पाचशे रुपयांच्या नोटा तिच्या नजरेस पडत होत्या. ज्याप्रमाणे भिकनला आशाबाईमधील हि-याची पारख झाली होती. तशीच आशाबाईला भिकनमधील धन्नाशेठची पारख झाली होती. एखादा गरजू व्यक्तीच धन्नाशेठची चांगल्या प्रकारे पारख करु शकतो. अशा प्रकारे तिने धन्नाशेठची तर त्याने हि-याची पारख केली होती. दोघांनी पहिल्याच नजरेत एकमेकांची आपापल्या आवडी आणि सोयीनुसार एकमेकांची पारख करुन घेतली होती. आशाबाईसोबत जवळीक करण्यासाठी तिचा पती भुषण हा भिकनसाठी एकप्रकारे सेतूची भुमिका पार पाडत होता. भुषणला भेटण्याच्या निमीत्ताने भिकन आशाबाईसोबत जवळीक करत होता.

दिवसामागून दिवस जात होते. भिंतीवरील कॅलेंडरच्या तारखा बदलत होत्या. घड्याळाची काटे पुढे पुढे सरकत होती. काळ त्याच्या गतीनुसार मार्गक्रमण करत होता. भुषण आणि आशाबाई या दाम्पत्याला भिकन ठेकेदाराकडे काम करत असतांना जवळपास तिन ते चार वर्षाचा कालावधी सहज उलटून गेला. या कालावधीत भिकनचा आशाबाईसोबत अनेकदा संपर्क आला. या संपर्कातून दोघातील सहवास वाढला. सहवासातून त्यांच्यात प्रेमाचा अंकुर फुलला. या अंकुराचे कळीत आणि नंतर फुलात कधी रुपांतर झाले हे त्यांना कळले देखील नाही.

Dr. pravin mundhe SP

एके दिवशी भिकन याने संधी साधून हळूच आशाबाईजवळ आपले प्रेम व्यक्त करत प्रेमाची मागणी घातली. तिने त्याच्यातील धन्नाशेठची पारख अगोदरच केली होती. त्यामुळे तिने त्याला होकार दिला. अडीअडचणीत मदत करण्याची अपेक्षा तिने त्याला बोलून दाखवली. त्याने देखील तिच्यातील हि-याची पारख केली होती. त्यामुळे त्याने देखील तिच्या प्रस्तावाला लागलीच होकार दिला. दोघे एकमेकांची गरज पुर्ण करण्यास सज्ज झाले होते. उत्साहाच्या भरात भिकनने आशाबाईला तिन वेळा मोबाईल घेऊन दिले. त्याचे तिच्यावर प्रेम जडले होते. त्यामुळे तो तिला तिच्या मागणीप्रमाणे वेळोवेळी अर्थ पुरवठा करत होता. त्याच्या अर्थ पुरवठ्यावर ती खुश रहात होती. त्यामुळे तिला पती भुषण पेक्षा भिकन ठेकेदार जवळचा वाटत होत. तो तिचे सर्व लाड पुर्ण करत होता. तिच्यासोबत तो भुषणला देखील कमी अधिक प्रमाणात समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करत होता. एकदा त्याने भुषणला एका कंपनीत माल धुलाईचा ठेका मिळवून देत संतुलन कायम ठेवले आणि आपली जादू या दाम्पत्यावर कायम ठेवली.  संधी साधून भिकन हळूच आशाबाईला फिरायला देखील घेऊन जाऊ लागला.

आपल्या पश्चात भिकन आशाबाईला भेटण्यास घरी येत असल्याचे भुषणला समजण्यास वेळ लागला नाही. परिसरात देखील भिकन आणि आशाबाईचे एकमेकांवरील प्रेम हा चर्चेचा विषय झाला होता. त्यामुळे भुषण हा त्याची पत्नी आशाबाईवर नाराज झाला. तो आशाबाईसोबत भांडण करु लागला. आपल्यामुळे भुषण आणि आशाबाई यांच्यात वाद होत असल्याचे भिकनला देखील समजले. भिकनचे आपल्या पत्नीवर प्रेम असल्याचे समजल्यानंतर भुषणने तावातावात त्याच्याकडील काम सोडून दिले. तो दुस-या कंपनीत कामाला जावू लागला. भिकनकडे कामाला जायचे नाही असे त्याने आशाबाईला सांगून टाकले. त्यामुळे तिची आणि भिकनची जुळलेली लिंक खराब झाली. दोघांचा प्रेमाचा अ‍ॅक्सेस तुटला. 

आशाबाई आणि आपल्या प्रेमाच्या आड येणा-या भुषणला संपवण्याची नामी संधी आता जवळ आल्याचा कुविचार भिकनच्या मनात चमकून गेला. त्या कुविचारातून प्रेरीत झालेल्या भिकनने विठ्ठलच्या माध्यमातून भुषण यास होकार दिला. तुम्ही दोघे बुरहानपुरला मोटार सायकलने पुढे जा, मी तुमच्या मागे मागे हळूहळू येतो असा भिकनने विठ्ठल यास कानमंत्र दिला. त्या कानमंत्रानुसार विठ्ठलने भिकन यास बोलावून घेतले. आपण दोघे जण अगोदर भुसावळ आणि नंतर बुरहानपुर येथील चटई कारखान्यात जावूया असे विठ्ठलने भुषण यास म्हटले. त्याच्या बोलण्याला दुजोरा देत भुषण तयार झाला. आपण मृत्यूच्या दिशेने वाटचाल करण्याची तयारी करत आहोत हे भुषण यास समजलेच नाही. नियतीने त्याच्यासाठी लिहून ठेवलेल्या मृत्युपत्राची तो स्वत:च तयारी करत होता. 

17 एप्रिल 2022 इस्टर संडे सण असलेला रविवारचा दिवस होता. मी भुसावळ येथे काम बघून येतो असे पत्नी आशाबाईला सांगत भुषण मोटार सायकलने घरुन निघाला. वाटेत विठ्ठल त्याची वाट बघतच होता. भुषणच्या मोटार सायकलवर विठ्ठल असे दोघेजण भुसावळच्या दिशेने निघाले. दोघांच्या हालचालींवर भिकनचे लक्ष आणि नियंत्रण होते. भिकनच्या मार्गदर्शनाखाली भुषणला सोबत घेऊन विठ्ठल मार्गक्रमण करत होता. दरम्यान मजुरांच्या कामाची विभागणी केल्यानंतर भिकन देखील त्यांच्या पाठोपाठ भुसावळच्या दिशेने त्याच्या त्याब्यातील मोटार सायकलवर निघाला.

भुसावळला पोहोचल्यावर अगोदर बुरहानपुरला जाण्याचे दोघांचे ठरले. दोघे जण भिकनच्या संपर्कात होते. भिकनने दोघांना मुक्ताईनगर मार्गे बुरहानपुरला जाण्यास सांगितले. मुक्ताईनगर येथे तिघे एकत्र जमले. तिघांनी तेथे सोबतच मद्यप्राशन केले. शिवाय वाटेत पिण्यासाठी मद्याच्या बाटल्या सोबत देखील घेतल्या. त्यानंतर पुन्हा तिघांचा बुरहानपुरच्या दिशेने पुढील प्रवास सुरु झाला. भुषण आणि विठ्ठल एका मोटार सायकलने आणि भिकन त्याच्या मोटार सायकलने बुरहानपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत होते.

वाटेत भुषणच्या मोबाईलवर आशाबाईचा फोन आला. तिने मोबाईलवरच त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही वेळाने तिचा भिकनच्या मोबाईलवर देखील फोन आला. काही वेळापुर्वी पती भुषण सोबत वाद घालणारी आशाबाई यावेळी भिकनसोबत प्रेमाने बोलत होती. भुषण आमच्या सोबतच आहे हे मात्र भिकनने तिला सागितले नाही. बरेच अंतर पार केल्यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास तिघे बुरहानपुर येथे पोहोचले.

बुरहानपूर येथून खंडवा गावाच्या दिशेने जाणा-या वाटेत एका दारु दुकानावर मद्यप्राशन करण्यासाठी तिघांनी पुन्हा विसावा घेतला. सकाळपासून केवळ मद्यप्राशनच सुरु असले तरी कुणाच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. त्यामुळे एका ढाब्यावर तिघांनी थोडेसे उदरभरण करत यज्ञकर्म देखील केले. मात्र या उदरभरणापेक्षा तिघांना मद्यप्राशनात अधिक रस होता. नावाला उदरभरण केल्यानंतर सायंकाळी पाच वाजता पुन्हा तिघांचा पुढील प्रवास सुरु झाला. भुषण आणि विठ्ठल या दोघांनी मोठ्या प्रमाणात मद्याचे डोस घेतले होते. त्यामुळे त्यांचे डोळे जड पडले होते. तशाही परिस्थितीत दोघे वाहनावर बसून पुढे पुढे धाव घेत होते.  भुषण याला तर जगाची शुद्ध नव्हती. आपण बुरहानपूरला आहोत की अमेरीकेत हे देखील त्याला सुचत नव्हते.

या संधीचा फायदा घेत भिकनने विठ्ठल यास सांगितले की भुषणची पत्नी आशाबाई आणि माझे गेल्या तिन वर्षापासून प्रेमसंबंध सुरु आहेत. आमचे प्रेमसंबंध भुषण यास समजले असून तो माझ्यावर संशय व्यक्त करत असतो. आपण त्याला या ठिकाणीच मारुन टाकू. या परक्या जागी त्याला मारुन टाकल्यास आपल्यावर कुणाला संशय येणार नाही. बुरहानपुर – खंडवा रस्त्यावरील मोठ्या नाल्याच्या जवळ झाझर तलाव असलेले ते ठिकाण होते. या निर्मनुष्य जागी केबलचे खड्डे खोदून ठेवण्यात आले होते. या रेडीमेड खड्ड्यात भुषण यास मारुन गाडून टाकण्याचा कुविचार भिकनच्या मनात आला. तो कुविचार भिकनने विठ्ठल यास बोलून दाखवला.

भिकनच्या बोलण्याला विठ्ठलने दुजोरा देत त्याच्या दुष्कृत्यात सहभाग घेण्याकामी सहमती दर्शवली. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्या निर्मनुष्य ठिकाणी उन्हाची वेळ असल्यामुळे त्यांच्याव्यतिरिक्त कुणीही नव्हते. उन्हामुळे अंगाची होणारी लाहीलाही आणि पोटात मद्याचे बेतापेक्षा जास्त गेलेले डोस यामुळे भुषणला कसली शुद्ध नव्हती. या संधीचा गैरफायदा घेत भिकनने भुषणच्या गुप्तांगावर एक जोरदार लाथ हाणली. गुप्तांगावर जोरदार लाथ बसल्यामुळे अगोदरच मद्याच्या अंमलाखाली असलेला भुषण जमीनीवर कोसळण्यास वेळ लागला नाही. भुषण जमीनीवर कोसळताच विठ्ठलने देखील त्याच्या गुप्तांगावर जोरदार लाथ हाणली. त्यानंतर विठ्ठलने त्याचा गळा दाबून धरला. विठ्ठलने गळा दाबलेला असतांनाच भिकनने पुन्हा भुषणच्या गुप्तांगावर लाथा हाणण्याचे काम सुरुच ठेवले. एका पाठोपाठ सलग चार ते पाच वेळा गुप्तांगावर लाथा बसल्यामुळे भुषणने दम तोडला. जवळच खोदून ठेवलेल्या केबलच्या रेडीमेड खड्ड्यात भुषण यास टाकून देण्यात आले. लागलीच त्याच्यावर माती टाकून ती जागा सपाटदेखील करण्यात आली.

भर तप्त उन्हाची वेळ असल्यामुळे तुरळक वाहनधारकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आपापली वाट धरली होती. भुषणला खड्ड्यात पुरण्यापुर्वी त्याचा मोबाईल काढून घेण्यात आला. त्याचा मोबाईल आणि मोटार सायकल भुषणने आपल्या ताब्यात घेतली. दोघेही रात्रीच जळगावला दाखल झाले. जणू काही झालेच नाही व आपल्याला काही माहिती नाही अशा अविर्भावात भुषणची मोटार सायकल रायपूर फाट्यावर लावून देण्यात आली. त्याच्या गाडीच्या डिक्कीत मोबाईल बंद झालेला मोबाईल ठेवून देण्यात आला. गाडीची चावी गाडीच्या जवळच ठेवून देण्यात आली. सकाळपासून घरातून गेलेला भुषण रात्र झाली तरी परत आला नसल्याचे बघून आशाबाई काळजीत पडली. तिने भिकन यास फोन लावून त्याची विचारपूस केली. थोड्यावेळाने भिकननेच तिला फोन करुन त्याची मोटार सायकल रायपूर फाट्याजवळ पडून असल्याचे तिला सांगितले. पतीची मोटार सायकल गावाच्या फाट्याजवळ असल्याचे बघून पती जवळच कुठेतरी असेल अशी मनाची समजूत तिने करुन घेतली.

त्यानंतर एकामागून एक दिवस जावू लागला. भुषण घरी परत येत नसल्यामुळे आशाबाई व्यथीत झाली. कितीही झाले तरी तिच्या कपाळावरील कुंकवाचा तो धनी होता. तिच्या मंगळसुत्रावर तिने त्याचे नाव लिहिले होते. नातेवाईकांच्या मदतीने तिने सर्वत्र भुषणचा शोध घेतला. मात्र कुठेही त्याचा शोध लागत नव्हता. त्याचा शोध घेण्याकामी भिकन देखील तिच्या मागेपुढे करत देखावा करत होता.

आपण भुषणची हत्या केली असल्याचा आशाबाईसह तिच्या नातेवाईकांना संशय येवू नये म्हणून त्याने एका मद्यपीकडून अवघ्या तिनशे रुपयात सिमकार्डसह एक लहान मोबाईल विकत घेतला. त्या मद्यपीने देखील तिनशे रुपयात भिकनला तो मोबाईल विकून टाकला. त्या मोबाईलवरुन त्याने आशाबाईला फोन करुन दिलासा देण्यास सुरुवात केली. तुझ्या पतीला मी कुठूनही शोधून आणेन तु काळजी करु नको असे बोलून तो तिला वरच्यावर दिलासा देत होता. मात्र त्याच्या दिलाश्याने तिचे समाधान होत नव्हते. दिड – दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी पती भुषणचा थांगपत्ता लागत नव्हता. तो कुठे असेल? काय करत असेल? त्याचे कुणी अपहरण केले काय? असे एक ना अनेक विचार तिच्या मनात येत होते. तिला अन्नपाणी गोड लागत नव्हते. ती मधेच केव्हातरी मोठ्याने रडण्यास सुरुवात करत होती. अचानक तिच्या धाय मोकलून रडण्याचा आवाज ऐकला म्हणजे तिची दोन्ही मुले देखील भयग्रस्त होत असत. काही दिवसांनी आशाबाई आपल्या पतीला विसरुन जाईल व तिच्यावर आपले पुर्ण नियंत्रण येणार असल्याचा विचार भिकन मनातल्या मनात करत होता. मी तुझ्या पतीला शोधून आणेन असे सांगून तो तिच्याशी जवळीक साधत तिच्या मनात आपुलकी निर्माण करण्याचा पुरेपुर प्रयत्न करत होता. आता माझ्याशिवाय या जगात तुला कुणी नाही असे आशाबाईला भासवण्याचा देखील भिकन प्रयत्न करत होता. तो वारंवार तिची भेट घेऊन तुझा पती लवकरच सापडेल अशी बतावणी करत होता. त्यासाठी तो विविध युक्त्या वापरत होता.

दरम्यान या युक्तीचा एक भाग म्हणून त्याने पुणे येथे राहणारा त्याचा एक नातेवाईक शोधून काढला. भिकनने त्या नातेवाईकाला आशाबाईचा मोबाईल क्रमांक दिला. आशाबाईच्या मोबाईलवर फोन करुन तिच्याशी काय बोलायचे हे देखील भिकनने त्या नातेवाईकाला समजावले. बाई तुझा पती मला पुणे रेल्वे स्टेशनवर भेटला होता. त्याने तुझ्याशी बोलण्यासाठी माझा मोबाईल घेतला होता. परंतु तु फोन घेतला नाही. त्यानंतर तो कुठेतरी निघून गेला असे भिकनच्या त्या नातेवाईकाने आशाबाईसोबत पढ्या पोपटाप्रमाणे फोनवर खोटे बोलणे केले. तो माझाच पती होता हे  मी कसे काय मान्य करु अशी विचारणा इकडून आशाबाईने पलिकडून बोलणा-या भिकनच्या नातेवाईकाला केली. भिकनने अगोदरच सांगून ठेवल्यानुसार त्याने तिला सांगितले की बाई तुझ्या पतीच्या हाताची दोन बोटे तुटलेली  होती. आपल्या पतीच्या हाताची दोन बोटे मशीनवर काम करतांना तुटली असल्याचे आशाबाईला माहिती होते. त्यामुळे तिची खात्री पटली. मात्र हा सर्व भिकनचा डाव असल्याचे तिच्या लक्षात येत नव्हते. तिचा पती जीवंत आहे अशी खुळी आशा भिकन तिच्या जीवाला लावत होता. आशाबाईचा आपल्यावर संशय येता कामा नये म्हणून भिकन विविध युक्त्या वापरत होता. या युक्त्यांचा एक भाग म्हणून त्याने अजून दोन मित्र तयार केले. त्या दोघा मित्रांना देखील त्याने आशाबाईचा मोबाईल क्रमांक दिला. बाई तुझा पती आम्हाला रेल्वे स्टेशन परिसरात दिसला होता असे तिला सांगण्यासाठी त्याने दोघा मित्रांना तयार केले होते. अशा प्रकारे विविध लोकांना आशाबाईचा मोबाईल क्रमांक देवून तिच्यासोबत खोटे बोलण्यास तो भाग पाडत होता.

पती भुषणचा तपास लागत नसल्यामुळे काही दिवसांसाठी आशाबाई तिच्या सासरी मध्यप्रदेशातील बुरहानपुर जिल्ह्यातील नेपानगर तालुक्यातील भातखेडा या गावी निघून गेली. त्यानंतर ती परत जळगावला रायपूर येथे आली. त्यावेळी  भिकनने पुन्हा तिची भेट घेतली. तु सासरी जावू नको, तु येथेच रहा. तुझा पती आणून देण्याची जबाबदारी माझी आहे. तु जर माझे ऐकले नाही व परत सासरी निघून गेली तर मी फाशी घेऊन आत्महत्या करुन घेईन. तुझ्या त्रासाला वैतागून मी आत्महत्या केल्याचे लिहून ठेवणार असल्याची त्याने तिला धमकी दिली. हळूहळू आशाबाईला भिकन आणि विठ्ठल या दोघांवर संशय येवू लागला.

त्रस्त आशाबाईने अखेर 7 जून 2022 रोजी एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठले. 17 एप्रिल 2022 ते 7 जून 2022 दरम्यान दिड महिन्याच्या कालावधीत तिच्यावर गुदरलेला सर्व प्रसंग तिने पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांची भेट घेत कथन केला. आपला पती जीवंत असल्याचा समज करुन घेत त्याचे कुणीतरी अपहरण करुन त्याला कुठेतरी डांबून ठेवले असल्याची शक्यता आशाबाईने पो.नि. प्रताप शिकारे यांच्याकडे व्यक्त केली. या सर्व घडामोडीत ठेकेदार भिकन शामसिंग परदेशी आणि विठ्ठल प्रेमसिंग परदेशी यांना त्याबद्दल नक्कीच काहीतरी माहिती असल्याचे देखील तिने कथन केले. तिने दिलेल्या फिर्यादीत या दोघांवर दाट संशय व्यक्त करण्यात आला. आशाबाईने दिलेल्या फिर्यादीनुसार सुरुवातीला याप्रकरणी गु.र.न. 328/2022 भा.द.वि. 365 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी आपले सहकारी अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक अधिक्षक कुमार चिंता यांना या गुन्ह्यात लक्ष घालून लवकरात लवकर तपास पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या. अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी आणि सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठून ठाण मांडत या गुन्ह्याच्या तपासकामी योग्य त्या सुचना दिल्या. वरिष्ठ पोलिस अधिकारी पोलिस स्टेशनला येऊन बसल्यामुळे यंत्रणा जोरात कामाला लागली.

पो.नि. प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास पोलिस उप निरीक्षक अनिस शेख यांच्याकडे देण्यात आला. तपासाच्या पुढील टप्प्यात गुन्हे शोध पथकातील पोलीस हे.कॉ. गफूर तडवी आणि सिद्धेश्वर डापकर या दोघांनी तातडीने कुसुंबा रायपूर परिसर गाठत ठेकेदार भिकन शामसिंग परदेशी आणि विठ्ठल प्रेमसिंग परदेशी या दोघांना ताब्यात घेतले. दोघांना सुरुवातीला गुन्हे शोध पथकाच्या रुममधे आणले गेले. आपण त्या गावचेच नाही आणि आपल्याला काहीच माहिती नाही असा कांगावा दोघांनी सुरुवातीला केला.

17 एप्रिल रोजी तुम्ही दोघे कुठे होते? या प्रश्नाने दोघांची वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी सुरु झाली. दोघांपैकी एकाला दुस-या खोलीत बसवून एकाला बोलावण्यात आले. 17 एप्रिल रोजी तुम्ही दोघे कुठे गेले होते असा प्रश्न विचारण्यात आला. त्या दिवशी आम्ही औरंगाबाद जिल्ह्यात गेलो होतो असे त्याने सांगीतले. तुम्ही कोणत्या मार्गे गेले होते असा दुसरा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर आम्ही सिल्लोड मार्गे गेलो होतो असे त्याने उत्तर दिले. त्यानंतर त्याला दुस-या खोलीत बसवून दुस-याला बोलावण्यात आले. त्याला देखील तुम्ही दोघे 17 एप्रिल रोजी कुठे गेले होते असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने आम्ही कन्नड मार्गे औरंगाबादला गेल्याचे सांगीतले. दोघांच्या बोलण्यात तफावत पडत असल्याचे गुन्हे शोध पथकाला समजले होते. त्यानंतर दोघांचे 17 एप्रिलचे मोबाईल लोकेशन घेतले असता ते मध्य प्रदेशातील बुरहानपूर नजीक असल्याचे पोलिस पथकाला आढळून आले.

घटनेच्या दिवशी दोघे बुरहानपूरला गेले होते हे नक्की झाले होते. मात्र दोघे काहीतरी लपवत असल्याचे आणि गुन्ह्याचे ठिकाण बुरहानपूर नजीक असल्याचा संशय दोघांवर बळावला. हाच धागा पकडून दोघांना पुन्हा सोबत बोलावण्यात आले. कोण किती खरे बोलतो आणि किती खोटे बोलतो याची पडताळणी पोलिसी खाक्या दाखवून करण्यात आली. अखेर दोघांनी आम्ही मुक्ताईमार्गे बुरहानपूरला गेल्याचे कबुल करत आपला गुन्हा कबुल केला.  त्यानंतर त्यांना पो.नि. प्रताप शिकारे यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. दोघांनी अजून सविस्तर घटनाक्रम कबुल केला. त्यांच्या कबुली नंतर त्यांना अटक करण्यात आली. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुरुवातीला दोघांना पोलिस कोठडी सुनावली.

पोलिस कोठडी दरम्यान दोघां संशयीतांना पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख यांच्यासह हे.कॉ. गफुर तडवी, रतीलाल पवार, सुधीर साळवे, सिद्धेश्वर डापकर आदींच्या पथकाने घटनास्थळावर नेले. मध्य प्रदेशच्या बुरहानपूर जिल्ह्यातील नेपानगर तालुक्याच्या झांजर गावाच्या पुढे खंडवा रस्त्यावरील तलावानजीक ते घटनास्थळ होते. याच ठिकाणी दोघा संशयीतांनी मयत भुषण तळेले यास गुप्तांगावर लाथा मारुन गळा दाबून जीवे ठार केले होते. जीवे ठार केल्यानंतर त्याला नजीकच्या खड्ड्यात पुरण्यात आले होते. जवळपास दिड महिन्यापासून पुरलेला मृतदेह पुर्णपणे कुजला होता. यावेळी हजर असलेल्या मयत भुषणच्या नातेवाईकांनी त्याचा कुजलेला मृतदेह ओळखला. दोघा संशयीतांनी  यावेळी पुन्हा आपला गुन्हा कबुल केला. या गुन्ह्यात दोघांविरुद्ध 302 हे कलम वाढवण्यात आले. घटनास्थळापासून मयताचे मुळगाव भातखेडा साधारण बारा किलोमीटर आणि सासर असलेले चांदणी हे गाव आठ किलोमीटर अंतरावर आहे. पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे व त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक अनिस शेख करत आहेत. त्यांना हे.कॉ. गफुर तडवी, रतीलाल पवार, सुधीर साळवे, सिद्धेश्वर डापकर आदींचे सहकार्य लाभत आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here