रजेवर सोडण्यात आलेल्या फरार बंदी महिलेस अटक

जळगाव : आकस्मिक कोविड-19 अभिवचन रजेवर कारागृहातून सोडण्यात आलेल्या फरार बंदी महिलेस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भडगाव येथून ताब्यात घेत अटक केली आहे. निर्मलाबाई अशोक पवार रा. टोणगाव ता. भडगाव असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पुढील तपासकामी सदर महिलेस भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

नाशिक ग्रामीण अंतर्गत मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात निर्मलाबाई पवार रा. टोणगाव ता. भडगाव – जळगाव हिस अतिरिक्त सत्र न्यायधिश – 2 मालेगाव यांनी दोषी ठरवत 19 डिसेंबर 2013 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सदर महिलेची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. नाशिक मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असतांना 4 जून 2022 पर्यंत आकस्मीत कोविड-19 अभिवचन रजेवर तिला सोडण्यात आले होते. सदर महिला बंदी कैदी मुदत कालावधीत नाशिक कारागृहात हजर झाली नाही. त्यामुळे तिच्याविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला भा.द.वि. 224 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

फरार बंदी महिला निर्मलाबाई अशोक पवार तिच्या मुळगावी भडगाव तालुक्यातील भडगाव येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी पोहेकॉ लक्ष्मण अरुण पाटील, पोना रणजित अशोक जाधव, पोना किशोर ममराज राठोड, पोकॉ विनोद सुभाष, मपोहेकॉ रत्ना दगडू मराठे, मपोना उपाली यशवंत खरे, चापोहेकॉ राजेंद्र हसंराज पवार आदींचे पथक तिला ताब्यात घेण्याकामी रवाना केले. तिला टोणगाव ता. भडगाव येथून ताब्यात घेत अटक करण्यात आली. पुढील तपासकामी तिला भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here