बॉलिवूडच्या खानांचे नाव वापरुन झरीफ बाबाने जमवली माया

नाशिक : गोळीबारात ठार झालेल्या अफगाण वंशाच्या निर्वासित ख्वाजा सय्यद चिश्ती उर्फ ​​झरीफ बाबाने बॉलीवूडच्या तीन खानांच्या नावाचा वापर करुन करोडोंची माया जमवल्याचे पुढे आले आहे. त्याच्या व्हिडीओमध्ये त्याने शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खानचा फोटो आणि त्यांचा एडिट केलेला व्हिडीओ वापरुन तगडी कमाई केल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आल्याचे म्हटले जात आहे.

आपल्या शब्दांचे पालन करुनच बॉलिवूड मधील तिघे स्टार ‘खान’ मोठे झाल्याचे त्याने व्हिडीओच्या माध्यमातून दर्शवण्याचा प्रयत्न केला होता. या व्हिडिओची मदत घेत या बाबाची कमाई मोठ्या प्रमाणात वाढल्याचे म्हटले जात आहे. झरीफ बाबा आयबी (इंटेलिजन्स ब्युरो) च्या रडारवर आला होता. वावी पोलिसांनी सन 2021 मध्ये झरीफ बाबा, त्याची पत्नी आणि ड्रायव्हर गफ्फार अशा तिघांची चौकशी केल्यानंतर 22 एप्रिल 2021 रोजी इंटेलिजन्स ब्युरोला (आयबी) अहवाल सादर करण्यात आला होता. सुफी झरीफ बाबा यांच्या हत्येमध्ये त्याच्या चालकाशिवाय त्याच्या अटेंडंटचाही सहभाग होता. त्याने अन्य दोघांसह हा गुन्हा केला आणि बाबाची एसयूव्ही कार, दोन मोबाईल घेऊन पलायन केले.

झरीफ बाबाने त्याच्या व्हिडिओंमध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान या तिघा स्टार्सची नावे आणि छायाचित्रे वापरल्यामुळे फेसबुक, यु ट्युब व इंस्टाग्रामवरील झरीफ बाबाच्या चाहत्यांची संख्या झपाट्याने लाखोच्या घरात गेली होती. झरीफ बाबाने सुरु केलेले त्याचे दोन चॅनल देखील त्याच्या कमाईचे सर्वात मोठे साधन होते. झरीफ बाबाच्या बोलण्याची स्टाईल, लोकांसोबत वागण्याची पद्धत बघून तो प्रसिद्ध होत गेला. त्याच्या एका व्हिडिओंमध्ये तो सूफी पोशाखात नाचताना व झाडूच्या साहाय्याने महिला, लहान मुलांसह वृद्धांना बरे करत असल्याचा दावा केला जात होता. बाबाची संपत्ती वाढत गेल्यामुळे त्याचे अनेक शत्रु देखील निर्माण झाले होते. अनेक मालमत्ता त्याने जवळच्या मित्रांच्या नावावर खरेदी केल्या होत्या.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here