भाच्याने फसवले मामाला, मुंबई पोलिस यवतमाळला

यवतमाळ : तब्बल चार कोटींच्या सोने-चांदी फसवणूक प्रकरणी मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांचे गुन्हे शोध पथक गेल्या दोन दिवसापासून यवतमाळला मुक्कामी आहे. दीड किलो सोने आणि 35 किलो चांदीची विक्री यवतमाळ झाल्याचे समजल्याने शनिवारी मुंबई पोलिसांनी यवतमाळ शहर गाठले आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने शहरातील दोघा सराफा भावंडांची चौकशी सुरु आहे.

मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलिस स्टेशन हद्दीत राजस्थान येथील गजानन अग्रवाल या तरुणाचा मामा सोने चांदीचा व्यापारी आहे. मामाकडे गजानन हा कमिशन एजंट म्हणून काम बघत होता. मामानी दिलेल्या सोन्या-चांदीची विक्री तो इतर सराफांकडे करत होता. आलेली रक्कम तो मामाकडे रवाना करत होता.

कमिशन एजंट म्हणून काम करत असतांना गजानन याने सोने चांदीची परस्पर विक्री करत मामाची चार कोटी रुपयात फसवणूक केली. मामाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर भाचा गजानन अग्रवाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गजानन अग्रवाल यास ताब्यात घेत चौकशी करण्यात आली. चौकशीअंती दिड किलो सोने व 35 किलो चांदी यवतमाळ येथे विक्री केल्याची कबुली गजाननने पोलिसांना दिली. त्या माहितीच्या आधारे गेल्या दोन दिवसांपासून स.पो.नि. सुशीलकुमार वंजारी यांच्यासह पथक यवतमाळ येथे दाखल झाले आहे. 6 ऑगस्ट रोजी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here