भ्रष्टाचाराचा झेंडा भलताच डौलाने फडकला!— पीडब्ल्यूडीचा कारभार कुप्रसिद्धीत अडकला

जळगाव : आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पुर्ण झाली आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पुर्ण होवून देखील आपल्या देशातील भ्रष्टाचाराचा विळखा सुटण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. जळगाव सार्वजनीक बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचाराचा एक इरसाल नमुना सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी उघडकीस आणला आहे.

जळगाव सार्वजनीक बांधकाम खाते भ्रष्टाचारासाठी कुप्रसिद्ध असल्याचे म्हटले जाते. या खात्याच्या नाशिक महसुल विभागाअंतर्गत येणा-या जळगाव सर्कल विभागाचे कार्यकारी अभियंता, उप अभियंता यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा जळगाव येथील शिवाजी नगर उड्डाण पुलाच्या टेंडर पासून मोठ्या प्रमाणात गाजत आहेत.

जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय आवारात एक भलामोठा तिरंगा ध्वज आणि ध्वजस्तंभ 15 ऑग़स्ट या स्वातंत्र्यदिनापुर्वी लावण्यात आला आहे. 15 ऑग़स्टच्या अगोदरच हा तिरंगा ध्वज डौलाने फडकू लागला. मात्र या ध्वजस्तंभाची उभारणी झाल्यानंतर या कामाचे टेंडर आता काढण्यात आले आहे. अगोदर ध्वज फडकला आणि नंतर टेंडर काढण्यात आल्याने या भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणात तोंड फुटले आहे.
विशेष म्हणजे आधी काम करुन झाल्यानंतर 12 लाख 82 हजार 562 रुपयांचे टेंडर काढणे हा प्रचंड भ्रष्टाचार म्हटला जात आहे. विशेष म्हणजे एखाद्या मजूर संस्थेकडून हे काम करुन घेतांना ती मजूर संस्था, त्यांना दिलेली टेंडर्स, नोंदलेली बिले, पेमेंट यात टक्केवारी, हेराफेरी झाल्याचे म्हटले जात आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी सार्वजनीक बांधकाम विभाग अधिका-यांच्या भ्रष्ट कारभाराचे बिंग फोडल्याने खळबळ माजली आहे.

प्रभारी अभियंता पी.पी. सोनवणे, उप अभियंता सुभाष राऊत हे दोघे एकाच तालुक्याचे रहिवासी असून ते दोघे संगनमताने भ्रष्टाचार माजवत असल्याचे खुलेआम म्हटले जात आहे. त्यांना कुणाकुणाचे सरंक्षण आणि अभय आहे? हा वादग्रस्त मुद्दा आहे. मुख्यमंत्री शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्यानंतरच हा भ्रष्टाचार थांबू शकतो असे जनतेत बोलले जात आहे.

प्रभाग क्रमांक 1 चे उप अभियंता सुभाष राऊत यांच्यासह अनेक अभियंते गेल्या पाच ते सात वर्षापासून जळगावला ठाण मांडून बसले असल्याचे लोक आता खुलेआम बोलू लागले आहेत. प्रभारी अभियंता पी. पी. सोनवणे यांचा कार्यकारी अभियंता ते अधीक्षक अभियंता हा प्रवास जळगाव येथेच झाला आहे. तत्कालीन अधिक्षक अभियंता पांढरे यांच्या जागी बढती मिळवण्यासाठी त्यांनी दहा खोके उपयोगात आणल्याचे म्हटले गेले होते. नाशिकचे मुख्य अभियंता, मंत्रालयातील सचिव यांच्यासह राजकीय आशिर्वाद तसेच धनशक्तीच्या बळावर सरकार बदलले तरी त्यांचा भ्रष्टाचार सुरुच असल्याचे म्हटले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here