सराफी दुकान फोडणा-या मुख्य आरोपीस अटक

जळगाव : जळगाव सराफ बाजारातील ज्वेलरी शॉप फोडणा-या गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने अवघ्या चोवीस तासांच्या आत जेरबंद केले आहे. पुढील तपासकामी त्याला शनीपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. विशाल उर्फ अ‍ॅस्टीन युवराज सोनवणे असे अटक करण्यात आलेल्या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे.

जळगावच्या सराफ बाजारातील मनिष ज्वेलर्स या दुकानातून सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरी झाला होता. या घटने प्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार विशाल उर्फ ॲस्टीन युवराज सोनवणे (रा. पावर हाउसनजीक भिलवाडी – जळगाव) याने आपल्या साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केला असल्याची गोपनीय माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक अमोल देवढे, पोलिस अंमलदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, विजय शामराव पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, अशरफ शेख, रवी नरवाडे, संतोष मायकल, महेश महाजन, सुरज पाटील, अविनाश देवरे, जयंत चौधरी, संदीप सावळे, उमेश गोसावी, राहुल बैसाणे आदींच्या पथकाने शोध घेत विशाल सोनवणे यास ताब्यात घेतले. त्याला पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्यासमक्ष हजर करण्यात आले.

अधिक चौकशीअंती त्याने आपल्या तिघा अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे कबुल केले. त्याच्याकडून चोरी केलेल्या मुद्देमालापैकी काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटकेतील गुन्हेगार विशाल हा बालपणापासून गुन्हेगारी क्षेत्रात कार्यरत असून त्याच्याविरुद्ध जळगाव शहर आणि जिल्हापेठ पोलिस स्टेशनला घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचे तिघे अल्पवयीन साथीदार देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. अटकेतील मुख्य आरोपी विशाल सोनवणे यास न्यायालयात हजर केले असता त्याला 12 नोव्हेंबर पर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास शनीपेठ पोलिस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here