शाहरुख-दीपिकाच्या ‘पठाण’ मधील गाण्याने घातला धुमाकुळ

शाहरुख-दीपिकाच्या ‘पठाण’ या चित्रपटातील नव्या गाण्याने सध्या धुमाकुळ घातला आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून जवळपास ४ वर्षांनंतर शाहरुख खान पुन्हा मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. अशात आता या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं असून या गाण्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शाहरुख खान आणि दीपिकाची मुख्य भूमिका असलेल्या ‘पठाण’ चित्रपटाचं पहिलं गाणं ‘बेशरम रंग’ प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात एकीकडे शाहरुख खानचा डॅशिंग लूक पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे दीपिका पदुकोण पहिल्यांदाच एवढ्या बोल्ड अवतारात दिसत असून या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

त्याआधी दीपिकाचा या गाण्यातील बिकिनी लूकही चर्चेत आला होता. आता हे गाणं प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांना ते पसंतीस पडलं आहे, पण याबरोबरच आता नेटकरी या गाण्याला ट्रोलही करू लागले, रेड्डीट वेबसाइटवर कित्येक लोकांनी या गाण्याच्या चित्रीकरणाची खिल्ली उडवत याची तुलना याच चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या ‘वॉर’ चित्रपटातील ‘घुंगरू’ या गाण्याशी केली आहे.

हृतिक रोशन, टायगर श्रॉफ यांचा ‘वॉर’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यातही हृतिक आणि अभिनेत्री वाणी कपूर यांच्यावर अशाच प्रकारचं गाणं चित्रित करण्यात आलं होतं. त्याचा संदर्भ देत लोकांनी शाहरुखच्या पठाणच्या या गाण्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. दोन्ही गाण्यांमध्ये मुख्य अभिनेत्री या हॉट स्विमसूटमध्ये नाचताना दिसत आहेत, शिवाय दोन्ही गाणी ही बीचवर शूट करण्यात आल्याचंही नेटकऱ्यांनी ध्यानात आणून दिलं आहे.

शिवाय ‘घुंगरू’ गाण्यात हृतिकचा वावर जितका सहज होता तितका या गाण्यात शाहरुखचा वावर सहज न वाटता बेगडी वाटत असल्याचं नेटकऱ्यांनी यात स्पष्ट केलं आहे. शिवाय शाहरुखच्या बॉडीवर ज्या पद्धतीने काम केलं आहे ते खूप खोटं वाटत असल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. दोन्ही चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनीच केलं असल्याने गाण्याची ठिकाणं, कपडे, लूक या संगळ्यातील साम्य प्रेक्षकांनी अचूक ओळखलं आहे. इतर गोष्टी वगळता दीपिकाचा अत्यंत हॉट आणि बोल्ड अंदाज मात्र लोकांना चांगलाच आवडला आहे. २०२३ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख व्यतिरिक्त जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण यांच्याही मुख्य भूमिका आहेत. तर यशराज बॅनर्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here