आठ लाखाच्या लाचेची मागणी – तिघांविरुद्ध गुन्हा

जळगाव : आठ लाख रुपयांच्या लाच मागणीप्रकरणी जळगाव एसीबी पथकाने केलेल्या कारवाईत तिघांंविरुद्ध धुळे शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल पाटील (कनिष्ठ लिपीक, अनुसूचीत जमाती जात पडताळणी समिती कार्यालय, धुळे वर्ग-3), निलेश अहीरे (समिती सदस्य, अनुसूचीत जमाती जात पडताळणी समिती कार्यालय, धुळे वर्ग-1 आणि राजेश ठाकुर (कनिष्ठ लिपीक, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कार्यालय,नाशिक वर्ग – 3) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील फैजपूर येथील तक्रारदार हे अनुसूचीत जमाती (एस.टी.) प्रवर्गातील असून त्यांनी स्वतःचे व त्यांच्या मुलीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रकरण सादर केले होते. गेल्या 19 वर्षापासुन वारंवार सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा करुन देखील तक्रारदारास त्यांच्या स्वतःच्या व त्यांच्या मुलीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे रिट पिटीशन दाखल केले होते. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने अनुसूचीत जमाती जात पडताळणी समितीला सदर दोन्ही जात वैधता प्रमाणपत्राचा निकाल देण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी देण्याबाबत निकाल दिला होता.

सदर न्यायालयाची प्रत जात पडताळणी समिती कार्यालय धुळे येथे जमा केल्यानंतरदेखील सदर प्रकरणांचा निकाल न दिल्याने तक्रारदार हे कार्यालयातील कनिष्ठ लिपीक अनिल पाटील यांना भेटले असता त्यांनी तक्रारदारास दुसऱ्या दिवशी बोलावून घेत त्यांच्या व त्यांच्या मुलीचे असे दोन्ही जात वैधता प्रमाणपत्र सदस्य समितीकडून काढून आणुन देण्यासाठी सदस्य समितीतील मेंबरची नावे सांगुन एका प्रमाणपत्राचे प्रत्येकी पाच लाख रुपये याप्रमाणे दोन जात वैधता प्रमाणपत्राचे एकुण दहा लाख रुपये लाचेची मागणी केली. निलेश अहिरे या समिती सदस्याने तक्रारदाराच्या जात वैधता प्रमाणपत्रचे काम करून देण्यासाठी तक्रारदाराकाडे कनिष्ठ लिपीक राजेश ठाकुर यास मध्यस्थी टाकून त्यांच्या मार्फतीने तक्रारदाराकडे आठ लाख रुपयांची मागणी केली.

सदरचे पैसे कनिष्ठ लिपीक राजेश ठाकुर यांच्याकडे आणून द्या असे सांगून स्वतःसाठी पैसे स्वीकारण्याची संमती दिली तसेच जात वैधता प्रमाणपत्र घेण्यासाठी नंदुरबार कार्यालयातील लिपिक खोसे यांना हजार दोन हजार रुपये देण्याबाबत तक्रारदारास प्रोत्साहन दिले. तसेच राजेश ठाकुर (कनिष्ठ लिपीक आरोग्य विघाग जि.प. नाशिक वर्ग 3 यांनी निलेश अहिरे (समिती सदस्य) यांच्या सांगण्यावरुन आठ लाख रुपये निलेश अहिरे (समिति सदस्य) यांच्यासाठी स्वीकारण्याची संमती दर्शवत लाच मागणीस प्रोत्साहन दिले. तिघांविरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशनला 30 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी पो.नि.संजोग बच्छाव यांंच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, हे.कॉ. रवी घुगे, अशोक अहिरे, पो.ना.बाळु मराठे, पो.ना. सुनील वानखेडे, पोना. ईश्वर धनगर, पो.कॉ. प्रणेश ठाकूर आदींनी या सापळा कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here