सहायक फौजदारावर हल्ला करणा-या दोघांना अटक

जळगाव : पहुर पोलिस स्टेशनला कार्यरत सहायक फौजदार अनिल तुळशीराम सुरवाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करणा-या दोघांना परभणी शहरापासून सुमारे पंधरा कि.मी. अंतरावर आज शिताफीने अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर देखील ताब्यातील एका हल्लेखोराने वाटेत तपास पथकातील फौजदार अमोल गर्जे यांना विट मारुन जखमी करण्याचा प्रयत्न केला. फिरोज शेख सुपडू शेख आणि ख्वाजा तडवी अशी अटक करण्यात आलेल्या दोघा हल्लेखोरांची नावे आहेत.

14 जानेवारी रोजी पहुर पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले सहायक फौजदार अनिल सुरवाडे हे नाईट पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पहुर बस स्थानक परिसरातील खासगी ट्रॅव्हल्स पुढे जाण्याच्या बेतात असतांना फिरोज आणि ख्वाजा या दोघांनी त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल रस्त्यात आडवी लावली होती. ती मोटार सायकल रस्त्यात असल्यामुळे ट्रॅव्हल्स पुढे जात नव्हती. परिणामी वाहतुकीचा खोळंबा झाला होता. त्यामुळे एएसआय अनिल सुरवाडे यांनी त्यांना मोटार सायकल बाजूला घेण्यास सांगितले. दोघांपैकी कुणीही मोटार सायकल बाजूला घेत नसल्यामुळे वर्दीवरील सुरवाडे यांनी स्वत:च ती बाजूला घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी दोघांनी त्यांना अर्वाच्च शिवीगाळ करत दांड्याने मारहाण सुरु केली.

या मारहाणीत सुरवाडे यांच्या खांद्याला मार लागून ते बेशुद्ध झाले. या मारहाणीत त्यांच्या हाताचे बोट मोडले गेले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. घटना घडल्यानंतर दोघे हल्लेखोर फरार झाले होते. त्यांच्याविरुद्ध पहुर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना झाले होते. पळून गेलेल्या दोघांनी त्यांचा मोबाईल स्विच ऑफ़ केला होता. तरीदेखील एक हजारापेक्षा अधिक तांत्रीक विश्लेषणाची मदत घेत त्यांचा शोध लावण्यात पोलिस पथकाला यश आले. पोलिस उप निरीक्षक अमोल गर्जे यांच्यासह त्यांच्या पथकातील सहका-यांनी परभणी शहरापासून सुमारे पंधरा किलोमिटर अंतरावर ते लपून बसले असतांना त्यांना ताब्यात घेत अटक केली. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अटक केल्यानंतर दोघांना पहुर येथे आणण्याची तयारी सुरु करण्यात आली.

दरम्यान वाटेत गुन्हेगारी वृत्ती असलेल्या  ख्वाजा तडवी याने विट भट्टीवरील विट उचलून पोलिस पथकावर हल्ला चढवला. त्यामुळे पोलिस उप निरीक्षक अमोल गर्जे यांनी आपले सरकारी पिस्टल बाहेर काढत त्यांला शांत केले. अशा प्रकारचा गुन्हेगार आपल्या सेवाकाळात प्रथमच बघण्यात आल्याची प्रतिक्रिया पोलिस उप निरीक्षक अमोल गर्जे यांनी क्राईम दुनिया सोबत बोलतांना दिली. पुढील तपास सुरु आहे.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here