वाहनातील गांजावरुन पेटला वाद — मातेसह चौघे झाले निष्कारण बाद

जळगाव : जळगाव तालुक्यातील रामदेववाडी या गावानजीक 7 मे 2024 रोजी झालेल्या भिषण अपघातात स्कुटीने रामदेववाडी ते शिरसोली दरम्यान प्रवास करणा-या चौघांचा भिषण अपघातात विदारक मृत्यु झाला. जळगावकडून भरधाव वेगात रॉंग साईड येणा-या इको स्पोर्टस या कारने स्कुटीला जोरदार धडक दिली. या धडकेत चौघांचा हृदयद्रावक मृत्यू झाला. स्कुटीचालक आशा सेविका वत्सलाबाई सरदार चव्हाण (27), तिची दोन्ही मुले सोहम (8) आणि सोमेश (2) तसेच भाचा लक्ष्मण नाईक अशा चौघांचा या घटनेत मृत्यु झाला आहे.

भरधाव वेगात स्कुटीला रॉंग साईड धडक देणा-या इको स्पोर्टस या कारमधे प्लॅस्टीक पिशवीमधे गांजासारखा पदार्थ आढळून आल्याचे मयत स्कुटीचालक आशा सेविका वत्सलाबाई चव्हाण यांचा भाऊ राजेश अलसिंग चव्हाण यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. असे असले तरी या गांजाप्रकरणी पोलिसांनी कोणतेही कलम लावलेले नाही. त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण लागले असून पोलिसांच्या भुमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.

याशिवाय या कारमधे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे पी.ए. अभिषेक कौल यांचा मुलगा अर्णव कौल व जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांचा मुलगा अखिलेश पवार हे देखील हजर होते असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे हे प्रकरण अजूनच स्फोटक झाले आहे. तथापी धडक देऊन अपघात घडवून चौघांना मृत्यूच्या दाढेत ढकलणा-या कारमधे गांजा आढळून आला असल्याचे पो.नि. बबन आव्हाड यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. तो गांजा तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे देखील पो.नि. बबन आव्हाड यांनी पुढे म्हटले आहे. तो गांजा आहे आणि होता असे या घटनेच्या आणि प्रतिक्रियेच्या निमीत्ताने स्पष्ट झाले आहे. या गांजा प्रकरणातून बड्यांना वाचवण्याचे प्रयत्न दिसून येत असल्याचे जनतेत बोलले जात आहे. कालांतराने हा गांजाच नव्हता असा अहवाल आल्यास फार आश्चर्य करण्याचे कारण नाही असे देखील जनतेत आता उघड उघड बोलले जात आहे.

मरण पावलेले चौघे बंजारा समाजाचे होते. त्यामुळे बंजारा समाजाचे बंजारा टायगर राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव यांनी वृत्तवाहिन्यांसोबत बोलतांना अतिशय जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. अपघात घडण्यास कारणीभूत असलेल्या वाहनात बसलेले लोक बड्या घरची मुले आहेत. ते भर वर्दळीच्या रस्त्यावर नशापाणी करुन रेस लावत होते असा त्यांनी आरोप केला आहे. काय चुक होती त्या बालकांची, त्यांच्या आईची आणि मामाकडे सुटीत आलेल्या त्या भाच्याची? असा भावनिक प्रश्न बंजारा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव यांनी केला आहे. मंत्री गिरिष महाजन यांनी मरण पावलेल्या बंजारा समाजाच्या चौघांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करावा अन्यथा त्यांना बंजारा समाज मते मागण्यासाठी तांड्यामधे फिरु देणार नाही असे देखील त्यांनी म्हटले आहे.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here