व्हाटसअ‍ॅप गृपच्या माध्यमातून शेतक-यांची फसवणूक करणा-यास अटक

जळगाव : व्हाटसअ‍ॅप गृपच्या माध्यमातून सोलर पंप सबसिडीचे आमिष दाखवत बनावट बॅंक खात्यात ऑनलाइन पैसे मागवून शेतक-यांची फसवणूक करणा-या ठगास चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. अविनाश सुभाष सावंत (रा. उपळी ता. वडवणी जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या ठगाचे नाव आहे. रितेश कुमार सिंग असे बनावट नाव धारण करुन बनावट कागदपत्रांच्या आधारे बॅंक खाते उघडून शेतक-यांची फसवणूक केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.  

याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला 19 जुलै 2021 रोजी प्रविण शरद जाधव (रा. करजगांव, ता. चाळीसगांव) यांनी फिर्याद दाखल केली होती. सन सिटी सोलर टेक्नॉलॉजी या नावाने अविनाश सावंत याने एक व्हाटसअ‍ॅप गृप तयार केला होता. या गृपच्या माध्यमातून त्याने आपले नाव रितेशकुमार सिंग असे धारण केले होते. अडीच लाख रुपये किमतीचा सोलर पंप 90 टक्के सबसिडी वजावट करुन अवघ्या 25 हजार रुपयात शेतक-यांना मिळेल असे आमिष त्याने जाहीरातीच्या माध्यमातून दाखवले होते.

समृद्धी सोलर या बनावट बॅंक खात्यात त्याने फिर्यादी प्रविण जाधव यांच्यासह इतर  शेतक-यांकडून  ऑनलाईन पैसे मागवले होते. कोणताही सोलर पंप न देता त्याने फिर्यादी प्रविण जाधव यांची 65 हजार रुपयात फसवणूक केली होती. पोलिस तपासाअंती अटकेतील अविनाश सावंत याने बनावट कागदपत्रे सादर करुन महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा चाकण येथे समृध्दी सोलर या नावाने बनावट खाते उघडल्याचे दिसून आले. आरोपीचा गुन्ह्यात कोणत्याही प्रकारे मागमूस नसतांना चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून बनावट खाते उघडणारा आरोपी निष्पन्न केला. त्याचे नांव अविनाश सुभाष सावंत (रा. उपळी, ता. वडवणी जि. बीड) असे निष्पन्न झाले. तो त्याची ओळख  लपवत फिरत होता.

अविनाश सावंत हा चाकण पुणे येथे असल्याची गोपनीय माहिती समजल्यानंतर पो.नि. संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार, मालती बच्छाव, पोहेकॉ नाईक, पोना शांताराम सिताराम पवार, पो.ना. भुपेश वंजारी, महिला पो.ना. अनिता सुरवाडे आदींच्या पथकाने त्याला चाकण येथून शिताफीने सापळा रचून ताब्यात घेत अटक केली. त्याने आपला गुन्हा कबुल केला. 29 जानेवारी पावेतो त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. फसवणूकीच्या रकमेतून त्याने नातेवाईक व मित्रांच्या नावे दिड लाख  रुपयांची एक चारचाकी कार, 18 हजार  रुपये किमतीचे दोन मोबाईल खरेदी केले आहेत. ते तपासकामी जप्त करण्यात आले आहेत. शेतक-यांनी तसेच नागरिकांनी अशा ऑनलाईन सबसिडीच्या आमिषाला बळी पडू नये असे पोलिसांच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here