दोन गावठी पिस्टल, दोन चॉपरसह तिघे ताब्यात

जळगाव : दोन गावठी पिस्टल आणि दोन चॉपरसह तिघांना भुसावळ तालुका पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. शाहरुख राजु पटेल (रा. साकेगाव ता. भुसावळ), विकास पांडुरंग लोहार (रा. श्रीराम नगर साकेगाव ता. भुसावळ) आणि   ‘जयसिंग उर्फ सोनु रायसींग पंडीत (रा. वाल्मीक नगर भुसावळ ता. भुसावळ) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. 

भुसावळ शहरानजीक साकेगाव परिसरात शाहरुख राजु पटेल हा त्याच्या कब्जात गावठी कट्टा बाळगून वावरत असल्याची गोपनीय माहिती उप विभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकातील पो.हे. कॉ. सुरज पाटील, रमण सुरळकर, पोलिस नाईक उर यासीन पिंजारी व संकेत झांबरे आदी सतर्क झाले होते. पथकातील सर्वकर्मचारी शाहरुख पटेल बाबत गोपनीय माहिती संकलीत करत होते तसेच त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते.

3 मे रोजी शाहरुख पटेल हा भुसावळ – साकेगाव रस्त्यावरील मराठी शाळेच्या पटांगणावर आला असल्याची माहिती पथकाला समजली. पथकाने काही समजण्याच्या आत त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्या कब्जातून एक गावठी पिस्टल, एक जिवंत काडतूस, दोन चॉपर आणि मोटार सायकल आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अधिक चौकशीअंती त्याने अजुन एक गावठी पिस्टल त्याचा मित्र विकास पांडुरंग लोहार याच्याकडे असल्याचे कबुल केले. त्या माहितीच्या आधारे विकास लोहार याला देखील ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल हस्तगत करण्यात आले. 

दोघांकडून अधिक चौकशीअंती जयसिंग उर्फ सोनू रायसिंग पंडीत (रा. वाल्मिक नगर भुसावळ) याचे नाव पुढे आले. जयसिंग याच्याकडून दोघांनी प्रत्येकी पंचवीस हजार रुपयात पिस्टलची खरेदी केल्याचे तपासात आणि चौकशीत उघडकीस आले आहे. त्यामुळे अटकेतील संशयीत आरोपींची एकुण संख्या तिन झाली आहे.

पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ उप विभागीय पोलीस अधिकारी पथकातील पो.हे. कॉ. सुरज पाटील, रमण सुरळकर, पो.ना. यासीन पिंजारी व पो.ना. संकेत झांबरे आदींनी केली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गु.र.न. 83/2023 शस्त्र अधिनीयम कलम 3/25, 5/25, 25 (6) (7) सह भा.द.वि. 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पो. नि. विलास शेंडे, स.पो.नि. अमोल पवार व त्यांचे सहकारी संजय सपकाळे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here