कमी किमतीत शो रुमच्या मोटार सायकली विकणारा नोकर गजाआड

जळगाव :  मालकाच्या गैर हजेरीत शोरुम मधील मोटार सायकली परस्पर कमी किमतीत विकणा-या नोकराचे कारनामे एलसीबी पथकाने उघडकीस आणले आहेत. भडगाव येथील साई ऑटो बजाज शो रुम मधे हा प्रकार संधी साधून सुरु होता. खुद्द शोरुम मालकाला अंधारात ठेवून सुरु असलेला हा चोरी आणि विक्रीचा प्रकार जळगाव एलसीबीच्या माध्यमातून पुढे आला आहे. शोएब खान रऊफ खान (रा. नगरदेवळा ता.पाचोरा) असे कमी किमतीत मोटार सायकल परस्पर विक्री करणा-या कामगाराचे नाव आहे. तब्बल तिस मोटारसायकली परस्पर विक्री झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या तिस मोटार सायकलींची किंमत 22 लाख 77 हजार 980 रुपये एवढी आहे.

भडगाव – चाळीसगाव रोडवरील साई ऑटो बजाज शोरुम मधे शोएब खान रऊफ खान हा कामगार नोकरीला होता. मालकाचा तो विश्वासू नोकर असल्याचे म्हटले जात होते. मालकाचा विश्वासू कामगार असल्यामुळे शो रुम उघडण्याचे आणि बंद करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. मालकाचा त्याच्यावर असलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेण्याची कुबुद्धी त्याला सुचली. संधी मिळेल तेव्हा शो रुम उघडण्यापुर्वी तो एखादी मोटारसायकल गुपचूप पंधरा हजारात विक्री करत होता. त्यानंतर विक्री करणारा ती मोटार सायकल पन्नास हजार रुपयात ग्राहकाला विक्री करत होता असे समजते.

या शो रुम मधील कामगार नवी कोरी मोटार सायकल अवघ्या पंधरा हजार रुपयात विक्री करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली. टिप मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने मोटार सायकली कुणीकुणी खरेदी केल्या, कुणाकडून खरेदी केल्या याची माहिती संकलीत करण्याचे काम सुरु केले.

शो रुम मालकाला गाड्यांच्या स्टॉक बाबत विचारणा केली असता तपासणीअंती त्यात मोठी तफावत आढळून आली. ज्या कामगारावर विश्वास ठेवला त्यानेच हा गैर प्रकार केल्याचे समजल्यानंतर शोरुम मालकाचे डोळे उघडले. शो रुम स्टॉकमधून 14 पल्सर, 16 प्लॅटीना अशा एकूण तिस मोटार सायकली कमी असल्याचा प्रकार उघडकीस आला. कामगार शोएब खान हा संधी साधून एक एक मोटार सायकल गुपचूप कमी किमतीत विक्री करत होता. त्याच्याकडून अकरा पल्सर आणि पंधरा प्लॅटीना अशा 19 लाख 58 हजार 139 रुपये किमतीच्या एकुण 26 मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. कर्जाचे हप्ते न भरणा-या ग्राहकांकडून जप्त करण्यात आलेल्या मोटार सायकली देखील कामगार शोएब याने कमी किमतीत विक्री केल्याचे समजते. त्या दृष्टीने तपास सुरु असल्याचे समजते. या प्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला गु.र.न. 171/23 भा.द.वि. 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील पोलीस उप निरीक्षक गणेश वाघमारे, हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, संदिप सावळे, जयंत चौधरी, विजय पाटील, राहुल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, नंदलाल पाटील, ईश्वर पाटील, प्रमोद ठाकुर, मोतीलाल चौधरी, अनिल जाधव, नितीन बावीस्कर, श्रीकृष्ण देशमुख, हेमंत पाटील, राहुल बैसाणे, महेश पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here