सासरच्या मंडळींची लालसा वाढतच गेली;संध्याने अखेर आपली जीवनयात्रा संपवली

मयत संध्या

जळगाव : लाडात वाढलेली संध्या लग्नायोग्य झाली होती. त्यामुळे तिच्या आईवडीलांना तिच्या लग्नाची चिंता सतावत होती. त्यामुळे त्यांनी तिच्यासाठी योग्य वर शोधण्याचे काम सुरु केले होते. विविध ठिकाणी वर संशोधन केल्यानंतर त्यांना जळगाव जिल्हयाच्या पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथील भारुडे परिवाराचे स्थळ योग्य वाटले. दोन्ही बाजूने बोलणी यशस्वी झाल्यानंतर मध्य प्रदेशातील शहापूर येथील संध्याचे लग्न राणीचे बांबरुड येथील राजेंद्र भारुडे या तरुणासोबत थाटामाटात झाले.

लग्नानंतर संध्या जळगाव जिल्हयाच्या पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथे सासरी राहण्यास आली. लग्नापुर्वीची संध्या ठोसरे लग्नानंतर संध्या भारुडे झाली होती. लग्नानंतर तिचे नवलाईचे नऊ दिवस भरकन निघून गेले. संध्या व राजेंद्र यांच्या संसार वेलीवर मुलगी साक्षी व मुलगा चिराग यांचे आगमन झाले. त्यामुळे संध्या खुष होती. मात्र लग्नानंतर जसजसे दिवस आणि वर्ष बदलत होते त्याप्रमाणे तिला सासरच्या लोकांच्या स्वभावातील बदल तिला दिसू लागला.

काही वर्षे सुखात गेल्यानंतर संध्याला तिच्या सासरच्या मंडळींनी  माहेरुन पैसे आणण्याचा तगादा सुरु केला. प्लॉट विकत घेण्यासाठी दिड लाख रुपये कमी पडत असल्याच्या कारणावरुन तिला माहेरुन पैसे आणण्यासाठी सासू सासरे व इतर मंडळींनी त्रास देण्यास सुरुवात केली. माहेरहून पैसे घेऊन ये, पैसे नाही आणले तर तुझ्या आई वडिलांकडेच रहा असे सांगून तिला माहेरी पाठवून देण्यात आले. हा सर्व प्रकार तिने माहेरी आल्यावर कथन केला.

तिचा भाऊ विजय ठोसरे  याने तिची समजूत काढली. चार जेष्ठ नातेवाईक एकत्र बोलावून विचार विनीमय करण्यात आला. सासरच्या मंडळींनी संध्याला त्रास देवू नये तसेच ती सासरी सुखात रहावी यासाठी दिड लाख रुपये घेवून तिचा भाऊ तिला घेवून तिच्या सासरी आला. सासरच्या लोकांना दिड लाख रुपये मिळाल्यानंतर त्यांचे समाधान झाले. आता आपली बहिण सुखात राहील असा आशावाद विजय ठोसरे यांना होता. मात्र मागणीनुसार पैसे मिळतात अशी समजूत झाल्यामुळे तिच्या सासरच्या लोकांनी तिच्याजवळ पुन्हा साडेतीन लाख रुपये घेवून येण्याचा तगादा लावला.

पैसे आणले नाही तर तुला माहेरी सोडून देवू अशी तिला धमकी देण्यात आली. तिने हा सर्व प्रकार पुन्हा माहेरी भावाजवळ कथन केला. आता तिचा भाऊ देखील तिच्या सासरच्या मंडळींमुळे वैतागला होता. मात्र बहिणीच्या सुखासाठी त्याने पुन्हा त्या विषयात लक्ष घातले. त्यामुळे तिचा भाऊ विजय ठोसरे याने पुन्हा कसेबसे तिच्या सासरी जावून साडे तीन लाख रुपयांची पुर्तता करुन दिली.

16 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 वाजता संध्याचा भाउ विजय ठोसरे यास राजेंद्र भारुडे यांचा फोन आला. त्यात पलीकडून विजय ठोसरे यांना निरोप मिळाला की बहिण संध्या हिने तिच्या सासरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. संध्याच्या माहेरची मंडळी दुपारी चार वाजेच्या दरम्यान राणीचे बांबरुड या गावी पोहोचले. तोपर्यंत तिच्या मृतदेहाचे शव विच्छेदन पुर्ण झाले होते. तसेच तिचा मृतदेह तिच्या सासरी आणला गेला होता.

मयत संध्याचा भाऊ व नातेवाईकांनी गावात चौकशी केली असता त्यांना समजले की संध्या हिने सकाळी साडे नऊ वाजता गळफास घेतला होता. मात्र फोनवर निरोप साडे अकरा वाजता मिळाला. त्यामुळे संध्याचा भाऊ विजय ठोसरे यास सासरच्या मंडळींवर शंका येवू लागली. निरोप उशीरा देण्याचे कारण काय असावे अशी शंका संध्याच्या भावाला आली.

या प्रकरणी 17 ऑगस्ट रोजी विजय ठोसरे यांच्या फिर्यादीनुसार संध्याचा पती पती राजेंद्र कौतिक भारुडे, सासू लक्ष्मीबाई कौतिक भारुडे, दीर संतोष कौतिक भारुडे, दीर ज्ञानेश्वर कौतिक भारुडे, नणंद मनीषाबाई, बालाबाई यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भा.द.वि. कलम 306 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

मयत संध्याचा भाऊ विजय ठोसरे  याने माध्यमांशी बोलतांना तिच्या सासरच्या मंडळींवर आरोप करत विविध संशयास्पद बाबी व्यक्त केल्या. आपल्या बहिणीने आत्महत्या केली नसून तिचा घातपात करण्यात आला आहे. गावातील लोकांकडून समजलेल्या माहितीनुसार घटना सकाळी साडे नऊ वाजता झाली तर आपल्याला फोनवर निरोप दुपारी साडे अकरा वाजता उशीरा का देण्यात आला? पोलिस येण्यापुर्वीच तिचा मृतदेह का उतरवण्यात आला? शव विच्छेदन लवकर कसे आटोपले? अशा विविध प्रकारच्या शंका संध्याचा भाऊ विजय ठोसरे यांनी माध्यमांशी बोलतांना उपस्थित केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here