जबरी चोरी करणा-या रिक्षाचालकास साथीदारासह अटक

जळगाव : रिक्षातील प्रवाशाच्या खिशातील मोबाईल व रोख रक्कम जबरीने काढून घेत पलायन करणा-या रिक्षाचालकासह त्याच्या साथीदारास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. आयुष सुवर्णसिंग तोमर आणि पवन निवृत्ती लोहार असे जेरबंद करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की 17 जून रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील चटई कारखान्यात काम करणारे जितेंद्रसिंग मौर्य हे रेल्वे स्टेशनवर तिकीट काढण्यासाठी गेले होते. तिकीट काढल्यानंतर पुन्हा एमआयडीसी परिसरात येण्यासाठी त्यांना त्याच रिक्षाचालकाने आपल्या रिक्षात बसवले. रिक्षाचालकाने जबरी चोरीच्या उद्देशाने प्रवासी मौर्य यांना मेहरुण तलावाकडे नेले. मेहरुण तलाव परिसरात रिक्षाचालकासह त्याच्या साथीदाराने मौर्य यांच्या खिशातील पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि एक हजार रुपये रोख जबरीने काढून घेत पलायन केले.

या घटने प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला जिंतेद्र मौर्य यांनी दिलेल्या फिर्यादींनुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या पुढील तपासात निष्पन्न झालेल्या आयुष सुवर्णसिंग तोमर आणि पवन निवृत्ती लोहार (दोघे रा. श्रीकृष्ण नगर, कुसुबा – जळगाव) यांना जेरबंद करण्यात आले. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे. दोघांना न्या. श्रीमती सुवर्णा कुलकर्णी याच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना 22 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. निखील कुलकर्णी यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. पो.नि. जयपाल हिरे  यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक आनंदसिंग पाटील, स.फौ. अतुल वंजारी, किशोर पाटील, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, साईनाथ मुंढे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. अटकेतील आरोपींकडून अजून अशा स्वरुपाचे गुन्हे उघडकीस  येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here