गुटखा किंग राज भाटीयाचा हस्तक जेरबंद

नाशिक : दिल्ली व जयपूर येथून सुत्रे हलवून देशातील विविध राज्यांमधे गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी करणारा गुटखा किंग राज भाटीया याचा नाशिक येथील हस्तक तुषार जगताप यास नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध इगतपूरी पोलिस स्टेशनला सन 2021 मधे गुन्हा दाखल होता.

दिनांक 26 मे 2023 रोजी इगतपुरी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर मुंबईकडे जाणारे गुटख्याने भरलेले दोन कंटेनर पकडून सुमारे सव्वा कोटींचा अवैध गुटखा जप्त केला होता. याप्रकरणी इगतपुरी पोलीस स्टेशनला गु.र.न. 112/23 भा.द.वि. 328, 272, 273, 188, 465, 471, 34 सह अन्न सुरक्षा मानके कायदा सन 2006 चे कलम 59 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयात मुख्य आरोपी राज किशनकुमार भाटिया (38), रा. जयपूर, राजस्थान यास 23 जून 2023 रोजी जयपूर येथून अटक करण्यात आली होती.

आरोपी राज भाटिया हा दिल्ली व जयपूर येथून सुत्रे हालवून बंद कंटेनरमध्ये गुटखा लपवून देशातील विविध राज्यांमध्ये गुटख्याची मोठया प्रमाणावर तस्करी करत होता. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुटखा तस्करीबाबत दाखल गुन्हयांमध्ये मागील दोन ते तीन वर्षांपासून आरोपी राज भाटीया हा फरार होता. या गुन्हयाच्या तपासादरम्यान आरोपी राज भाटिया याने कबुली दिली की, तो सन 2021 पासून नाशिक येथील तुषार जगताप याच्या संपर्कात होता. तुषार जगताप याच्या मदतीने महाराष्ट्रातील अवैध गुटख्याचे तो नेटवर्क चालवत होता.

या माहितीच्या आधारे इगतपुरी पोलीस स्टेशनला दाखल गु.र.नं 675/21 भादवि कलम 328, 272, 273, 188, 420, 465, 468, 471, 34 सह अन्न सुरक्षा मानके कायदा कलम 59 या गुन्हयामध्ये आरोपी नामे तुषार कैलास जगताप (रा. त्रिमुर्ती नगर, नाशिक) यास अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास इगतपुरी पोलिस स्टेशनचे पो.नि. राजु सुर्वे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here