नगरसेवक दारकुंडे यांचा रेशन परवाना निलंबीत

जळगाव : “शासन आपल्या दारी” या सरकारी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी होण्यासाठी रेशन लाभार्थ्यांच्या मनात भिती घालणारे, दम भरणारे चुकीचे संदेश सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रसारित केल्याचे उघड झाल्याने नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांचा रेशन दुकान परवना निलंबीत करण्यात आला आहे. “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्यास स्वस्त दरात मिळणारे धान्य बंद होईल अशा स्वरुपाचा हा संदेश होता.

सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी अशा स्वरुपाच्या अफवा, चुकीची माहिती प्रसारित करणा-या व्यक्तींवर कारवाईची मागणी केली होती. नगरसेविका गायत्री शिंदे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. अशाच स्वरुपाच्या तक्रारी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्याकडे देखील नागरिकांनी केल्या होत्या. दीपककुमार गुप्ता यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे योग्य स्पष्टीकरण नागरिकांना देत त्यांच्या मनातील भिती दूर करण्याचा प्रयत्न केला होता. नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्या सोशल मिडीयावरील संदेशाची आणि त्याबाबत आलेल्या तक्रारीची दखल घेत त्यांचा रेशन दुकान परवाना महसुल प्रशासनाने निलंबीत केला आहे. याशिवाय तहसिलदारांच्या माध्यमातून धान्य वितरणाची चौकशी देखील करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड यांनी दिले आहेत. दारकुंडे यांच्या दुकानातून स्वस्त दरातील धान्य घेणा-या लाभार्थ्यांची सोय अन्य दुकानातून केली जाणार आहे.   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here