जळगावचे माजी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याविरुद्ध गुन्हा

एअरटेल या आघाडीच्या दूरसंचार सेवेत काम करणार्‍या दोघा अभियंत्यांना इंटरनेट राउटरच्या मुद्द्यावरून आयएएस अधिकारी अमन मित्तल आणि त्यांचा भाऊ देवेश मित्तल तसेच इतरांनी नवी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी मारहाण केल्याच्या आरोपाखाली रबाळे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 डिसेंबर रोजी सायंकाळी पाईप आणि लाकडी काठ्यांनी दोघांवर झालेल्या या हल्ल्यात रहिवासी सोसायटीचे चार सुरक्षा रक्षक देखील सहभागी झाल्याचे म्हटले जात आहे.

आयएएस अधिकारी अमन मित्तल सध्या महाराष्ट्र पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे उपसचिव म्हणून कार्यरत आहेत. एअरटेल फायबर इंटरनेट इन्स्टॉलेशन सेवेसाठी काम करणारे दोघे जण  इंटरनेट राउटरची समस्या सोडवण्यासाठी मित्तल यांच्या निवासस्थानी आले होते. बेडरूममध्ये अपेक्षित इंटरनेट रेंज मिळत नसल्याची मित्तल यांची तक्रार होती.

एअरटेलसाठी अभियंता म्हणून काम करणाऱ्या सागर मांधरे यांनी दाखल केलेल्या एफआयआरचा हवाला देत एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की अमन मित्तल आणि त्याचा भाऊ देवेश यांच्यासह इमारतीच्या चार सुरक्षा रक्षकांनी पाईप आणि लाकडी दांडक्याने दोघा अभियंत्यांवर हल्ला केला. सागर मांधरे आणि भुषण  गुजर अशी या दोघा अभियंत्यांची नावे आहेत. इमारतीच्या आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे, असे सांगितले जात आहे.

मित्तल बंधू आणि चार सुरक्षा रक्षकांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत धोकादायक शस्त्राने किंवा इतर मार्गाने दुखापत करणे आणि चुकीच्या पद्धतीने बंदिस्त ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान आयएएस अधिकारी मित्तल यांनी देखील मांधरे आणि गुजर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मित्तल यांच्या तक्रारीनुसार मांधरे आणि गुजर यांच्या विरोधात आयपीसीच्या कलम 324 (स्वैच्छिकपणे धोकादायक शस्त्राने किंवा साधनाने दुखापत करणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here