अंबर दिव्याने माजवली हिंगोलीत खळबळ ; पीएसआय सोबत आरडीसींनी ओकली गरळ

Vehicle of RDC

हिंगोली : विनापरवाना खासगी वाहनावर अंबर दिवा लावण्यासह विविध कलमान्वये हिंगोली येथील आरडीसी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यावर शनिवारी गुन्हा दाखल करण्याबाबतची तक्रार (फिर्याद नव्हे ) देण्यात आली आहे. पोलिस उप निरीक्षकास अरेरावी करणे, शिवीगाळ करणे तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी वादाचा प्रकार हिंगोली शहर पोलिस स्टेशनच्या पोलिस उप निरिक्षकासोबत दोन दिवसांपुर्वी घडला. या घटनेची सर्वत्र चर्चा होतांना दिसत आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ पोलिस अधिका-यांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता असे देखील समजते. मात्र संबंधीत पोलिस उप निरीक्षकाने धाडस दाखवत या घटनेच्या नोंदी घेतल्या.  

या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की साईनाथ भुमन्ना अनमोड हे हिंगोली शहर पोलिस स्टेशनला पोलिस उप निरिक्षक पदावर कार्यरत आहेत. 13 जून रोजी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना बंदोबस्त कामी उप निरीक्षक साईनाथ अनमोड हे आपल्या सहका-याच्या मदतीने हिंगोली येथील इंदिरा चौकात ड्युटीवर हजर होते. दरम्यान सकाळी 11.50 वाजता त्यांना अकोला बायपासमार्गे एक चारचाकी वाहन (एमएच 23 एएस 7223) येतांना दिसले. या वाहनावर अंबर दिवा लावलेला होता. पो.उ.नि. साईनाथ अनमोड यांनी या वाहनाला थांबवून हाफ पॅंटवर असलेल्या चालकाची विचारपूस केली. त्यावर चालकाने त्यांना आपले नाव गाव न सांगता सांगीतले की मी या जिल्हयाचा आरडीसी आहे. काही वेळाने तपासाअंती सदर चालक हे आरडीसी सुर्यवंशी असल्याचे उपनिरीक्षक अनमोड यांना समजले. त्यावेळी उप निरिक्षक अनमोड यांनी चालकाच्या रुपातील आरडीसी सुर्यवंशी यांना त्यांच्या ताब्यातील वाहन सरकारी आहे की खासगी? याबबत विचारणा केली. सदर वाहन खासगी असल्याचे समजल्यानंतर अनमोड यांनी म्हटले की साहेब तुम्हाला खासगी वाहनावर अंबर दिवा लावता येत नाही.

त्यावेळी संतप्त झालेल्या चालक सिटवर बसलेल्या आरडीसी यांनी अनमोड यांना म्हटले की आता तु मला नियम शिकवणार आहे का? तुझी काय औकात आहे बे, थांब तुझ्या एस.पी. ला फोन लावतो, असे म्हणत त्यांनी कुणाला तरी फोन लावत बोलण्यासाठी दडपण टाकण्यास सुरुवात केली. मात्र अनमोड यांनी त्या मोबाईलवर संबंधितासोबत बोलण्यास नकार दिला. आरडीसी सुर्यवंशी यांना सरकारी वाहनात बसण्यास सांगण्यात आले व वाहन पोलिस स्टेशनला घेण्याची सुचना अनमोड यांनी आपल्या सहका-यास केली. त्यावर संतप्त झालेल्या आरडीसी यांनी अनमोड यांना म्हटले की अबे साल्या सोड माझी गाडी, माझी गाडी कुठे घ्यायची ते सांग मला. त्यांच्या वाहनात काही कर्मचा-यांना बसवून गाडी पोलिस स्टेशनला घेण्यास अनमोड यांनी सांगितले. त्यांच्या मागे मागे उप निरीक्षक अनमोड देखील त्यांच्या ताब्यातील वाहनाने पोलिस स्टेशनला आले.

या गदारोळात पो.नि.सैय्यद यांनी अनमोड यांना आरडीसी यांच्या समक्ष आपल्या कॅबीनमधे बोलावले. त्याठिकाणी आरडीसी सुर्यवंशी यांनी अनमोड यांना सुनावले की की तुझी काय औकात आहे बे, माझी गाडी पकडायची? तु मला कायदा शिकवणार आहे का? या घटनेबाबत पो.उ.नि. अनमोड यांनी सविस्तर नोंद घेतली. या नोंदीनंतर महिला प्रोबेशनरी डीवायएसपी जगताप यांनी देखील नोंद घेतली. या नोंदी दरम्यान सदर आरडीसी यांचे आडनाव सुर्यवंशी असल्याचे अनमोड यांना समजले.

सदर प्रकरण मिटवून घेण्याचा सल्ला वरिष्ठ पातळीवरुन अनमोड यांना देण्यात आला होता असे समजते. या प्रकरणी कोणतेही चालान न घेता वाहन बेकायदा सोडून देण्यात आले असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपास अधिका-यांनी हस्तगत करण्याची मागणी वजा  विनंती अनमोड यांनी केली आहे.

दरम्यान हिंगोलीचे प्रभारी पोलिस उप अधिक्षक (गृह) यांनी दुस-या दिवशी एक प्रेस नोट प्रसिद्धीस दिली. त्यात म्हटल्यानुसार उप  निरिक्षक साईनाथ अनमोड यांनी निवासी उप जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी हिंगोली यांच्याविरुद्ध कलम 353, 294, 506, 188 तसेच 108 केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 सह कलम 179 मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार दिली आहे. सदर तक्रार पोलिस अधिक्षक हिंगोली यांच्या आदेशाने रामेश्वर वेंजने, उप विभागीय पोलिस अधिकारी, उप विभाग हिंगोली शहर यांच्याकडे चौकशीकामी वर्ग करण्यात आली आहे. या प्रकरणी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे स्पष्टीकरण प्रसिद्धी पत्रकात नमुद करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेमुळे हिंगोली शहरात खळबळ माजली आहे.        

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here