महसुल पथका-च्या अंगावर वाहन घालणा-यास अटक

जळगाव : वाळूची अवैध वाहतूक करणा-यांविरुद्ध कारवाई सुरु असतांना भरधाव डंपर अंगावर घालून मंडळ अधिका-यास जीवे ठार करण्याचा प्रयत्न करणा-या डंपर चालकासह वाहन मालक अशा दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुंडलिक उर्फ तेजस ज्ञानेश्वर सोनवणे रा. नांद्रा खुर्द ता. जळगाव (चालक) आणि सुभाष पंडीत कोळी (डंपर मालक) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

वरणगाव येथे मंडळ अधिकारी रजनी शंकर तायडे या आपल्या पथकासह वाळूच्या अवैध वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उभ्या होत्या. त्यांनी एका संशयीत भरधाव डंपर चालकास थांबण्याचा इशारा केला. मात्र चालक पुंडलीक सोनवणे याने त्याच्या ताब्यातील वाहन न थांबवता ते महसुल पथकाच्या अंगावर नेत त्यांना जीवे ठार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चालक पुंडलिक सोनवणे याने वाहन सोडून पलायन केले. याप्रकरणी वरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पो.नि. किसनराव नजनपाटील व त्यांच्या सहका-यांनी दोघांना नांद्रा खुर्द येथून ताब्यात घेत अटक केली आहे. पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्यासह त्यांच्या पथकातील स.पो.निरी. निलेश राजपुत, हे.कॉ. संदिप सावळे, किरण धनगर, नंदलाल पाटील, पोना भगवान पाटील, पोकॉ मोतीलाल चौधरी, पो.कॉ. ईश्वर पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील दोघांना वरणगाव पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here