जैन चॅलेंज चषक क्रिकेट स्पर्धेत रुस्तोमजी इंटरनॅशनल स्कूल अंजिक्य

जळगाव दि. १७ प्रतिनिधी –  जैन इरिगेशन सिस्टीम लि. कंपनीतर्फे प्रायोजीत आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस ॲकडमीतर्फे आयोजित २१ वी जैन चॅलेंज चषक १६ वर्षाखालील मुलांच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रुस्तोमजी इंटरनॅशनल स्कूल व विद्या इंग्लिश स्कूल यांच्यात झाला. यात रुस्तोमजी इंटरनॅशनल स्कूल विजयी ठरले. तर विद्या इंग्लिश स्कूलचा संघ उपविजयी झाला. विजयी उपविजयी संघाला जैन चॅलेंज चषक देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार वितरणा प्रसंगी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अभंग जैन, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष यूसुफ मकरा, सचिव अरविंद देशपांडे, सदस्य रविंद्र धर्माधिकारी, मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकूल उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजयी, उपविजयी संघासह खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिके प्रदान करण्यात आली.

अनुभूती निवासी स्कूलच्या क्रिकेट मैदानावर दि. ८ ते १७ आजपर्यंत झालेल्या स्पर्धेत १५ संघांनी सहभाग घेतला. १६ वर्षाखालील आंतरशालेय स्पर्धा बाद पद्धतीने घेण्यात आल्या.  अंतिम सामनाचा नाणेफेक रुस्तोमजी स्कूल ने जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. विद्या इंग्लीश स्कूलने प्रथम फलंदाजी करताना २५ षटकात ७ गडी बाद ११८ धावा केल्या. त्यात कुशल नाईक २७, निशांद तडवी व निशिल भंगाळे प्रत्येकी २२ धावा केल्या. तर गोलदांजीत आर. एन. नथानी व प्रथमेश साळुंखे यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. लक्ष्याचा यशस्वीपणे  पाठलाग करताना रुस्तोमजीने २२ षटकात ६ गडी बाद ११९ धावा करीत सामना ४ गडी राखून जिंकला. त्यात मित कुकरेजा याने २७ आरव तोडकरी नाबाद २५ धावा केल्या.  गोलंदाजीत जीत अटक २, मानस पाटील, राहिल शेख, सौरभ पाटील प्रत्येकी १ गडी बाद केले. 

अंतिम सामन्यात सोहम जैन याने १३ धावा व १ गडी घेत सामानावीर ठरला. त्याला ट्रॉफी देऊन सन्मानित केले. उत्कृष्ट फलंदाज ठरलेला हर्षवर्धन पाटील (पंकज विद्यालय चोपडा) याला बॅट, ग्लोज व चषकाने गौरविले गेले. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गिरीष पाटील (काशिनाथ पलोड जळगाव) क्रिकेट शूज, चषक व बॉल देऊन सन्मानित केले. मालिकावीर म्हणून मानस पाटील (विद्या इंग्लीश स्कूल) पुर्ण क्रिकेट साहित्याची किट, चषक देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरणा प्रसंगाचे सूत्रसंचालन मोहम्मद फजल यांनी केले. यशस्वीतेसाठी जैन स्पोर्टस ॲकडमीच्या सर्व सहकाऱ्यांनी सहकार्य  केले.

खेळाडूवृत्तीमुळे अभ्यासात होते प्रगती – युसूफ मकरा – १६ वर्षाआतील क्रिकेट स्पर्धेतील विजयी, उपविजयी खेळाडूंना शुभेच्छा देताना युसूफ मकरा यांनी खेळाडूंनी अभ्यासासोबतच क्रिकेट खेळले पाहिजे यातून खेळाडूवृत्ती विकसीत होऊन आपल्या आरोग्याचा सर्वांगिण विकास होत असतो. खेळ, खेळाडूंसोबतच जैन इरिगेशन नेहमीच प्रोत्साहन देत असून ती आपल्यासाठी भूषणावह बाब असल्याचे युसूफ मकरा म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here