आर्थिक वादाची किनार झाली बेतापेक्षा धारदार!! — रॉडच्या हल्ल्यात भावेश झाला कायमचा गप्पगार

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क): जळगाव जिल्ह्यातील भुसावळ हे तालुक्याचे ठिकाण रेल्वेचे जंक्शन स्टेशन देखील आहे. याठिकाणी देशभरातील सर्व प्रकारच्या प्रवासी आणि मालवाहू रेल्वेगाड्या थांबतात. आशिया खंडातील हे मोठे रेल्वे स्थानक आहे. याठिकाणी रेल्वेचा अवाढव्य कारभार असल्यामुळे साहजीकच येथे गुन्हेगारी देखील बोकाळली आहे. याठिकाणी गुन्हेगारांना उतरण्यासाठी, मुक्कामासाठी जागा आणि  पलायन करण्यासाठी हजर स्टॉकमधे रेल्वेगाड्या उपलब्ध असतात.

भुसावळ शहरानजीक दिपनगर हे विज निर्मितीचे स्टेशन आहे. या थर्मल पॉवर स्टेशनला विज निर्मीतीसाठी कोळश्याची गरज भासते. त्यामुळे रेल्वेने येणा-या कोळश्याची या परिसरात चोरी होत असते. त्या अनुशंगाने या परिसरात गुन्हे देखील घडत  असतात. यार्डात अथवा आऊटरला थांबलेल्या गाड्यांच्या वॅगनचे दरवाजे उघडून खुलेआम कोळशाची चोरी होण्याचे प्रकार भुसावळला सुरु असल्याचे लोक बघतात. दिपनगर परिसरातील विट भट्टीसह महामार्गालगत असलेल्या ढाब्यांवरील शेगड्यांना कोळसा लागत असतो. रेल्वे वॅगनमधून चोरी केलेला कोळसा याठिकाणी विक्री केला जातो असे  लोक दबक्या आवाजात म्हणत असतात.

भावेश भालेराव

भुसावळ शहरानजीक फेकरी शिवारात रेल्वेचे झेडटीसी अर्थात झोनल ट्रेनिंग सेंटर आहे. रेल्वेत नोकरी मिळालेल्या कर्मचा-यांना याठिकाणी भरतीपुर्व प्रशिक्षण दिले जाते. या परिसरात रोशन बबन हुसळे आणि सागर बबन  हुसळे हे दोघे भाऊ कोळसा चोरीत अग्रेसर असल्याची कुजबुज लोक करत असतात. याशिवाय हे दोघे हुसळे बंधू पत्ते खेळण्याचा अड्डा देखील चोरुन लपून चालवत होते. फेकरी शिवारातील भगवान सावळे नगर आणि झेडटीसी परिसरातील शिव रोडच्या बाजुला पडीक जागेतील काटेरी झाडाझुडूपात या दोघा हुसळे बंधूंच्या अधिपत्याखाली पत्त्यांचा डाव चालवला जात असे. पत्ते खेळण्याची सवय असलेले तरुण याठिकाणी पत्त्यांचा डाव खेळण्यासाठी येत होते.

आलेल्या ग्राहकांना पत्त्यांचा डाव खेळण्यासाठी जागा, पत्त्यांची कॅट आणि आवश्यक इतर  साहित्य उपलब्ध करुन दिले जात होते. हळूहळू या हुसळे बंधूंचा हा बेकायदा धंदा जोर धरण्यास सुरुवात झाली. परिसरात राहणारे, मजुरी करणारे तरुण हेच या हुसळे बंधूंचे पत्ते खेळणारे ग्राहक होते. ज्यादिवशी या मजुरांना कामधंदा नसायचा त्यादिवशी हे तरुण याठिकाणी पत्ते खेळण्यासाठी येत होते. इतर  ग्राहकांप्रमाणेच भावेश अनिल भालेराव हा तरुण देखील याठिकाणी रमीचा डाव  खेळण्यासाठी येत होता.

भावेश भालेराव आणि रोशन हुसळे या दोघांचा गेल्या काही दिवसांपासून आर्थिक वाद सुरु होता. चर्चेतून समजलेल्या माहितीनुसार बॉक्सिंगपटू भावेश  भालेराव याने रोशन हुसळे याला काही रक्कम उधार दिली होती. भावेश आपले पैसे रोशनकडे मागत होता. भावेशचा पैशांसाठी सततचा तगादा सुरु असल्यामुळे रोशन वैतागला होता. याशिवाय आपल्या अवैध धंद्यांची माहिती भावेश पोलिसांना तर  देत नसावा अशीदेखील शंका हुसळे बंधूंना येत होती असे म्हटले जाते. त्यामुळे भावेशचा कायमचा काटा काढण्याचे रोशनचे नियोजन सुरु होते. रोशन हा भावेशचा काटा काढण्यासाठी संधीची वाट  बघत  होता. भावेश भालेराव आणि  रोशन हुसळे यांच्यातील आर्थिक वाद पराकोटीला गेला होता.

13 जानेवारी रोजी मजुरीचे काम नसलेले काही तरुण याठिकाणी झाडाझुडूपात असलेल्या अड्ड्यावर रमीचा डाव खेळण्यास आले  होते. अड्ड्यावर भावेश भालेराव हा देखील आला होता. भावेशला बघून रोशन हुसळे याच्या मनात त्याच्याविषयी राग संचारला. भावेश भालेरावसह सहा ते सात जण रमीचा डाव खेळण्यात दंग असतांना अचानक पावणे बारा वाजेच्या सुमारास रोशन हुसळे हा हातात लोखंडी रॉड घेऊन आला. आलेल्या रोशनने थेट भावेशच्या दिशेने चाल केली. हातातील लोखंडी रॉडने त्याने थेट भावेशच्या डोक्यावर घाव घातला. दोन्ही हातांनी पुर्ण ताकदीनिशी डोक्यावर लोखंडी रॉडचा घाव  बसल्यामुळे बॉक्सिंगपटू भावेश जमीनीवर कोसळला.

जमीनीवर कोसळलेल्या भावेशच्या डोक्यात संतप्त रोशन हुसळे याने अजून घाव  घालण्यास सुरुवात केली. एवढे कमी  झाले म्हणून की  काय  रोशन हुसळे याच्यासोबत असलेला त्याचा साथीदार आकाश परदेशी याने त्याच्याकडील चाकूने जखमी भावेशच्या गळ्यावर घाव घातले. एकाच वेळी डोक्यावर लोखंडी रॉडचे घाव  आणि  गळ्यावर चाकूचे घाव झाल्याने भावेशचे मरण निश्चित झाले. अचानक खूनी हल्ल्याची घटना आपल्या नजरेसमोर झाल्याचे बघून पत्त्यांचा डाव  खेळणारे आणि  खेळण्यास आलेले सर्वजण घाबरुन हातातील पत्ते जागेवरच सोडून पळून गेले. हल्लेखोर रोशन हुसळे आणि  त्याचा भाऊ  सागर हुसळे या दोघांविरुद्ध पोलिस दप्तरी विविध गुन्हे दाखल असल्यामुळे घाबरुन घटनास्थळावरुन पलायन करणा-या कुणीही पोलिसांना घटनेची माहिती दिली नाही. 

दरम्यान घरातून बाहेर गेलेला भावेश अद्यापही घरी परत आला नाही म्हणून त्याची आई हैरान झाली. भावेशचा मोठा भाऊ हरीष आपले मजुरीचे काम आटोपून दुपारी साडेतीन वाजता घरी  परत आला. त्यावेळी त्याला त्याच्या आईने म्हटले की  दुपार उलटून गेली तरी  भावेश घरी परत  आलेला नाही.  तो कुठे गेला असेल काही कळायला मार्ग नाही. त्याचा मोबाईल देखील लागत नाही. काहीतरी अघटीत तर  झाले नसेल या भितीने त्याची आई  धास्तावली होती. हरिष भालेराव याने त्याचा लहान भाऊ  भावेश याचा सर्वत्र शोध  घेतला. मात्र तो कुठेही आढळून आला नाही. भावेश हा पत्ते खेळण्यासाठी काटेरी झाडाझुडूपात लपूनछपून चालणा-या  अड्ड्यावर जात  असल्याचे हरिष यास माहिती होते. त्यामुळे तो भावेशचा शोध घेण्यासाठी तो याठिकाणी आला असता त्याला भिषण दृष्य दिसले.

आपला लहान भाऊ  रक्ताच्या थारोळ्यात मरण पावला असल्याचे त्याला दिसले. त्याठिकाणी रक्ताचे डाग आणि पत्यांच्या कॅटसह पत्ते विखुरलेल्या अवस्थेत पडलेले होते. मरण  पावलेल्या रक्ताच्या थारोळ्यातील भावेशच्या गळ्यावर धारदार हत्याराचे वार त्याला दिसून आले. त्याच्या डोक्यावर देखील जोरदार हल्ला झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. लहान भाऊ  भावेशचा खून  झाल्याचे बघून हरिषने जोरजोरात रडण्यास सुरुवात केली. हरिषचा जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकून परिसरातील लोक त्याठिकाणी जमा झाले. दरम्यान कुणीतरी या घटनेची माहिती भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला दिली. माहिती मिळताच डिवायएसपी कृष्णात पिंगळे व पोलिस निरीक्षक बबन जगताप, सहायक पोलिस निरीक्षक अमोल पवार, हे.कॉ.  संजय तायडे, संजय भोई आदींनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस पथकाने लागलीच मयत  भावेश भालेराव याचा मृतदेह उत्तरीय तपासणीकामी रवाना केला. सुरुवातीला  या घटनेप्रकरणी मयत  भावेश भालेराव याचा मोठा भाऊ हरिष भालेराव याने दिलेल्या फिर्यादीनुसार भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला अज्ञात मारेक-याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भाग 5 गु.र.न. 8/24 भा.द.वि. 302 नुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. अमोल पवार यांच्याकडे सोपवण्यात आला.

घटना घडली त्याठिकाणी काटेरी झाडाझुडूपात रोशन बबन हुसळे हा पत्त्यांचा अड्डा चोरुन लपून चालवत असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे संशयाची सुई  अर्थातच त्याच्यावर आली. पोलिस पथकाकडून त्याचा शोध  सुरु करण्यात आला. दरम्यान संशयीत व फरार झालेला रोशन हुसळे हा  कोपरगाव येथे पळून जाण्याच्या बेतात असल्याची गोपनीय माहिती डिवायएसपी कृष्णात पिंगळे यांना समजली. त्यांनी आपले सहकारी कर्मचारी हे.कॉ. सुरज पाटील यांना त्याचा शोध  घेण्याकामी रवाना केले. दरम्यान साकरी पुलाजवळ संशयीत आरोपी रोशन हुसळे हा एका  आडोश्याला उभा असल्याची गोपनीय माहिती हे.कॉ. सुरज पाटील यांना समजली. त्यांनी त्याचा माग  काढत त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याला डिवायएसपी कृष्णात पिंगळे व पोलिस निरीक्षक बबन जगताप यांच्यासमक्ष हजर  करण्यात आले. त्याने आपला साथीदार आकाश परदेशी याचा देखील या खूनी हल्ल्यात सहभाग असल्याचे कबुल केले.

त्यानंतर या गुन्ह्याचा सखोल तपास भुसावळ तालुका पोलिस स्टेशनचे पो.नि. बबन  जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल पवार यांच्याकडे आला. त्यांनी आपले सहकारी सहायक फौजदार शामकुमार मोरे, हे.कॉ. संजय तायडे, संजय भोई, वाल्मिक सोनवणे, युनुस शेख, योगेश पालवे, दिपक जाधव, जगदीश भोई, प्रेम सपकाळे, राहुल महाजन, रशिद तडवी आदींच्या मदतीने सुरु केला.

अटक करण्यात आलेला संशयीत आरोपी रोशन हुसळे याच्याकडून घटनास्थळी गुन्हा घडला त्यावेळी कोणकोण पत्ते खेळणारे प्रत्यक्ष साक्षीदार होते त्यांची नावे घेण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या वेळी सर्व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना बोलावण्यात आले. त्यांच्याकडून देखील घटनेची माहिती घेण्यात आली. संशयीत आरोपी रोशन हुसळे व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत भावेश भालेराव याच्यावर चाकूहल्ला करणा-या आकाश परदेशी याचे नाव  पुढे आले. त्यालादेखील ताब्यात घेण्यात आले. गुन्हा कबुल केल्यानंतर आकाश परदेशी यालादेखील अटक करण्यात आली. सध्या दोघे संशयीत आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास डिवायएसपी कृष्णात पिंगळे व पो.नि. बबन  जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल  पवार करत आहेत. त्यांना सहायक फौजदार शामकुमार मोरे, हे.कॉ. संजय तायडे, संजय भोई, वाल्मिक सोनवणे, युनुस शेख, योगेश पालवे, दिपक जाधव, जगदीश भोई, प्रेम सपकाळे, राहुल महाजन, रशिद तडवी आदींचे सहकार्य लाभत आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here