सोन्याचे दागीने व्हाटसअपवर टाकले ; बहिण भावाच्या खूनाचे कारण ठरले

आरोपि समवेत पोलिस अधिकारी

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील सातारा परिसरात अल्पाईन हॉस्पीटल नजीक लालचंद खंदाडे – राजपूत हे आपली पत्नी अनिता, मुलगी किरण व मुलगा सौरभ यांच्यासह रहात होते. लालचंद खंदाडे यांचा सुखीसंपन्न परिवार समाजात सर्वांना परिचीत होता. लालचंद खंदाडे यांची जालना जिल्हयातील पाचन वडगाव येथे शेती आहे. त्यांची पत्नी अनिता ही एलआयसी एजंट म्हणून काम करते. लालचंद खंदाडे हे गावी पाचन वडगाव येथे शेती कामानिमीत्त राहतात व अधुन मधून औरंगाबाद येथे येत असतात. सौरभ हा पोदार इंटरनॅशनल स्कुलमधे दहावीच्या वर्गात तर किरण ही पुणे येथील मॉडर्न कॉलेजमधे उच्च शिक्षण घेत होती. मुलांच्या शिक्षणासह पत्नीच्या एलआयसी व्यवसायानिमीत्त त्यांनी औरंगाबाद येथे सातारा परिसरात राहण्यासाठी भाड्याने बंगला घेतला होता.      

लालचंद खंदाडे यांनी काही वर्षापुर्वी पाचन वडगाव येथील काही शेती विकली होती. शेती विकून आलेल्या काही रकमेतून त्यांनी एक किलो सोन्याच्या दागीन्यांची खरेदी केली होती. दिवाळी सणाच्या वेळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खंदाडे परिवाराने ते दागिने पुजनासाठी ताटात ठेवले होते. खंदाडे यांच्या पत्नीने ते फोटो व्हाटसअप स्टेटसला ठेवले होते. व्हाटसअपच्या माध्यमातून सोन्याच्या दागिन्यांचे ते फोटो अनेकांनी पाहिले होते.

लालचंद खंदाडे यांच्या भावाचा मुलगा सतिष काळूराम खंदाडे हा पाचन वडगाव येथे रहात होता. लालचंद खंदाडे यांची पत्नी अनिता ही सतिषची नात्याने काकू होती. काकू अनिताच्या व्हाटसअप स्टेटसवरील ते दागीने सतिषने पाहिले आणी त्याच्या मनात लालसा निर्माण झाली. एक किलो वजनाचे ते सोन्याचे दागिने आपल्याला मिळाले तर किती बरे होईल असा कुविचार त्याच्या मनात चमकून गेला. काहीही करुन काकूचे ते दागिने आपण हस्तगत करायचे असा त्याने मनाशी निश्चय केला. त्यानुसार तो संधीची वाट बघू लागला.

सतिष खंदाडे हा अशिक्षीत होता. शेती काम करुन तो आपला चरितार्थ चालवत होता. काकूचे दागीने पचवण्यासाठी त्याने आपल्या बहिणीचा पती अर्थात मेहुणा अर्जुन देवचंद राजपूत याची मदत घेण्याचे ठरवले. अर्जुन हा वैजापुर तालुक्यातील रोटेगाव येथील रहिवासी होता. बांधकामावर मिस्त्रीकाम करणारा अर्जुन हा लॉकडाऊन काळात रिकामाच होता व सासरवाडीला पाचन वडगाव येथे राहण्यास आला होता. दोघांनी मिळून अनिता खंदाडे यांचे ते दागिने पळवण्याचे नियोजन सुरु केले होते.

अनिता खंदाडे या जेव्हा जेव्हा औरंगाबाद येथून गावी पाचन वडगाव येथे येत होत्या तेव्हा अंगावर ते दागीने घालून येत होत्या. त्यामुळे ते दागिने बघून सतिषच्या मनातील लालसा अजूनच वाढत होती. दिवसामागून दिवस जात होते. सतिष संधीची वाट बघत होता.

अखेर 9 जून रोजी सतिष व त्याचा मेहुणा अर्जुन या दोघांनी डाव साधला. या दिवशी औरंगाबाद येथील बंगल्यात सतिषचा चुलत भाऊ सौरभ खंदाडे व चुलत बहिण किरण असे दोघेच जण हजर होते. लालचंद खंदाडे व त्यांची पत्नी तसेच मोठी मुलगी पाचन वडगाव येथे मुक्कामी होते. ही आपल्या मोहिमेसाठी नामी संधी असल्याचा विचार सतिष व त्याचा मेहुणा अर्जुन यांनी केला व त्या दृष्टीने दोघे कामाला लागले. या दिवशी औरंगाबाद येथील बंगल्यात केवळ किरण व सौरभ हे दोघे भाऊ बहिण होते.   

सतिष आणि अर्जुन यांनी जालना येथून तिन धारदार चाकू विकत घेत औरंगाबाद गाठले. दुपारी बारा वाजेच्या सुमारास दोघे जण सौरभ आणि किरण या चुलत भाऊ बहिणीच्या घरी गेले. चुलत भाऊ सतिष आणी त्याचा मेहुणा अर्जुन आल्याचे पाहून दोघा भाऊ बहिणीने त्यांना घरात घेतले. सुरुवातीला काही वेळ चौघांनी मिळून गप्पाटप्पा केल्या. सतिष आणि अर्जुन हे काळ बनून आपल्या घरी आले आहेत हे दोघा भाऊ बहिणीला कसे समजणार होते? मोठ्या विश्वासाने त्यांनी दोघांना आत घेतले होते. परंतू सतिष व अर्जुन या नराधमांच्या मनात काही वेगळाच विचार सुरु होता.

संशयित आरोपी

किरणने सर्वांसाठी दोन वेळा चहा ठेवला. आग्रहाने चहापान करत किरण व सौरभ या भाऊ बहिणीने त्यांचे आदरतिथ्य केले. काही वेळ चौघे जण कॅरम देखील खेळले. दुपारी मधल्या वेळात सर्वजण बाहेर थोडावेळ फिरुन देखील आले. दरम्यानच्या काळात सतिष व अर्जुन हे दोघे जण दागिने कसे घ्यायचे व या दोघा भाऊ बहिणीचा खून कसा करायचा हाच विचार मनातल्या मनात करत होते.

चुलत भाऊ सतिषसोबत गप्पा झाल्यानंतर त्याची चुलत बहिण किरण सायंकाळी पाच वाजता वरच्या मजल्यावर बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेली. त्यावेळी सतिष, सौरभ व अर्जुन हे तिघेजण खालच्या मजल्यावर बोलत होते. त्यावेळी सतिष देखील फ्रेश होण्याचा बहाणा करत खालच्या मजल्यावरील बाथरुम मधे गेला. बाथरुम मधे गेल्यावर त्याने सौरभला आवाज देवून बोलावले व म्हटले की मला साबणाची अ‍ॅलर्जी आहे. एकदा तु हा साबण लावून बघ. सौरभने चेह-याला साबण लावताच सतिषने संधी साधून खिशातील चाकू बाहेर काढला. तो धारदार चाकू त्याने सौरभच्या गळ्यावर मारला. चाकूचे घाव गळ्यावर बसताच सौरभ जोरात ओरडला. चेह-याला साबण लावलेला असल्यामुळे सौरभला व्यवस्थित दिसत नव्हते व तो हतबल होता. तशाही परिस्थितीत त्याला समजून चुकले की आपल्यासोबत विपरीत घडले असून आपला घात झाला आहे. सौरभने जोरात आर्त किंकाळी मारली. त्याची किंकाळी वरच्या मजल्यावरील बाथरुम मधे असलेल्या किरणने ऐकला. आपल्या भावासोबत काहीतरी अघटीत झाल्याचा अंदाज तिला आला. ती धावतच खाली आली.

तिला देखील काही कळण्याच्या आत अर्जुनने तिचे केस धरुन ठेवत तिच्या गळ्यावर धारदार चाकू चालवला. सतिषने सौरभचा तर अर्जुनने किरणचा गळा चिरुन खून केला. दोघांच्या गळ्यातून रक्त वाहू लागले. काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले होते. दोघे निष्पाप भाऊ बहिण जिवानिशी गेले होते.

दोघांचा जिव गेल्यानंतर सतिष व अर्जुन या दोघा नराधमांनी कपाटात ठेवलेले एक किलो वजनाचे सोन्याचे दागदागिने ताब्यात घेतले. सोबत दोन हजाराची नोट देखील चोरली. आपल्या दुचाकीने दोघांनी तेथून धुम ठोकली. बिड बायपास वर संग्रामनगर उड्डाण पुलाजवळ त्यांनी पाचशे रुपयांचे पेट्रोल भरले. तेथून ते जालना शहराच्या दिशेने पसार झाले. 

खूनाचा हा थरार झाल्यानंतर दोघे भाऊ बहिण मयतावस्थेत घरात पडून होते. रात्री आठ वाजता दोघांची आई अनिता व मोठी बहिण घरी परत आले. दोघी मायलेकी घरात येताच समोरचे दृश्य बघून त्यांना दरदरुन घाम फुटला. सुरुवातीला काही क्षण दोघींना काही सुचलेच नाही. काहीवेळाने दोघी मायलेकींनी जोरजोरात रडण्यास सुरुवात केली. दोघींचा जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमा झाले. तेव्हा हा खूनाचा प्रकार सर्वांना समजला. पाचन वडगाव येथे मुक्कामी गेलेल्या लालचंद खंदाडे यांच्यासह नातेवाईकांना या घटनेची माहीती देण्यात आली. या घटनेची माहिती सातारा पोलिस स्टेशनला देण्यात आली. माहिती मिळताच सातारा पोलिस स्टेशनचे पो.नि. सुरेंद्र मालाळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल गायकवाड आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलिस उप आयुक्त निकेश खाटमोडे पाटील (परिमंडळ 1) , मिना मकवाना (मुख्यालय), डॉ. राहुल खाडे (परिमंडळ 2), सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक (गुन्हे शाखा) अनिल गायकवाड, पोलिस निरिक्षक (सायबर ठाणे) गिता बागवडे, सातारा पोलिस स्टेशनचे पो.नि.सुरेंद्र मालाळे, सहायक पोलिस निरीक्षक गौतम वाबळे, सहायक फौजदार शेख नजीर, सतिष जाधव, चंद्रकांत गवळी, सुधाकर राठोड, सुधाकर मिसाळ, रवी खरात, नितीन देशमुख आदींनी तपासकामात स्वत:ला झोकून दिले.

तपासकामी लागणारा तांत्रीक डाटा सायबर गुन्हे शाखेने उपलब्ध करुन दिला. त्यामुळे आरोपी निष्पन्न होण्याकामी मोलाची मदत मिळू लागली. सातारा पोलिस स्टेशनच्या पथकाने देखील सीसीटीव्ही फुटेजचे संकलन सुरु केले. घटनास्थळ असलेल्या घरातील टेबलवर पोलिसांना चहाचे चार मग आढळून आले होते. याशिवाय कॅरम बोर्ड पडलेला होता. कॅरम खेळून झाल्याचे दिसून येत होते. त्यावरुन हल्लेखोर हे परिचयातील असावे असा पोलिस पथकाने प्राथमिक अंदाज लावला. त्यावरुन पोलिसांनी मयतांच्या मोबाईल क्रमांकाचे कॉल डीटेल्स काढण्यास सुरुवात केली. यात अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्यास सुरुवात झाली. याशिवाय जवळच्या नातेवाईकांचे देखील मोबाईल लोकेशन तपासण्यात आले. यात चुलत भाऊ सतिष व त्याचा मेहुणा अर्जुन पोलिसांच्या यादीवर अग्रक्रमाने आले. त्यामुळे संशयाची सुई त्यांच्या दिशेन वळू लागली. सातारा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमधे सतिष खंदाडे व अर्जुन राजपूत हे दोघे दुचाकीवर जात असल्याचे कैद झाले होते. याशिवाय दोघा भाऊ बहिणीच्या अंत्ययात्रेत सतिष खंदाडे नेमका अनुपस्थित राहिला होता. त्यामुळे त्याच्यावरील संशयाची सुई जास्त टोकदार होवू लागली.  

घटनेच्या दुस-या दिवशी 10 जुन रोजी सतिष खंदाडे व अर्जुन राजपूत हे दोघे सशयीत जालना येथून वैजापूरच्या दिशेने मुद्देमालासह रवाना झाल्याची खात्रीलायक गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यासाठी औरंगाबाद येथे सापळा लावण्यात आला. औरंगाबाद येथे स.पो.नि.गौतम वाबळे व त्यांच्या सहका-यांनी दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेतले.

औरंगाबाद येथील सातारा परिसर भागात किरण खंदाडे-राजपूत (18) व सौरभ खंदाडे-राजपूत (16) या बहिण भावाची घरात गळा चिरुन निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेने औरंगाबाद शहरासह जिल्हयात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. पोलिसांनी आपली तपासचक्रे वेगाने फिरवत दोघा संशयीत आरोपीतांचा माग काढला व त्यात ते यशस्वी झाले.

दरम्यान घरातील सोने गायब झाले होते. घरात कुठेही तोडफोड झालेली नव्हती. चहाचे प्यायलेले चार कप टी पॉयवर तसेच पडून होते. याशिवाय कॅरम बोर्ड देखील बाहेरच पडलेला होता. त्यामुळे हा खून कुणीतरी जवळच्या माहितगार व्यक्तीने केला असावा ही पोलिसांची शंका खरी ठरली.

दोघा संशयीतांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुरुवातीला दोघांना पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडी दरम्यान दोघांनी आपला गुन्हा कबुल केला. खुन केल्यानंतर सतिष व त्याचा मेहुणा अर्जुन हे दोघे पाचन वडगाव या गावी आले होते. याठिकाणी दोघांनी रक्ताने माखलेले कपडे जाळले. जाळलेल्या कपडयांची राख व चाकू विहीरीत फेकून दिला होताअ. दोघे जण रात्रभर शेतातच झोपले होते. दुस-या दिवशी सकाळी 10 जून रोजी सकाळीच दोघे औरंगाबादला आले. त्यानंतर दोघे अर्जुन राजपूतच्या बहिणीच्या घरी गंगापुर येथे काहीवेळ थांबले.  सोन्याची बॅग दोघांनी त्यांच्या सोबतच ठेवली होती. घटनेच्या दुस-याच दिवशी रात्री साडे अकरा वाजता गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना गंगापूर येथे पकडले.  गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरिक्षक गौतम वावळे, सहायक फौजदार नजीर शेख, कर्मचारी सतीष जाधव, चंद्रकांत गवळी, सुधाकर राठोड, सुधाकर मिसाळ, रवी खरात, नितीन देशमुख यांनी या घटनेचा तपास लावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here