संजयला नफ्याचा लोभ, देऊन चुकला लाखोची रक्कम! – बेदम मारहाणीत भुषणच्या मृत्युची वाट झाली भक्कम!!

On: October 16, 2026 5:48 PM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : पैसा माणसाला स्वप्न दाखवतो, गरजा पूर्ण करण्याची उमेद देतो. पैशांनी मनुष्याची स्वप्न पुर्ण देखील होतात. पण त्याच पैशाचा मोह जेव्हा विवेकावर मात करतो, तेव्हा नात्यांची किंमतही शून्य ठरू शकते. झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने, व्यवहारातील अपयश, परतफेडीचा वाढता तगादा आणि त्यातून निर्माण होणारा तणाव कधी एखाद्या कुटुंबाला उद्ध्वस्त करेल, याचा नेम नसतो.

भुसावळच्या गोपाल नगर परिसरात राहणाऱ्या व्हावले कुटुंबाच्या आयुष्यातही अशीच एक काळरात्र आली. या कुटूंबातील एका भावाच्या मनात अधिकारी होण्याचे स्वप्न होते, तर दुसरा शेअर मार्केटमधील व्यवहारांत गुंतला होता. मात्र शेअर मार्केटच्या नादातील व्यवहारातून लाखो रुपयांच्या निर्माण झालेल्या वादाने एका तरुणाचा जीव गेल्याचा आरोप पुढे आला.

एका बाजूला पैशांची मागणी अर्थात तगादा, दुसऱ्या बाजूला हतबल आई-वडील व भाऊ आणि सुटकेच्या आशेने वारंवार फोन करणारा तरुण… अखेर दुसऱ्या दिवशी महामार्गालगत त्याचा मृतदेह आढळला. सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झालेल्या या घटनेने वैद्यकीय तपासणीनंतर गंभीर वळण घेतले. पोलिस तपासात दोघा संशयितांना अटक झाली तर एक संशयित फरार असल्याचे समोर आले. ही केवळ एका कथित खूनाची कहाणी नाही. ती झटपट नफा कमावण्याच्या हव्यासाची, पैशांच्या व्यवहारातील बेपर्वाईची आणि कायदा हातात घेण्याच्या कथित परिणामांचीही कहाणी आहे.

भुसावळ शहरातील गोपाल नगर परिसरात व्हावले कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील दोन्ही मुलांच्या वाटा वेगवेगळ्या होत्या. मोठा मुलगा विशाल उल्हास व्हावले याच्या डोळ्यात अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्या स्वप्नपुर्तीसाठी तो स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. अभ्यास, मेहनत आणि जिद्द यांच्या बळावर आयुष्य घडवण्याची त्याची धडपड सुरू होती.

दुसरीकडे धाकटा मुलगा भुषण उल्हास व्हावले याने बी.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. मात्र, त्याला शेअर मार्केट ट्रेडिंग खुणावत होते. ट्रेडींगच्या व्यवहारातून मोठा नफा मिळवण्याची आशा त्याच्या मनात निर्माण झाली. हळूहळू त्याने इतरांनाही ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्याचा सल्ला देण्यास सुरुवात केली. अधिक परतावा मिळवून देण्याची प्रलोभने दाखवत त्याने अनेकांकडून पैसे घेतल्याचे सांगितले जाते. पण नफ्याची स्वप्ने दाखवणारा व्यवहार प्रत्यक्षात अडचणींच्या गर्तेत अडकला, तर त्यातून बाहेर पडणे किती कठीण होऊ शकते, याची जाणीव भूषणला होऊ लागली होती.

केदार बारबोले – डिवायएसपी

भुसावळचे नगरसेवक राजेंद्र आवटे यांचे बंधू संजय दत्तू आवटे यांच्याशीही भूषणचा आर्थिक व्यवहार झाला होता. ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल, या अपेक्षेने नगरसेवक बंधू संजय आवटे याने वेळोवेळी भूषणकडे लाखो रुपये दिले. मात्र, अपेक्षित नफा मिळत नसल्याने संजय आवटे याने गुंतवलेली रक्कम भुषण यास परत मागण्यास सुरुवात केली. भुषणकडून आज देतो, उद्या देतो, अशी उत्तरे संजय यास मिळत असल्याचे सांगितले जाते. घेतलेल्या एकूण ३४ लाख रुपयांपैकी भुषणने पाच लाख रुपये परत केल्याचा दावा होता. त्यामुळे उर्वरित २९ लाख रुपयांच्या परतफेडीवरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. प्रत्यक्षात नेमक्या किती रुपयांचा वाद होता हे तपासाअंती स्पष्ट होणार आहे. संजय आवटे याचा भुषणकडे पैशांसाठी तगादा वाढत होता, तर भूषणसमोर एवढी मोठी रक्कम उभी करण्याचे संकट होते. पैशांचा हा प्रश्न केवळ दोन व्यक्तींमध्ये मर्यादित राहिला नाही. त्याची झळ आता संपूर्ण व्हावले कुटुंबाला बसणार होती.

Rahul Wagh PI

७ ऑक्टोबर २०२६. भूषणच्या आयुष्यातील शेवटच्या दिवसाची संध्याकाळ जवळ येत होती. संजय आवटे याने भुषणला वारंवार फोन करून शहराबाहेरील त्यांच्या फार्महाऊसवर येण्यास सांगितले. पैशांची मागणी आणि समोरून येणारे फोन यामुळे भुषण कमालीचा अस्वस्थ झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरील चिंता आईच्या नजरेतून सुटली नाही.

आईने विचारपूस केली तेव्हा भूषणने आपली अडचण सांगितली. संजयकडून घेतलेल्या पैशांपैकी पाच लाख रुपये परत केल्याचे आणि उर्वरित रकमेची मागणी होत असल्याचे त्याने आईला सांगितले. संजय शिवीगाळ करत असल्याची आणि फार्महाऊसवर न गेल्यास आपल्यासोबत काहीतरी वाईट घडू शकते, अशी भीतीही त्याने आईजवळ व्यक्त केली. आईसमोर स्वतःचा मुलगा घाबरलेला होता. त्याच्या मनातील भीती तिला जाणवत होती. मुलाला एकटे पाठवण्यापेक्षा तीने त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

Nivant Jadhav PSI

माय लेक दोघे फार्महाऊसवर पोहोचले. तेथे संजय आवटे यांच्यासोबत प्रमोद बलराम लाहोरिया आणि अफसर रफीक मेमन हेही उपस्थित होते. मात्र, त्या भेटीतून भुषण सुखरूप घरी परतणार की नाही, याची कल्पना त्या आईला नव्हती.फार्महाऊसवर संजयने आजच पैसे हवे असल्याची भुमिका घेतल्याचे म्हटले जाते. भुषणच्या आईने विनवणी केली, तरी पैशांचा प्रश्न सुटत नव्हता. संध्याकाळ सरत होती मात्र परिस्थितीत काडीमात्र बदल होत नव्हता. अखेर आईने भुषणच्या मोबाईलवरून घरी संपर्क साधला. पती उल्हास व्हावले आणि मोठा मुलगा विशाल यांना त्या माऊलीने घडलेला प्रकार कथन केला. तीने दोघांना  तातडीने फार्महाऊसवर येण्याची विनंती केली.

निरोप मिळताच वडील उल्हास आणि मोठा मुलगा विशाल दोघेही तेथे पोहोचले. त्यांच्यासमोरचे दृश्य अस्वस्थ करणारे होते. भुषण एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे पत्र्याच्या शेडमध्ये मान खाली घालून बसला होता. त्याची आई हतबलपणे त्याच्या शेजारी उभी होती, तर संजयचे दोघे साथीदार जवळच्या खुर्च्यांवर बसले होते. त्यानंतर संजयने भुषणकडे ३४ लाख रुपये दिल्याचे, पाच लाख परत मिळाल्याचे आणि आणखी २९ लाख रुपये बाकी असल्याचे सांगितले. पैसे मिळेपर्यंत भुषणला सोडणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतल्याचा आरोप आहे. भुषणच्या आई-वडिलांनी आणि विशालने पैसे जमवून देण्याचे आश्वासन देत भुषणला सोडण्याची विनंती केली. मात्र, त्यांच्या विनवणीला प्रतिसाद मिळाला नाही, असा आरोप आहे.

एका बाजूला मुलाला घरी घेऊन जाण्याची धडपड होती. दुसऱ्या बाजूला एवढी मोठी रक्कम तातडीने कशी उभी करायची हा यक्षप्रश्न होता. संध्याकाळ सरली. रात्र झाली. फार्महाऊसवरील तणाव कमी होण्याऐवजी वाढत होता. रात्री पावणे दहाच्या सुमारास भुषणने वडिलांना फोन केला. त्याचा प्रश्न एकच होता—पैसे जमले का? वडिलांनी आपण पैशांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. मुलाला सोडवण्यासाठी ते धडपडत होते. पण अपेक्षित रक्कम काही जमा होत नव्हती.

रात्री साडेदहाच्या सुमारास भुषण आणि त्याच्या आईमध्ये पुन्हा मोबाईलवर संभाषण झाले. भुषणने पुन्हा पैशांबाबत विचारणा केली. त्याच कालावधीत संजय आणि त्यांच्या साथीदारांकडून भुषणला शिवीगाळ व मारहाण केली जात असल्याचे म्हटले जाते. त्या रात्री प्रत्येक फोनमागे एक आशा होती—कदाचित पैसे जमले असतील, कदाचित आता भुषणची सुटका होईल, कदाचित तो घरी परत येईल! पण या आशांना प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम काही उभी राहिली नाही. आणि मग घडले ते सर्वांनाच हादरवून सोडणारे!

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, पैसे न मिळाल्यामुळे संजय आवटे आणि त्यांच्या दोघा साथीदारांनी भुषणला बेदम मारहाण केली. शिवीगाळ आणि चापटाबुक्क्यांबरोबरच बांबूनेही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या मारहाणीत भुषणच्या डोक्याला बांबूचा घाव बसला. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.

एकीकडे वडील आणि भाऊ पैसे जमवण्यासाठी प्रयत्न करत होते. दुसरीकडे, फार्महाऊसवर भुषणच्या आयुष्याची दोरी कमकुवत होत होती. ज्या आईने मुलाच्या भीतीची जाणीव होताच त्याला एकट्याला न पाठवता सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, त्याच आईच्या डोळ्यांसमोर तिच्या मुलासोबत काय घडले असेल, याची कल्पनाही मन सुन्न करणारी आहे.

बेदम मारहाणीत भुषणचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह राष्ट्रीय महामार्गालगतच्या वॉटर पार्क परिसरातील पुलाखाली फेकून देण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, या घटनेतील प्रत्येक आरोपीची नेमकी भूमिका न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होणे आवश्यक आहे.

८ ऑक्टोबरची सकाळ उजाडली. भूषणला सोडवण्यासाठी पैशांची व्यवस्था करण्याचे प्रयत्न अजूनही सुरू होते. सकाळी सातच्या सुमारास विशाल आणि त्याची आई पैशांची मदत मिळवण्यासाठी एका नातेवाईक महिलेकडे गेले होते. विशालने वडिलांना घरी फोन केला. मात्र, फोनवरून मिळालेली बातमी त्याच्या आयुष्याला हादरवून गेली.

yoesh Mali pc

पोलिस त्यांच्या घरी चौकशीसाठी आले होते. भूषणचा मृतदेह महामार्गालगतच्या वॉटर पार्कजवळ आढळल्याची माहिती वडिलांनी विशालला दिली. तातडीने ट्रॉमा केअर सेंटरला पोहोचण्यास सांगण्यात आले. ही बातमी ऐकताच विशाल, त्याची आई आणि मावशीचा मुलगा तातडीने ट्रॉमा केअर सेंटरकडे रवाना झाले. आतापर्यंत ज्याला घरी परत आणण्यासाठी पैशांची जमवाजमव सुरू होती, तो भुषण आता कायमचा निघून गेला होता.

भुषणचा मृतदेह पाहताच नातेवाइकांचा आक्रोश अनावर झाला. भूषणच्या उजव्या डोळ्याखाली जखम होती. उजव्या कानातून रक्तस्राव झाल्याचे दिसत होते. त्याच्या दोन्ही हातांवर आणि पाठीवर खरचटल्याच्या खुणा तसेच काळे-निळे डाग आढळून आले. या खुणा पाहून भूषणच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांच्या मनात गंभीर संशय निर्माण झाला. त्याला मारहाण करून मृतदेह महामार्गालगत टाकण्यात आल्याचा आरोप विशालने केला. ज्या कुटुंबाला रात्री पैशांची चिंता सतावत होती, त्या कुटुंबासमोर सकाळी मुलाच्या मृत्यूचे दुःख उभे ठाकले होते.

सुरुवातीला भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेहाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अहवालातून मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर तपासाला वेगळे वळण मिळाले. विशाल व्हावले याने दिलेल्या फिर्यादीनुसार संजय दत्तू आवटे व त्याच्या दोघा साथीदारांविरुद्ध खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. अधिक तपासात दोघा साथीदारांची नावे प्रमोद बलराम लाहोरिया आणि अफसर रफीक मेमन असल्याचे निष्पन्न झाली. गुन्हा रजिस्टर क्रमांक ५१४/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि ३(५) नुसार कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्हयाचा प्राथमिक तपास पोलिस उप निरीक्षक निवांत जाधव यांनी सुरु केला. पुढे या प्रकरणात अॅट्रॉसिटी कायद्याचे कलमही वाढवण्यात आले. त्यामुळे या तपासाची जबाबदारी उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले यांनी स्वतःकडे घेतली.

तपासादरम्यान निष्पन्न झालेल्या संजय दत्तू आवटे आणि प्रमोद बलराम लाहोरिया यांना अटक करण्यात आली. अफसर रफीक मेमन फरार असल्याने त्याचा शोध सुरु झाला. या गुन्हयात वापरलेली कार, सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर, रक्ताचे नमुने, रक्ताचे डाग असलेला बांबू आणि पेनड्राइव्ह यांसह विविध वस्तू जप्त करण्यात आल्या. या पुराव्यांच्या आधारे घटनेची साखळी उलगडण्याचा तपास सुरू झाला.

अटकेतील दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश पी. व्ही. पाटील यांच्या न्यायालयाने सुरुवातीला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. सरकारतर्फे अॅड. मोहन देशपांडे यांनी बाजू मांडली. अशा प्रकारे, सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झालेल्या घटनेने तपासादरम्यान खुनाच्या गुन्ह्याचे स्वरूप घेतले. या प्रकरणातील आरोप न्यायालयात सिद्ध होणे बाकी आहे.

भूषण व्हावलेच्या मृत्यूच्या या घटनेतून अनेक प्रश्न समोर येतात. अधिक नफा मिळवण्याच्या आशेने कोणाकडेही पैसे सोपवतांना आपण किती काळजी घेतो? गुंतवणुकीचा व्यवहार नेमका कोणत्या आधारावर केला जातो? परतावा न मिळाल्यास कायदेशीर मार्गाने पैसे वसूल करण्याऐवजी दबाव, धमकी किंवा हिंसेचा मार्ग स्वीकारणे किती घातक ठरू शकते? शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे हा स्वतःमध्ये गुन्हा नाही. मात्र, कोणत्याही गुंतवणुकीत नफ्याची हमी नसते. केवळ ओळख, विश्वास किंवा मोठ्या परताव्याच्या आश्वासनावर पैसे देणे धोकादायक ठरू शकते. आर्थिक व्यवहार करताना लेखी करार, बँक व्यवहारांची नोंद आणि गुंतवणुकीची सत्यता तपासणे महत्त्वाचे आहे. त्याचवेळी, पैसे अडकले असतील तर कायदेशीर मार्गाने तक्रार करणे आणि न्याय मिळवणे हाच योग्य मार्ग आहे. कोणत्याही आर्थिक वादाचे रूपांतर धमकी किंवा हिंसेत होऊ देणे समाजासाठी घातक आहे.

मयत भुषणचा मोठा भाऊ विशाल अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत होता. भूषणनेही आयुष्यात स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पण एका आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या वादाने एका कुटुंबाच्या आयुष्यात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. आईच्या डोळ्यांतील अश्रू, वडिलांची हतबलता आणि भावाच्या मनातील वेदना यांची भरपाई कोणतीही रक्कम करू शकत नाही.

पैसा पुन्हा कमावता येतो.  हरवलेला विश्वास पुन्हा निर्माण करता येतो. पण गेलेला जीव परत आणता येत नाही. म्हणूनच, झटपट श्रीमंत होण्याच्या मोहाला बळी पडू नये. आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवा. पैशांचा वाद निर्माण झाल्यास कायदेशीर मार्ग स्वीकारा. कारण पैशापेक्षा माणसाचे आयुष्य, नात्यांचे मोल आणि विवेकाची किंमत कितीतरी मोठी आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment