बड्या मंत्र्यांच्या खासगी सचिवाने थाटले जिल्हा परिषदेत कार्यालय

पुणे : जिल्हा परिषदेत परवानगी नसताना एका बड्या मंत्र्यांच्या खाजगी सचिवाने सरळ जिल्हा परिषद मुख्यालयात एक खोलीच बळकावल्याचा प्रकार काल बुधवारी उघडकीस आला. विरोधी सदस्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर या कार्यालयाची छायाचित्रे काढण्यात आली व या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. या प्रकारानंतर मंत्राच्या नावाचा उल्लेख असलेला फलक नाहिसा करण्यात आला. खासगी व्यक्ती जिल्हा परिषदेत खुलेआम खासगी कार्यालय कसे काय थाटू शकतो, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

विरोधकांचा वाढता आक्षेप आणि प्रशासनाची निर्माण झालेली अडचण येत लक्षात आल्यानंतर बुधवारी सायंकाळी उशिरा हा फलक तात्काळ नाहिसा करण्यात आला. याबाबत जि.प.च्या कोणत्याही सभेत तसा रितसर ठराव करण्यात आला नाही. जि.प.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तसा लेखी आदेश देखील नाही.

असे असतांना कोणत्या आधारे हे कार्यालय थाटला असा प्रश्न व मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. पुणे जिल्हा परिषद मुख्यालयातील पहिल्या मजल्यावर असलेली ही खोली प्रत्यक्षात आरोग्य पतपेढीसाठी आरक्षित आहे. कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाल्यापासून या ठिकाणी आरोग्य पतपेढी आणि नियंत्रण कक्षाचे काम सुरु करण्यात आले होते. सुरवातीच्या काळात संबंधित मंत्र्यांचा खासगी सचिव या ठिकाणी बसून कामकाज चालवत असे.

त्यानंतर येथून आरोग्य पतपेढी दुसरीकडे हलवून थेट दारावर संबंधित मंत्र्यांच्या पदाचा आणि स्वतःच्या पदाच्या नावासह उल्लेख असलेला बोर्डच झळकला असल्याचे दिसून आले. जि.प.च्याच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंत्री महोदयांना खूष करण्यासाठी व ठेवण्यासाठी ही खोली तोंडी आदेशाद्वारे दिली असल्याचे समजते. मात्र हे प्रकरण अंगाशी येत असल्याचे दिसताच ह फलक गायब करण्यात आला. तक्रारीनंतर हा बोर्ड काढून टाकण्यात आल्याची चर्चा पुणे जि.प. जिल्हा वर्तुळात रंगली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here