पाच हजाराची लाच पोलिस कर्मचा-यास भोवली

ACB-Crimeduniya

जळगाव : भुसावळ पोलिस उप विभागातील नशिराबाद पोलिस स्टेशनमधील कार्यरत पोलिस कर्मचा-यास आज पाच हजार रुपयांची लाच भोवली. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलिस हेड कॉन्स्टेबल सतिष रमेश पाटील यास पाच हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक करण्यात आली.

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील पन्नास जणांच्या विरोधात एक अर्ज आला होता. त्या अर्जावरुन गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्याकामी हेड कॉन्स्टेबल सतिष रमेश पाटील यांनी संबंधिताकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

संबधीत तक्रारदारास लाचेची रक्कम द्यायची नव्हती. त्याबद्दल तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तकार अर्ज दाखल केला होता. त्यानुसार पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याची पडताळणी करण्यात आली. पडताळणी अंतर्गत खात्री झाल्यानंतर रितसर सापळा रचला असता त्या सापळ्यात हेड कॉन्स्टेबल सतिष पाटील अलगद अडकले. पोलिस स्टेशनच्या आवारातच हा सापळा यशस्वी झाल्यामुळे परिसरात खळबळ माजली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक गोपाल ठाकुर यांच्यासह संजोग बच्छाव, रवींद्र माळी, ईश्वर धनगर, सुनील पाटील, सुरेश पाटील, सुनील शिरसाठ, मनोज जोशी, जनार्दन चौधरी, प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासीर देशमुख इश्वर धनगर आदींनी या कारवाईत सहभाग घेत कारवाई यशस्वी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here