दारुच्या नशेत किशोरने वाद घातला फार; तिघांनी मिळून केले त्याला कायमचे गार

आरोपीसमवेत पोलिस पथक

नाशिक : दारुची नशा करी जीवनाची दुर्दशा असे म्हटले जाते. काही लोक आपल्या घरातच अथवा कुठेतरी सुरक्षित ठिकाणी चार भिंतीच्या आड मद्यप्राशन करत असतात. त्यांचा ब्रॅंड देखील चवदार आणि महागडा असतो. मात्र काही लोक हलक्या दर्जाचा ब्रॅंड असलेले मद्य कमी किमतीत घेवून कुठेही पिवून धिंगाणा घालत असतात. असे मद्यपी लोक रस्त्यावर अथवा घरात कुठेही काहीतरी बरळतात आणी स्वत:च्या इज्जतीचा पंचनामा करुन घेत असतात. मद्याचा अंमल त्यांच्यावर जेव्हा असर करतो त्यावेळी ते कुणालाही काहीही बोलत असतात. त्यामुळे एखादा समजूतदार असेल तर तो समजून घेतो. मात्र एखादा सरळ हातघाईवर येतो. त्यातून एखाद्या वेळी अनर्थ घडतो.

किशोर प्रभाकर जगताप हा तिशीतील तरुण मालेगाव कॅम्प परिसरातील हिम्मत नगर येथील रहिवासी होता. त्याला दारु पिण्याचे व्यसन होते. एकदा का त्याच्या गळ्यावाटे पोटात दारु उतरली म्हणजे तिच दारु त्याला चढत असे. चढलेली दारु त्याला अवकाशाची सैर घडवत असे. स्वप्नांच्या जगात दारुच्या नशेत असला म्हणजे तो काहीतरी बरळत असे.

4 ऑक्टोबर रोजी रविवारचा सुटीचा दिवस होता. सुटी असल्यामुळे मुक्त असलेल्या किशोर जगतापचे पाय दारुच्या गुत्त्याकडे वळले होते. दारु रिचवल्यानंतर तो हवेत उडत होता. दरम्यान त्याचे रस्त्यात तो रहात असलेल्या हिम्मत नगर परिसरातील रहिवासी असलेल्या चेतन पवार, हेरंब सोनवणे आणि उमेश पाटील यांच्यासोबत काहीतरी किरकोळ कारणावरुन वाद झाला. दारुच्या नशेत किशोर याने तिघांना शिवीगाळ सुरु केली. तिघा तरुणांच्या अंगात सळसळते रक्त वहात असल्यामुळे त्यांनी देखील त्याची शिवीगाळ अजिबात सहन केली नाही.

आपल्याला शिवीगाळ केल्याचा राग तिघांच्या मनात धुमसत होता. तिघांनी मिळून त्याला 5 ऑक्टोबर रोजी एकट्यात गाठले. त्याला तिघांनी मिळून सुरुवातीला प्राथमिक स्वरुपात शिवीगाळ सुरु केली. त्यानंतर प्रकरण हातघाईवर पोहोचले. तिघांनी मिळून किशोर यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान तिघा तरुणांनी त्याचा गळा दाबून त्याला जिवानिशी ठार केले.

किशोरचा जिव गेल्याचे लक्षात येताच तिघांचे होश उडाले. आता याच्या मृतदेहाचे करायचे काय? असा प्रश्न त्यांना पडला. मयत किशोरचा मृतदेह त्यांनी मोटारसायकलने कुकाणे शिवारातील मोगडी नाल्यातील पाण्यात टाकून दिला व पसार झाले. मयत किशोरचा मृतदेह नाल्यातील पाण्यात तसाच पडून राहिला.

6 ऑक्टोबर रोजी हा खूनाचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सचिन पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर (नाशिक ग्रामीण तात्पुरता पदभार मालेगाव) तसेच मंगेश चव्हाण (उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प तात्पुरता पदभार) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक के.के.पाटील यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळ गाठले. वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनचे पथक देखील घटनास्थळी हजर झाले.

घटनास्थळाची पाहणी केली असता मयताचा चेहरा जलचर प्राण्यांनी कुरतडल्याचे दिसून आले. त्याच्या डोळ्याजवळ तसेच चेह-यावर मारहाणीच्या जखमा दिसून येत होत्या. त्याचा गळा आवळल्याचे देखील स्पष्ट दिसत होते. परिसरातील लोकांकडे केलेल्या चौकशीअंती त्याची ओळख पटली होती. मयताचे नाव किशोर प्रभाकर जगताप असल्याचे निष्पन्न झाले होते. तो मालेगाव कॅम्प परिसरातील हिम्मत नगर येथील रहिवासी असल्याचे उघड झाले होते. त्याला कुणी व कशासाठी मारले याचा तपास महत्वाचा होता.

किशोर जगताप याचा गळा आवळून मृतदेह पाण्यत टाकल्याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिस स्टेशनला 6 ऑक्टोबर रोजी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.मयताच्या घरातील सदस्यांसह इतर नातेवाईकांची या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात आली. तसेच गोपनीय बातमीदारांमार्फत देखील समांतर चौकशी स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरु होती. गोपनिय बातमीदाराकडून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक के.के.पाटील यांना माहिती मिळाली की 4 ऑक्टोबर रोजी मयत किशोर जगताप याचे रात्री उशिरा कुणाशी तरी भांडण झाले होते.

एवढ्या माहितीच्या आधारे पोलिस निरिक्षक के.के. पाटील यांनी तपासाची चक्रे गतीमान केली. या गुन्हयातील आरोपी चेतन पवार, हेरंब सोनवणे व उमेश पाटील (हिम्मत नगर, कॅम्प मालेगाव) यांना स्थानिक गुन्हे शाखा व वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनचय संयुक्त पथकाने ताब्यात घेतले.

सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या बघून त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. घटनेच्या रात्री दारु पिवून मयताने तिघा आरोपींना शिवीगाळ केली होती. त्याचा राग तिघांच्या मनात धुमसत होता.त्या रागातून त्यांनी मयत किशोर जगताप यास गाठून त्याला सुरुवातीला मारहाण केली. त्यानंतर त्याचा गळा दाबून खुन केला. खून केल्यानंतर किशोर जगताप याच मृतदेह मोटार सायकलने कुकाणे शिवारातील नाल्याच्या पाण्यात टाकून देण्यात आला होता. अशा प्रकारे तिघा आरोपींनी आपला गुन्हा कबुल केला. त्यांना अटक करण्यात आली.

सदर गुन्हा उघडकीस आणण्याकामी नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर(तात्पुरता पदभार मालेगाव) तसेच उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण (तात्पुरता पदभार मालेगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. के.के. पाटील व त्यांचे सहकारी स.पो.नि. मोताळे, दुनगहु, पो.उ.नि. गुजर, पाटील, हे.कॉ. महाले, खरोले, सुर्यवंशी, सोनवणे, पो.ना. सवत्संरकर, उबाळे, साळुंखे, शेवाळे, मोरे, पो.कॉ. वाघ, माळी, पवार, मोरे, बहिरम यांनी परिश्रम घेतले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here