एलसीबीने पकडला 66 लाख रुपयांचा गुटखा – गुन्हा दाखल

जळगाव : धुळे येथून मेहुणबारे मार्गे जळगावच्या दिशेने येणारा 66 लाख रुपये किमतीचा गुटख्याचा ट्रक आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव शहरानजीक जैन हिल्स जवळ पकडला.

स्थानिक गुन्हे शाखेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार ट्रक क्र. एम. एच. 18 – एम – 0553 हा गुटख्याचा माल भरलेला ट्रक धुळे येथून मेहूणबारे गावाच्या दिशेने येत असल्याची माहिती पो.नि. बापू रोहोम यांना समजली होती. या पथकातील स.फौ. नारायण पाटील, पो.हे.कॉ. रामचंद्र बोरसे, प्रविण हिवराळे महेश पाटील, सुनिल दामोदरे यांच्या पथकाने चाळीसगाव व मेहूणबारे रत्यावरील गिरणा नदीच्या पुलावर ट्रक पकडण्यासाठी सापळा लावला होता. दि. 16 ऑक्टोबरच्या रात्री अकरा वाजेच्या सुमारास सदर पथकाने ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रक चालकाने ट्रक न थांबवता भरधाव वेगाने चाळीसगाव – पाचोरा मार्गे जळगाव शहराच्या दिशेने आणला. दरम्यान एलसीबी पथकाने या ट्रकचा पाठलाग सुरुच ठेवला होता.

दुस-या दिवशी 17 ऑक्टोबरच्या सकाळी चार वाजेच्या सुमारास तब्बल पाच तासाने हा ट्रक जळगाव नजीक जैन हिल्स जवळ पकडण्यात एलसीबी पथकाला यश आले. रस्ता खराब असल्यामुळे ट्रकची गती कमी झाल्यामुळे हा ट्रक पकडण्यात यश आले.

सदर ट्रक (एम. एच. 18 – एम – 0553) मधे एकुण 66,86,999 एवढ्या रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला. या प्रकरणी ट्रक मालक तथा चालक मसुद अहमद शब्बीर अहमद (38) संगमेश्वर इसाक चौक मालेगाव जि. नाशिक व क्लिनर मोहम्मद अय्युब दिन मोहम्मद (50) संगमेश्वर इसाक चौक मालेगाव जि. नाशिक यांच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्टेशनला शुन्य क्रमांकाने भा. द. वि. 272, 273, 328 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा मेहूणबारे पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे.

दरम्यान आज दुपारी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगाव जिल्हा पोलिस स्टेशनच्या आवारात माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधत म्हटले की या ट्रकचा त्यांनी पाठलाग केला व आपणच हा ट्रक पकडून दिला. तसेच त्यांनी विविध आरोप देखील केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here