शेतक-याची 19 लाखात फसवणूक करणारी टोळी अटकेत

जळगाव : दुग्ध व्यवसाय करण्यासाठी अल्प व्याजदरात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून पिंपळगाव हरेश्वर (ता.पाचोरा) येथील एका शेतकऱ्याला तब्बल 19 लाख रुपयात फसवणूक करणा-या टोळीचा जळगाव सायबर पोलिसांनी शोध लावून पर्दाफाश केला आहे.

तिघा जणांना मुंबई येथून अटक करण्यात आली आहे. यापुर्वी दिल्ली येथील दोघांना अटक करण्यात आली होती. आता त्यांना पुन्हा अटक करण्यात ताब्यात घेत अटक करण्यात आली. या गॅंगकडून 4 लाख 90 हजार रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे.

अटकेतील अली मोहम्मद मुमताज (रा. भांडूप वेस्ट, मुंबई), अविनाश हनुमंत वांगडे (लोकमान्य नगर, ठाणे) तसेच रविराज शंकर डांगे (मुलुंड, मुंबई) या तिघांसह दिल्ली येथील सतिदंरसिंग तारलोकसिंग व दीपक सत्यप्रकाश गुप्ता या दोघांचा देखील समावेश आहे.

संदीप विठ्ठल महाजन (४६), पिंपळगाव, हरेश्वर, ता.पाचोरा या शेतकऱ्याला दुधाचा व्यवसाय सुरु करायचा होता. या व्यवसायासाठी 75 लाख रुपयांचे कर्ज घेण्यासाठी संदीप महाजन यांनी पाचोरा येथील एका बँकेत जावून संपर्क साधला होता. यावेळी तेथील बॅंक मॅनेजरने त्यांना एवढी मोठी रक्कम आपणास मिळणार नसल्यचे सांगत नकार दिला होता.

त्यानंतर जानेवारी २०२० दरम्यान संदीप महाजन यांना बजाज फायनान्सच्या मुंबई कायार्लयातून बोलत असल्याचे सांगत एक फोन आला होता. पलीकडून बोलणा-याने आपण व्यवस्थापक कबीर अग्रवाल बोलत असल्याचे त्यांना सांगितले. पलीकडून बोलणा-या व्यक्तीने आपणास 40 लाख रुपयांचे शुन्य टक्के व्याजदराने कर्ज मिळू शकते असे त्यांना सांगितले. मात्र त्यासाठी आपणास 4 लाख रुपयांची विमा पॉलीसी काढावी लागेल अशी अट त्यांना घातली होती.

त्यानंतर पलीकडून बोलणा-याने त्यांना चार वेळा चार बँकामध्ये एकुण 12 लाख 49 हजार रुपये ऑनलाईन जमा करण्यास सांगितले. त्यानंतर मुंबई येथे प्रत्यक्ष बोलावून 6 लाख रुपये रोखीने घेतले. महाजन यांनी एकूण 18 लाख 49 हजार रुपये या टोळीकडे दिले.

एवढी रक्कम भरुन देखील आपल्याला कर्ज मिळत नसल्याचे बघून आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस स्टेशनला आयटी अ‍ॅक्ट नुसार रितसर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे सायबर पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक बळीराम हिरे यांनी आपले सहकारी पोलिस उपनिरीक्षक अंगद नेमाणे, प्रवीण वाघ, दिलीप चिंचोले, दीपक सोनवणे, अरविंद वानखेडे, श्रीकांत चव्हाण यांचे पथक दिल्ली येथे पाठवले.

या पथकाने दोन दिवस सापळा रचून सतिदंरसिंग तारलोकसिंग व त्याचा साथीदार दीपक सत्यप्रकाश गुप्ता या दोघांना अटक केली. याकामी सहायक फौजदार विजय पाटील व नरेंद्र वारुळे यांची तांत्रीक मदतरुपी मेहनत मोलाची ठरली.

त्यानंतर काही कालावधीनंतर चौकशीअंती मुंबई येथून काही फोन कॉल्स झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिस उप निरिक्षक अंगद नेमाणे, गौरव पाटील व ललीत नारखेडे यांचे पथक मुंबई येथे गेले. मुंबई येथून या पथकाने नुकतेच अली मोहम्मद मुमताज, अविनाश हनुमंत वांगडे व रविराज शंकर डांगे या तिघांना ताब्यात घेत अटक केली. या तिघा संशयितांकडून चार एटीएम कार्ड, 4 लाख ९० हजार रुपये रोख जप्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here